कप

काल माझा एक कप फुटला. खळ्ळ् असा. त्या आधी ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक असा एक पानचट आवाज झाला. कपात चहा होता. जर कोणी अज्ञात इसम माझ्यावर पाळत ठेवून माझ्या कारवायांकडे बारकाईनं लक्ष देत असता तर  ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आणि खळ्ळ यांच्या काहीसं मध्ये ऐ च्ची ** असंही काहीसं त्याला ऐकू आलं असतं. पण तसं कोणी पाळत ठेवून नव्हतं. किंवा असलंच तरी त्यानं मला सांगितलं नव्हतं.

असा मी रविवार सकाळचा रम्य प्रहर (मला दुपारसुद्धा रम्यच वाटते. संध्याकाळ ऑफिशिअली रम्य असते अन् रात्रीचं तर …. असो. ) पकडून निवांत चहा पीत बसलो होतो. समोर उघड्या लॅपटॅपवर माईनक्राफ्ट चालू होता. ( माईनक्राफ्ट. खेळाडूच्या कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव देणारा, स्वयंप्रेरित नवनिर्मितीला चालना जेणारा असा हा अनन्यसाधारण खेळ सूज्ञाने खेळू नये. हा खेळ वेळ खातो.) लॅपटॉप आणि माझ्या मधे आपला एक कान एकवटून उभा तो कप. चहानं ओतप्रोत भरला नव्हता कारण काही घोट चहा मी घशाखाली घातला होता. उजवीकडे कोण्या एका डब्याच्या झाकणात तीन चार अस्वलं छोट्या कचोऱ्या ठेवलेल्या. (अस्वलं कुठून आली मधे देव जाणे.) माझा उजवा हात माऊसवर. तो तिथून हलवायचा कंटाळा. म्हणून मी माझा डावा हात उचलला पण निम्मं लक्ष खेळात. (कचोरी खायचं कसं बरोबर आठवतं?)

ड्राय कचोरी.

मला काही कळायच्या आतच पुढचं थरारक नाट्य घडलं. ( थरारक नाट्य म्हणे) माझ्या डावीकडून माझ्या उजवीकडे जाणाऱ्या माझ्या डाव्या हाताच्या उजव्या बाजूचा माझ्या पुढ्यात असलेल्या कपाच्या डाव्या बाजूला धक्का लागला. हाताच्या वेगामुळे कप उजवीकडे कलंडला. खरंतर लॅपटॉपवरच कलंडायचा पण त्याचा कान टेबललाला टेकला अन् नकळत कपाच्या अधःपतनाची दिशा बदललली. साधारण चार-पाच मिनिटांपूर्वी मायक्रोवेवमधे अडीच मिनिटे तापवलेल्या चहासहित तो कप माझ्या मांडीकडे झेपावला. एव्हाना त्यातील पानचट (दूध संपलं होतं…) चहा हिंदकळून इतःस्ततः पसरू पाहत होता. वर नमूद केल्याप्रमाणे तो ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आवाज आला तो इथेच!.

दरम्यान, या अचानक उद्धवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानं मला आई आठवली. पण ते स्वगत पूर्ण होण्याच्या आधीच मांडीवर उष्णतेची जाणीव होऊ लागल्यानं मी जागीच उडालो. स्वाभाविकच, मांडीवर स्थिरावू बघणारा तो कप फरशीकडे झेपावला आणि खळ्ळ (खरं तर टण्ण आणि खळ्ळ) आवाज करून दुभंगला. दुभंगला म्हणजे एकदम प्रॉप्पर दुभंगला, मोजून दोन तुकडे.

जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. फुटलेला कप फरशीवर निपचित पडला होता पण त्याच्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता. फरशीवर पसरलेला चहा निस्तरायचा की मांडीपशी गरम ओलाव्याची ऑकवर्ड (ऑकवर्डला मराठी शब्द मला माहीत होता… आठवत नाहीये अत्ता… सिरिअसली!!) जाणीव करून देणारी विजार बदलायची असा गहन प्रश्न मला भेडसावू लागला होता.

अखेर, कमरेशी बांधलेल्या नाडीला स्मरून त्या विजारीला तिच्या कर्तव्यातून मुक्त करण्यासाठी मी चहाच्या पानचट थारोळ्यातून बाहेर पडलो. मात्र त्या कपाची आठवण झाल्याशिवाय एक दिवसही गेला नाहीये. (कालच फोडलाय!)

