आयपॅड

काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :

वाईट :

  1. मल्टिटास्किंगचा अभाव : यावर एका वेळी एकच अॅप्लिकेशन चालतं. आयपॅड हा फक्त एक मोठ्ठा आयपॅड आहे असं वाटण्याचं हे महत्वाचं कारण.
  2. फ्लॅश चालत नाही : HTML5 उंबरठ्यावर उभं असताना खरंचर याची चिंता करायची गरज नाही पण यावर फ्लॅश मधले गेम्स खेळता येणार नाहीत हे ऐकून बघून वाईट वाटतंच.
  3. सुळसुळीत कीबोर्ड : काचेवर टंकायची सवय होईपर्यंत याचा कीबोर्ड तसा वापरायला झुळझुळीत आहे.
  4. देवनागरी कीबोर्ड उपलब्ध नाही  : यावर देवनागरी नीट चालत नाही, दिसतही नाही, वेलांटीचा आणि जोडाक्षरांचा जरा प्रॉब्लेम आहे. टंकलेखनासाठी थेट कीबोर्डही उपलब्ध नाही. ती सोय मिळवण्यासाठी काही जुगाड करावे लागण्याची  शक्यता आहे.

बऱ्या :

  1. सुटसुटीत : याचं वजन एखाद्या मध्यम आकाराच्या पुस्तकाएवढं आहे. एकूण आकारही असा आहे की फार वेळ हातात धरलं तरी त्रास होणार नाही.
  2. मोठा पडदा : आयपॅडचा पडदा (स्क्रीन) हा  आयपॉडपेक्षा जवळजवळ चौपट मोठा आहे. अॅपलची अॅप्लिकेशन्स या उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करतात. गेम्स खेळायला हा आकार उत्तम आहे तसंच एखादं पुस्तक वाचायलाही सोयिस्कर आहे. मी आयपॉडवर पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता पण तो आकार फारच छोटा पडतो. आयपॅड उभं धरलं की एका साधारण पुस्तकाच्या पानाइतका मजकूर पडद्यावर असतो. पुस्तक वाचायचा अनुभव टिकून राहतो.
  3. सिनेमे बघण्यास उत्तम : गादीवर पडून चित्रपट बघण्यासाठी हा सर्वोत्तम प्रकार आहे. यावर यूट्यूब बघता येतं, आय-ट्यून्स मधून ओतलेले सिनेमे बघता येतात तसंच नेटफ्लिक्स ऑनलाईन बघण्यासाठीही एक मोफत अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे.

माझा निष्कर्ष :

सध्या थोडं थांबायला हरकत नाही. पुढच्या पिढीतील (नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट वर्जन) आयपॅड्समधे काही वाढीन सोयी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आयपॉड किंवा आयफोनवर सहज भागेल. (शिवाय आयफोन गेल्याच महिन्यात घेतलाय..)

आपला,

~नॅकोबा

(एक सरळ अर्थाची, एक विषय धरून आणि अव्रात्य पोस्ट… काही खरं नाही… निमूटपणे झोपलेलं बरं.)

चित्रपटपूर्ण रविवार

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि शेवटी जुन्या कृष्णधवल  अॅडम्स फॅमिलीचा एक एपिसोड अशी मस्त मॅरॅथॉन झाली. व्हांटेज पॉइंट एक वेगवान आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन. मी तो चित्रपट आजून किमान चारदा पहायची शक्यता आहे.*

चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी पाचसहा वर्षांचा असेन. मामाकडे व्हीसीआरवर कॅसेट भाड्यानं आणून पाहिला होता. एक तर मी खूप लहान होतो आणि पाहता पाहता झोपलो पण होतो (हे बरं आठवतंय) त्यामुळे चित्रपट लक्षात नव्हता पण नंतर या गोष्टीची मी कैक वेळा पारायणं केली होती. लहानपणीची ती एक आवडती गोष्ट इतक्या वर्षांनी परत पाहताना फार मस्तं वाटलं.

