आज लिहायला विशेष काही सुचत नाहीये म्हणून काही फोटो अपलोड करणार आहे…

सकाळ
सकाळ, लख्ख प्रकाश, झाडाच्या फांद्यांतून येणारे उन्हाचे कवडसे… नुसतं बाहेर बघितलं की शांत, स्वच्छ, प्रसन्न वाटतं.
उन्हाच्या कवडशांचं मला शाळेपासून कौतुक. लहान असताना काहीही केलं तरी मजा येते. कोणतीही परावर्तक वस्तू आणि एक मांजराचं पिल्लू [:D] किंवा कागद, पालापाचोळा आणि भिंग असे बरेच उद्योग कवडशांच्या सहाय्याने केलेत. प्लॅस्टिकची पट्टी उन्हात उभी ठेवून समोरच्या भिंतीवर इंद्रधनुष्य काढायला मजा यायची.
एकदा मात्र उन आणि भिंग घेउन मी एक गादी जवळजवळ पेटवली होती. सुदैवाने आई त्याच खोलीच होती, जळका वास येताच योग्य ती पावलं उचलण्यात आली. मला तर गालावर वेगवान हाताची अपेक्षा होती, तसं काही झालं नाही मात्र भिंगावर बरेच निर्बंध आले.

प्लेस्टेशन कंट्रोलर
प्लेस्टेशन 3: मनोरंजन आणि खेळांचा खजिना. या फोटोत आहे तो या प्लेस्टेशनचा कंट्रोलर. (तोही उन्हाच्या कवडशांत) [:D] खिशात मावेल अशा पॉकेट व्हिडीओ गेम पासून मला लागलेलं या इलेक्ट्रॉनिक खेळांचं वेड आजूनही कायम आहे. (साधारण गेली चौदा पंधरा वर्षं.) आधी पॉकेट व्हिडीओ गेम, नंतर ब्रिक्स, मग टीव्ही गेम त्यानंतर संगणक आणि त्याच्यावरचे गेम, कॅफेत जाऊन मित्रांबरोबर तासन् तास खेळण्यात घालवलेला वेळ यानंतर हा प्लेस्टेशन.
चित्रपट आणि अॅनिमेशन्सना लाजवतील इतके नेत्रदीपक आणि उत्कंठावर्धक खेळ या प्लेस्टेशन वर खेळता येतात, यातील ब्लू रे प्लेअर वर सीडी-डीव्हीडीही बघता येतात. सध्यातरी याचा उपयोग मी नेटफ्लिक्स् वरून निरनिराळे चित्रपट आणि मालिका बघण्यासाठी करतोय.
असा एखादातरी गेमिग कन्सोल असावा अशी बरेच दिवसांपासून इच्छा होती पण भारतात असेपर्यंत एवढ्या किंमतीची वस्तू केवळ खेळण्यासाठी घ्यायची हे पालकांना पटवून देणं माझ्या आवाक्याच्याबाहेरचं होतं.

मउमउ चपला

रेलिंग
हे दोन असेच उगाच…
चपलांनी पायाला छान गुब्बू गुब्बू वाटतं. [:D]
आणि वेळ जात नसेल तर माणूस काहीही करतो…
आपला,
नॅकोबा