 

~नॅकोबा

सर्वनाम

ते. त्यांच्या त्या आणि त्यांचे ते. त्यांचे आपापले मी. त्यांच्यातलेच दोन मी वेगवेगळे, आम्ही होऊ पाहणारे… कधीकधी त्यांना न समजताच सहजगत्या आम्ही झालेले… कधीकधी मात्र आपापल्या मी ला धरून ठेवण्याच्या फोल आग्रहात अडकलेले. कधी आम्ही इतका घट्ट की मी म्हणून खपून जाईल. कधी मात्र प्रश्न पडावा की मीच इतके वेगळे, आम्ही झालेच कसे. हे बघतो मी. मग जाणवतं. सर्वनामं जास्त झाल्येत.

मीपण वाढतंय आणि असे “मी”पण वाढलेत.

एपिसोड

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – शेजारी बेपत्ता झाल्याचं काय लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!

नायक- काका? गायब?? … ओह्….. त्याबद्दल बोलतोयस तू . हां ते गायब आहेत दोन दिवस झाले…

नायक- ओह् हो हो, म्हणजे तुला म्हणायचं होतं धीर सोडू नकोस….. मग ठीके, मला वाटलं

मित्र – मी तेच म्हणलो… तुला काय वाटलं?

नायक – कुठं काय, ( गडबडून, गंभीर होत) बाबा गायब आहेत रे !

बाहेरच्या दारातून आवाज – नाही पोरा मी परत आलोय.

( दारावर कॅमेरा, एकदा वरून, एकदा खालून एकदा डावीकडून. मग झूम इन, त्यानंतर झूम आऊट. ढिश् झिश् फिश् असा स्पेशल इफेक्ट, मग नुसतीच भिंत. मग चुकीची दुरुस्ती करायला लगबगीनं कॅमेरा दरवाज्यातील व्यक्तीकडे.)

नायक – बाबा तुम्ही? आई, बाबा आले बघ!

( सतार वगैरे वाद्यांसकट रेग्युलर आनंदी क्षण सूचित करणारा  आवाज… मित्र फोन कट करतो, आवाज बंद)

मित्र – ओह् सॉरी, तुमचं चालू द्या

(नायक बाबांच्या दिशेने स्लो मोशन, बाबांचे हात समोर, नायकाला मिठीत घेण्यासाठी,

टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,

पुन्हा नायक, स्लो मोशन. बाबा कंटाळून हात खाली घेतात, नायक पोहोचून मिठी मारणार तोच् )

आई-  तू????????????? तुझी हिंमत तरी कशी झाली इथे यायची? (मुलाकडे बघून) आहेच तिथेस थांब. या माणसाच्या सावलीसही  उभा राहू नकोस….

मित्र – तुम्हाला “आहेस तिथेच” म्हणायचंय का? कारण आहेच तिथेस असं काही नसतं या जगात.

नायक – (गोंधळून) आई??? बाबा??? ( वैतागून) आधीच नाही का सांगायचं…. बळंच चालायला लावलं राव, एक तर ही अवस्था…

मित्र – कोणती अवस्था

नायक – कुठं काय? बाबा आलेत बघ !

आई – हा माणूस तुझा बाप नाही!!!!

(कॅमेरा आईकडे. वरून, खालून, डावीकडून, विथ स्पेशल इफेक्ट… अचानक कॅमेरा धप्पकन् आडवा… सावरून सरळ, पुन्हा आईकडे.)

आई – हा नक्कीच तो. यांचा जुळा भाऊ. एकदा फसले,  दोनदा फसले,  आता  लक्षातही नाही कितीदा फसल्ये ते पण आता फसणार नाही.

नायक – (एकाच वेळी हताश, अन् आश्चर्यचकित) आई, काय बोलत्येस तू? कोण जुळा भाऊ, कोणी फसवलं कोणाला?

आई – अरे, सोडून दे, ते मनातल्या मनाल होतं.

नायक – अं?