ही कथाच मुळात लहान मुलांसाठी आहे. एक विक्षिप्त संशोधक प्रोफेसर पॉट्स, त्याची दोन मुलं , त्यांना भेटणारी ट्रुली स्क्रंप्शस आणि त्यांची एक गाडी यांची ही गोष्ट. मुलांच्या आवडीखातर प्रोफेसर एक जुनी गाडी आणतात आणि तिची डागडुजी करून तिला नवं रूप देतात. या रूपांतरणात गाडीत काही सुरस व चमत्कारिक बदल होतात आणि अशी ही अफाट गाडी एका दुष्ट राजाच्या मनात भरते. त्यानंतर गुप्तहेर, प्रोफेसरांच्या वडिलांचं अपहरण, उडत्या गाडीनं केलेला पाठलाग आणि अखेर  त्या दुष्ट राजाराणीपासून जनतेची सुटका असा साहसप्रवास हा चित्रपट घडवतो.

साठच्या दशकातला हा एक ब्रिटिश चित्रपट. हिंदी चित्रपटांप्रमाणे यात दर काही मिनिटांच्या अंतरावर मस्तपैकी नाच आणि गाणी आहेत. इंग्रजी चित्रपटांत आजवरतरी असं काही बघायला मिळालं नव्हतं. या वेगळेपणामुळे आजूनच मजा आली.

हेच लहानपण पुढे चालू द्यावं म्हणून स्कूबी-डू चाही एक चित्रपट बघून टाकला. हा आधीही पाहिला होता पण परत एकता बघताना बरं वाटलं. तिकडूनच पुढे नेटफ्लिक्सवर चाळता चाळता अॅडम्स फॅमिलीचे जुने एपिसोड्स दिसले. कार्टून नेटवर्कवर याची अॅनिमेटेड सीरीज बघितली होती त्याचं मूळ कसं आहे हे बघावं म्हणून पहिला एपिसोड बघून टाकला. आठवडा दोन आठवड्यात सीझन संपवून टाकीन म्हणतो.

डोळ्यांना असा अथक त्रास दिल्यानंतर रात्री निमूटपणे देव-डी आणि रॉक ऑनची गाणी ऐकत बसलो. रात्रीच्या जेवणाची आणि उद्याच्या डब्याची सोय केली. आमटी आजही बरी जमली, सलग दुसऱ्यांदा, म्हणजे मटका नसावा…

आता झोपतो, उद्या ऑफिस आहे आणि मांजरही मऊ आहे.

आपला,
~नॅकोबा

*वाचकांस नम्र विनंती, चित्रपटांच्या आवडींबाबत लेखकावर विश्वास ठेवताना खालील बाब जरूर लक्षात घ्यावी :
सदर पोस्टच्या लेखकाने ‘टशन’ हा चित्रपट आपल्याला आवडल्याचे व तो दोनदा आणि तेही थिएटरमधे पाहिला असल्याचे कबूल केले आहे.

चित्रपट – जनरल आवड

आज उगाचच जरा आवडत्या चित्रपटांबद्दल लिहावसं वाटलं म्हणून ही पोस्ट. सध्या नेटफ्लिक्स वर बरेच इंग्रजी चित्रपट बघणं चाललंय पण बऱ्याच दिवसात हिंदी चित्रपट पाहिला नाही.पुण्यात सिटीप्राईड कोथरूड घरापासून अगदीच पाच मिनिटांवर असल्यानं महिन्यातून किमान दोन तरी चित्रपट पाहून व्हायचे. गेल्या महिन्यात “रण” पाहिला, आवडला. रोड, मूवी पाहायची फार इच्छा आहे पण कोण जाणे का, डाऊनलोड करावासा वाटत नाहीये.

सध्याच्या एकूण नायिकांपैकी मला नक्की कोण आवडतं हे माझं मलाच नक्की माहित नाही. बहुदा कोणीच नाही. पण नायकांबद्दल मात्र माझी काही सिलेक्शन्स आहेत.  खानावळीपैकी एक आमिर खान सोडला तर बाकी कोणात फारसा अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आमिरने स्वतःची हवा निर्माण केलीय आणि ती टिकवून ठेवलीय. हल्ली तो जे काय करतो त्याबद्दल एक उत्सुकता असते आणि वर्षातून एकदा जे काही बघायला मिळतं ते वसूल असतं.

