असेच काही फोटो – २

आज परत एकदा लिहायला असं काही सुचत नाहीये म्हणून हे काही फोटो…

वळण

वळण

या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्कोच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा काढलेला हा फोटो. आम्ही निवडलेल्या टूरमधे ट्विन पीक्स हे एक ठिकाण होतं. तिथून सॅन फ्रान्सिस्कोचा असा छान देखावा दिसतो.

खारूताई

खारूताई

तिकडच्या बोटॅनिकल गार्डनमधे भरपूर खारी होत्या आणि त्या माणसांना घाबरतही नव्हत्या. एक आजीबाई दाणे टाकत टाकत चालल्या होत्या त्यांच्यामागे तुरूतुरू धावून या खारी दाणे गोळा करत होत्या. आसपास कुठेही “डुनॉट फीड द स्क्विरल्स” अशी पाटी नव्हती.

बोगदा

बोगदा

हा असाच…  उगाच !

किडा

किडा

हा बंडू एक दिवस सरकत्या खिडकीच्या काचेवर येऊन बसला होता.

सॅन फ्रान्सिस्को

आज सॅन फ्रान्सिस्कोची छान ट्रिप झाली. गेले दोन महिने म्हणत होतो जायचं, जायचं… आज जाणं झालं… शनिवार असूनही चक्क सहाला उठलोय त्यामुळे आत्ता रात्री एकूणच शून्य उत्साह आहे. आज फक्त काही फोटो अपलोड करतो आणि गरमगरम पाण्याने स्वतःला शेकून छान झोपी जातो.
Golden Gate Bridge

गोल्डन गेट पूल

seagull

सीगल

divine cargo

आकाशवाणी होण्यापूर्वी

pidgon

कबू

san francisco

सॅन फ्रान्सिस्को

चिपोट्ले

चिपोट्ले

हा माझ्या घराच्या बाल्कनीत उभा राहून काढलेला फोटो… ते गाड्यांच्या पार्किंगच्या अलिकडे दिसतंय ते चिपोट्ले. मेक्सिकन गुर्रमॉं का काहीतरी असं त्याचं पूर्ण नाव आहे. या त्यांच्या साईटवर तपशील बघा. इथे काही निवडक पण उत्तम मेक्सिकन पदार्थ मिळतात. ताको, बुरीटो वगैरे. रोज घरीच स्वयंपाक करायचा या विचारानेच मला कंटाळा येतो त्यामुळे कधीकधी मी इकडून बुरीटो आणून खातो, विशेषकरून रात्री.

छान प्रकार असतो. भात, ब्लॅक बीन्स, फाहीता, कोंबडी, तिखट आणि सौम्य साल्सा, मका, चीज, सावरक्रीम आणि लेट्यूस असं सगळं असतं यात. मी बोल मधे घेतो नाहीतर हा प्रकार पोळीसारख्या एका पदार्थात (टॉर्टिया?) गुंडाळून येतो. तुम्हाला हवं असल्यास इतर प्रकारचे मांस किंवा ग्वाकामोली पण घेता येते. एकूणच हा प्रकार पोटभरीचा असतो आणि पौष्टिक पण ( अतिरेक केला नाही तर )

इथे येऊन मला तीन महिने होत आले, घराच्या शेजारीच ही जागा असल्याने मी इथे वरचेवर जातो त्यामुळे तिथल्या कर्मचारी बंडू आणि बंड्या आता मला चेहेऱ्याने ओळखू लागल्यात. मला मिळणाऱ्या क्वांटिटीतून हे स्पष्ट जाणवतं. आधी वाढू का नको असं करणारे हात आता बिनधास्त असतात. मजा वाटते. अंदाज घेऊन त्यांचे हात थांबवायची जबाबदारी आता माझ्यावर आहे. एकट्याला एवढं जात नाही आणि टाकणं जिवावर येतं. भरपूर खाऊन पोट टम्म झाल्यानं असं जागत बसावं लागतं ते वेगळंच…

तरीपण झोपतो आता. उद्या सकाळी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोला जाणारी ट्रेन गाठायचीय. ट्रिपचा बेत आहे.

आपला, (टम्म)

~नॅकोबा