आई- नायकाकडे पूर्ण दुर्लक्ष करून – अत्ताच्या अत्ता चालता हो…

(तेवढ्यात आणखी एक आवाज)

आवाज – मला वाटलंच, मी गायब झाल्याचं पाहून तू इथं येशील

(आवाजाकडे कॅमेरा, स्थिर, नुसतेच साऊंड इफेक्ट्स… अस्पष्ट कुजबूज …… अरे हलव की…. नाही जा…… चक्कर…… डॉक्टरांचं बिल…. एक शिवी….)

बाबा- तू??????

आई- तुम्ही???????

मित्र- काका???????

नायक- अं???

आवाज – होय, मी परत आलोय…

बाबा१ – (कुत्सित संतापासह) मी तुला रस्त्यावर आणीन…

बाबा२- (तितक्याच कुत्सितपणे) पण मी आत आलोच कुठंय.

नायक – हा काय प्रकार आहे

आई – जरा प्लॅन चुकला खरा… यानं खीर खायला उशीर केला म्हणून. नाहीतर एव्हाना हा डॉक्टरकडे गेला असता. मग मी, ह्यांचा जुळा हा, हे आणि ह्याचा हा.

ह्या दोघा जुळ्यांना एकमेकांत जुंपून आम्ही दोघं पळून गेलो असतो. अन् नंतर गॅसच्या स्फोटाची बातमी वाचून विमा खायला आलो असतो.

नायक- काय??????????????

मित्र- (गडबडून) अरे, येतो रे मी.

बाबा१- काय???????????????

बाबा२- (आधीच्याच कुत्सितपणे) गॅस संपलाय !!!

बाबा१ – रस्त्यावर आणीन तुला

आई- मी हेसुद्धा मोठ्यानं बोलले वाटतं… असंच होतंय हल्ली…

सुमी – तरीच स्फोट नाही झाला आजून…

(तेवढ्यात एक मोठा आवाज, कॅमेरा कॅलेंडरकडे, १२ डिसेंबर २०१२, वार मात्र रविवार… मग पाणीच पाणी, कॅमेरा हळूहळू डावीकडे सरकतोय. पाण्यातच वाळू, काही वनस्पती, एक मासा समोरून निघून जातो, मागे बुडबुडे सोडणारं यंत्रं… फेड टू ब्लॅक)

एक अतिशय वाईट उपमा

नाही, मी स्वयंपाक केला नाही. पण जर केला असताच मी उपमा तर जे काय झालं असतं त्याच्याशी आडून आडून ही पोस्ट निगडीत असू शकते. एक आपली वैधानिक सूचना इथेच देतो, की ही पोस्ट साधी सरळ नाही. वाचताना तिटकारा वगैरेही येऊ शकतो. ( तिटकारा चार तासांपेक्षा जास्त काळ राहिला तर थेट डॉक्टर गाठावा !!! ;) :D :P ) पण ही मुक्ताफळं आहेत. बऱ्यावाईटाच्या लबाड कल्पना त्यांना मान्य नाहीत.

तर, सुरूवात! कधी कधी असं होतं, की मनात विचार दाटून येतात. तक्रारखोर, सत्य नाकारू पाहणारे, प्रश्नार्थक पण उत्तर नसणारे, मीच का, असंच का असे नको तिथं खोलात जाऊ पाहणारे अनेक प्रकारचे विचार. मग वाटतं त्यातल्यात्यात ही भानगड समजू शकेल असं कोणी गाठावं अन् हे वळवळणारं गाठोडं त्याच्यासमोर मोकळं करावं. तो गोंगाट, ती खळबळ ओतावी भस्सकन समोरच्यावर अन् शांत व्हावं. पण मन बेक्कार असतं. आपल्यायाच इतके सतावणारे विचार, समोरच्यावर कसे लादावेत असा प्रश्न पाडतं. उगाच गाऱ्हाणी सांगून कोणाला बोर करावं असं आपल्या मनाला तेव्हाही वाटत नाही.

उगाच गाऱ्हाणी सांगून कोणाला बोर करावं असं आपल्या मनाला तेव्हाही वाटत नाही.

मान्य… पण

तहान लागली की पाणी प्यावं, भूक लागली की खावं, नुसतीच लागली की लवकरात लवकर जावं अन् सर्वात महत्वाचं म्हणजे वात उगाच आडवू नये. परिणाम गंभीर होतात.