अभय देओलचे चित्रपट मला आवडतात. काहीतरी वेगळं बघितल्यासारखं वाटतं. बाकी कोणी काहीही म्हणो, देव-डी मला मनापासून आवडला. श्रेयस आणि रितेशला काही चांगल्या भूमिकांमधे बघूनही बरं वाटतं. राहुल बोसही मधूनअधून एखाद्या हट के सिनेमात दिसतो. झंकार बीट्स हा मला आवडत्या चित्रपटांपैकी एक. रॉक ऑन आवडला खरा पण तो बघताना नकळत कुठेतरी झंकार बीट्स ची छबी उमटत होती. रॉक ऑन मधली गाणी पण आवडली पण खऱ्या अर्थानं हिंदी रॉक म्हणाल तर देव-डी मधलं इमोशनल अत्याचार – रॉक वर्जन जिंकून जातं. देव-डी मधली इतर गाणी (इमोशनल अत्याचार – ब्रास बॅंड, परदेसी, नयन तरसे, दुनिया) हीसुद्धा सिनेमात मिसळून जातात.

राहुल बोस, के के मेनन, रणवीर शौरी, विनय पाठक, रजत कपूर वगैरे मंडळी असली की सिनेमा बघावासा वाटतो. शौर्य, खोसला का घोसला, भेजा फ्राय हे सिनेमे यांच्यामुळे लक्षात राहतात.

रोड, मूवी पहायची इच्छा पोस्ट लिहिता लिहिता वाढत चालल्ये. काहीतरी सोय केलीच पाहिजे.

आपला

~नॅकोबा

असेच काही फोटो

आज लिहायला विशेष काही सुचत नाहीये म्हणून काही फोटो अपलोड करणार आहे…

सकाळ

सकाळ

सकाळ, लख्ख प्रकाश, झाडाच्या फांद्यांतून येणारे उन्हाचे कवडसे… नुसतं बाहेर बघितलं की शांत, स्वच्छ, प्रसन्न वाटतं.

उन्हाच्या कवडशांचं मला शाळेपासून कौतुक. लहान असताना काहीही केलं तरी मजा येते. कोणतीही परावर्तक वस्तू आणि एक मांजराचं पिल्लू [:D] किंवा कागद, पालापाचोळा आणि भिंग असे बरेच उद्योग कवडशांच्या सहाय्याने केलेत. प्लॅस्टिकची पट्टी उन्हात उभी ठेवून समोरच्या भिंतीवर इंद्रधनुष्य काढायला मजा यायची.

एकदा मात्र उन आणि भिंग घेउन मी एक गादी जवळजवळ पेटवली होती. सुदैवाने आई त्याच खोलीच होती, जळका वास येताच योग्य ती पावलं उचलण्यात आली. मला तर गालावर वेगवान हाताची अपेक्षा होती, तसं काही झालं नाही मात्र भिंगावर बरेच निर्बंध आले.

प्सेस्टेशन कंट्रोलर

प्लेस्टेशन कंट्रोलर

प्लेस्टेशन 3: मनोरंजन आणि खेळांचा खजिना. या फोटोत आहे तो या प्लेस्टेशनचा कंट्रोलर. (तोही उन्हाच्या कवडशांत) [:D]  खिशात मावेल अशा पॉकेट व्हिडीओ गेम पासून मला लागलेलं या इलेक्ट्रॉनिक खेळांचं वेड आजूनही कायम आहे. (साधारण गेली चौदा पंधरा वर्षं.) आधी पॉकेट व्हिडीओ गेम, नंतर ब्रिक्स, मग टीव्ही गेम त्यानंतर संगणक आणि त्याच्यावरचे गेम, कॅफेत जाऊन मित्रांबरोबर तासन् तास खेळण्यात घालवलेला वेळ यानंतर हा प्लेस्टेशन.

चित्रपट आणि अॅनिमेशन्सना लाजवतील इतके नेत्रदीपक आणि उत्कंठावर्धक खेळ  या प्लेस्टेशन वर खेळता येतात, यातील  ब्लू रे प्लेअर वर सीडी-डीव्हीडीही बघता येतात. सध्यातरी याचा उपयोग मी नेटफ्लिक्स् वरून निरनिराळे चित्रपट आणि मालिका बघण्यासाठी करतोय.

असा एखादातरी गेमिग कन्सोल असावा अशी बरेच दिवसांपासून इच्छा होती पण भारतात असेपर्यंत एवढ्या किंमतीची वस्तू केवळ खेळण्यासाठी घ्यायची हे पालकांना पटवून देणं माझ्या आवाक्याच्याबाहेरचं होतं.

मउमउ चपला

रेलिंग

रेलिंग

हे दोन असेच उगाच…

चपलांनी पायाला छान गुब्बू गुब्बू वाटतं. [:D]

आणि वेळ जात नसेल तर माणूस काहीही करतो…  

आपला,

नॅकोबा