समोरच्याला जरा वेळ नाक धरावं लागेल, पण तुम्ही मोकळे व्हाल. समोरचा जरा वैतागेल, पण जवळचा असेल तर आवर्जून पाचक देईल. ते महत्वाचं. आजच रात्री घ्या, सकाळी…. ओके !!!

मोकळे व्हा. शेवटी मनाला न पचलेल्या (पटलेल्या) गोष्टींची निष्पत्ती म्हणजेच हे विचार !

बिनबुडाचं

बिनबुडाचं विधान,
विधान सभा,
सभा त्याग,
त्यागाचं मार्केटिंग,
मार्केटिंग चेन,
चेन स्मोकिंग,
स्मोकिंग हॉट्

बिनबुडाचं विधान,
घागरी बूड,
खीर नाही खाल्ली,
पण खाणार खार,
खारीचा वाटा,
लाटणार साप
फाशांचं दान
शिडीला ताप

बिनबुडाचं विधान
बुडाला पाय
बुडत्याला काठी
आधाराला खांब
खांबात देव
देवाची शप्पथ
विधीलिखित

मांजर इतकं मऊ का असतं?

मांजर इतकं मऊ का असतं?


मांजर मऊ असतं का?
मांजर हा उपद्रव ठरू शकतं का?
उपद्रवी मांजरावर उतारा म्हणून मालकाने कोणता द्रव घ्यावा?
द्रवाचा अंमल जाणवत असताना मांजर मधे आल्यास काय होईल?

06052009462.jpg

तुम्ही मांजर पाळाल का?
तुम्ही आजून काय काय पाळाल ? (कुत्रा, ससा, कायदा, सिग्नल वगैरे…)
घरच्या मांजराचं महत्व किती?
कोणी एक धनू जर तिच्या घरधन्याने धावून धावून जमवलेल्या धनापैकी निम्मं धन घरच्या बन्या बोक्याच्या सुशोभितीकरणास खर्च करत असेल तर ते योग्य की अयोग्य?
हा धनी जर धनूच्या ताटाखालचं मांजर असेल तर परिस्थितीत काय फरक पडेल ?
धन्या आणि बन्यापैकी कोणत्या मांजराचा मालकिणीवर जास्त अधिकार असेल?
लग्नानंतर मुलीबरोबर तिचं पाळीव मांजर सासरी जाउ शकतं का?
तेव्हा त्या मांजराचं नाव बदलण्याबद्दल तुमची मतं काय?
व्याहीभोजनात मांजराची जागा कुठे?

हे आणि यासारखे बरेच प्रश्न मला उगाच पडतात…
काही दिवसांपूर्वी एके कम्युनिटिवर हा टॉपिक टाकला होता. काळाच्या ओघात तो उडाला. बरेच दिवस तो ईमेलमधे टिकून होता, आज म्हणलं इकडे टाकावा. तेवढीच थोडी मज्जा !

22012009319.jpg

आपला,

~नॅकोबा

चड्डी

काय हे ! चड्डी या नावानी पोस्ट टाकतं का कोणी… आणि टाकावी तरी का? चार लोक (सूज्ञ लोक) भेटले तर या विषयावर साधं बोलतही नाहीत. सार्वजनिक चर्चा नाहीत, परिसंवाद नाहीत, रियॅलिटी शो नाही… मग कोणी पोस्ट तरी का टाकावी? टीव्हीवर आणि सिनेमात बरेचदा डोळ्यांसमोर ढळढळीतपणे दिसत असतानाही कोणी हिच्याबद्दल उघडपणे चारचौघात बोलत नाही. एवढ्या परिचयाच्या आणि ओळखीच्या वस्तूला असं अनुल्लेखानं का मारतो आपण ?

कधी गूगल वर ‘चड्डी’ सर्च मारून पाहिलाय ?? ( का मारून पहाल या तपशीलाकडे आपण सध्या दुर्लक्ष करू… ) 76,700 गोष्टी सापडतात गूगल ला… आता लगेच सर्च मारून पाहू नका. फारसे काही चांगले निकाल नाईयेत…. मला पहिल्या पानावर किमान एक तरी लिंक अपेक्षित होती जी सुपरमॅन या संदीप खरेच्या सुपरमॅन गाण्याच्या लिरिक्सकडे नेत असेल. पण कसलं काय… कवितांव्यतिरिक्त लोकांना बरंच काय काय वाचायला आवडतं असं दिसतं एकूण. आपण कोण बुवा बोलणारे… शेवटी म्हणतात ते खरंच आहे… ये अंदर की बात है !

मटका

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.

असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात. एखादी गोष्ट करताना “काय मेली कटकट” किंवा “करून मोकळं व्हावं” या भावनेने काहीतरी करायला जातो आणि नेमकी तीच गोष्ट वाहवा मिळवून जाते. आणि मग आपण “अत्ता नक्की काय घडलं” या गहन प्रश्नात बुडून जातो. आज असंच काहीतरी घडलं.

आम्ही आठवड्याच्या आठवड्याला काय काम केलं याचा वीकली स्टेटस रिपोर्ट पाठवतो. प्रत्येक चेकइन, प्रत्येक बग फिक्स आणि मीटिंग्जमधे तेच तेच डिस्कस केल्यानं शुक्रवारी किंवा वीकेंडदरम्यान पुन्हा त्या सर्व गोष्टींची यादी करून पाठवणं नको होतं आणि केवळ नियम म्हणून पाळलं जातं. आज रविवार संपत आला बघून मी नेहेमीच्या सवयीने माझ्या चेक इन्स चे मेल्स काढले आणि त्यातल्या कॉमेंट्स कॉपी पेस्ट करून यादी केली, सध्या करत असलेल्या टास्कचा क्रमांक आणि शीर्षक कॉपी करून ते काम यादीत टाकलं, बग डेटाबेस मधून चार-पाच कामं कॉपी करून पुढच्या आठवड्यातल्या कामांची यादी टाकली आणि गूगल कॅलेंडरवरून मागच्या आठवड्यातल्या सगळ्या मीटिंग्जची यादी पेस्ट केली. दर आठवड्याला मी हेच करत आलोय, आज जरा एक-एक ओळ जास्त लिहिली इतकंच. त्या ओळीनं काय जादू  केली देव जाणे पण रिपोर्टच्या तासाभरातच डेव्ह लीड चा सर्वांना उद्देशून रिप्लाय आला की स्टेटस रिपोर्ट्स मधून आम्हाला नेमकं हेच अपेक्षित असतं. या असल्या प्रकारालाच गेमर टर्मिनॉलॉजीत मटका म्हणतात. रिप्लाय वाचून छान वाटलं. आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक रिपोर्टमधे हा एका ओळीचा वाढीव तपशील लिहिणार. नाईलाज आहे, कन्सिस्टन्सी टिकवली पाहिजे.

अशीच गंमत एकदा माझ्या एका सहकाऱ्याच्या बाबतीत घडली होती. आमच्या दोन टीम्स ना एक दिवस अचानक “एच आर्” टास्क म्हणून गेल्या आठ महिन्यांमधल्या कामांचा एक रिपोर्ट करायला सांगितला. तेव्हा मी आणि माझ्याबरोबरचे जवळजवळ सर्व सहकारी नवीन होतो आणि तेव्हा स्टेटस रिपोर्ट लिहिणे हा प्रकारही नव्हता. रोजच्यारोज स्काईप क़ॉल्सवरून प्रगतीचा आढावा घेतला जायचा त्यामुळे कोणालाच त्या प्रोसेसची गरज भासली नाही. कामं वेगानं आणि चोख पुढे सरकत होती त्यामुळे सर्व काही अलबेल होतं. आता अचानक आठ महिन्यांचं काम आणि त्यात वेळही कमी. आम्ही काहीबाही लिहून दिलं. लवकरच कळलं की दुसऱ्या टीममधल्या एकाचा रिपोर्ट आदर्श झालाय. मी कुतूहलानं त्याला विचारायला गेलो तर खांदे उडवून तो म्हणाला “मलाही नक्की माहित नाही मी काय केलं, पाठवलं एवढं नक्की पण त्यातलं नक्की काय आवडलं हे मलाही रहस्यच आहे.”

आपला,

नॅकोबा !

दिवस घालवला उठारेठी

माझ्या आईची आवडती म्हण आहे, “दिवस घालवला उठारेठी, चांदण्याखाली कापूसवाटी…”. एक आजी सोडली तर आमच्या घरच्या सगळ्यांना ही म्हण व्यवस्थित लागू होते. दिवसा वेळ नसतो असं नाही. वेळ पुष्कळ असतो पण तो नको तिथे वाया जातो किंवा कधीकधी जाणूनबुजून इकडेतिकडे घालवण्यात येतो. मग दिवस संपत आला, की बसतो आम्ही जागत, दिवसाचा बॅकलॉग भरत.

दिवस, विशेषकरून रविवार घालवण्याची सवय (किवा हौस) काही केल्या सुटत नाही. दुपारी पूर्ण वेळ मोकळा असताना मी इकडे एखादा पोस्ट लिहू शकलो असतो. दुपारी काय केलं? काही नाही. जेवण झाल्यानंतर टीव्ही पाहिला, डेक्सटर या अप्रतीम मालिकेचा तिसरा अंक बघायला सुरुवात केली, तेही झाल्यावर इंटरनेटवर आचरटपणा केला, त्याही नंतर प्लेस्टेशन वर मनसोक्त गेम खेळलो, बाहेर उंडारून आलो.

भात लावणं, भाडं भरणं, आणि वेबकॅमवरून माझ्यासोबत बोलण्यास सज्ज मामेभावंडांशी अख्खा दीड-एक तास घरभर बागडत झालेलं बोलणं या मोजक्या गोष्टी सो़डल्या तर दुपारपासूनचा वेळ  अगदीच यांव गेला. आता, झोपण्यापूर्वी बघतोय ऑफिसच्या मेल्स… करतोय कामं… टाकतोय पोस्ट्स्…

चालायचंच, शेवटी आवड आपली आपली !

आपला, (आय टी प्रमाणवेळेनुसार पहाटे झोपी जाण्यास सज्ज)
~नॅकोबा.

हुक्की

आज ब्लॉगपोस्ट करायची मजबूत हुक्की आलीय… हुक्की, साधीसुधी इच्छा नाही तर चक्क हुक्की. एरवी मधून अधून होत असते इच्छा, इथे काहीतरी लिहायची पण या ना त्या कारणानी दुर्लक्ष होतं. आज मात्र या इच्छेचा वेग प्रचंड आहे. काहीतरी खरडल्याशिवाय राहावत नाईये.

लिहायचा विचार डोक्यात आला की वाट्टेल ते लिहिता येईल असं वाटतं पण प्रत्यक्षात कीबोर्ड बडवायला बसलं की विचाराचा पोपट होऊन भुर्रर्र उडून जातो. मांजरं, नुकत्याच पाहिलेल्या अमेरिकन सिरीयल्स, जून पासून मागे लागलेला आणि नोव्हेंबरमधे पुण्यात वैताग आणल्यानंतर इथे कॅलिफोर्नियातही माझा पिच्छा न सोडलेला पाऊस, चावट विचार, गंभीर विचार, सचिन तेंडुलरकचं नुकतंच झालेलं एकमेवाद्वितीय विश्वविक्रमी द्विशतक, परत एकदा मांजरं असे अनेक विचार एकापोठोपाठ येतात आणि एकमेकांशी भांडून तरातरा निघून जातात आणि त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्या डोक्यात तरंगत राहतात. मग “श्या !!!” (ट)  काही लिहिताच येत नाही आपल्याला ब्लॉगवर असं वाटत राहातं. विचारांना पकडून जेरबंद करायचा विचारही कधीकधी येतो पण तोही स्वतःचा स्वार्थ साधून बरोबर आळसाला पुढे करतो. अशी पंचाईत आहे.

पण ऐसा कैसा चलेंगा ना??? इतके दिवस (म्हणजे पुण्यात असताना) बऱ्याच निरर्थक विचारांना तोंडामार्फत बाहेची वाट दाखवल्ये. या ब्लॉगच्या सुरूवातीमागचा उद्देशही हाच होता की मनात येईल ते बरंचसं निरर्थक आणि कधीकधी सार्थ असं इथे मांडावं. आळस आपली टांग मधेमधे घालतो ना…… मग जेव्हा असं उजाडतं तेव्हा ठरवतो आता रोज काहीतरी लिहायचं न विसरता. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

चालायचंच…

चहाची हुक्की फिटल्यानंतर पुढच्या चहाची चिंता करायची नसते.

आपला,

~नॅकोबा