एक खोली, उजवीकडेही एक खोली असावी, दरवाजा नाही पण त्या खोलीत स्पष्ट अंधार आहे. या खोलीतही एकूणच मंद प्रकाश. हिरवट निळसर भिंत, अशा खोलीत आपण एकटेच. आपल्याच उद्योगात… अचानक आपल्याला दाराशी एक आजीबाई दिसतात. जवळच्याच कुटुंबातील सदस्य असाव्यात… ही खोलीची दुसरी बाजू, बाहेर जाणारी. त्या आजीबाई तिथेच बसतात, ठाण मांडून… चुकल्यात वाटतं… आपल्याशी काहीतरी बोलतात. आपण मख्ख, यांना आपण ओळखतो का याच विचारात.
काही वेळाने या बाई तरातरा निघून जातात. आपण चिंतेत. कोण होत्या, कुठे जात असतील… आपण त्यांच्या पाठलागाला लागतो. एक माणूस पळत येतोय आपल्याच दिशेने… घाबरलाय… काय होतं कोण जाणे पण आपणही त्याच्याच दिशेने पळायला लागतो. त्याला गाठतो, मागेही टाकतो. पण आता त्या आजीबाईचा पत्ता नाही… आसपास कुत्री मात्र दिसू लागल्येत. आपण आपल्य़ा नेहेमीच्या पळण्याच्या वेगापेक्षा फारच जोरात धावतोय… फारच कुत्री आहेत, पळायला सुरूवात केली तिकडेच चूक झाली, काही आता आपला पाठलाग करताहेत, काही नुसतीच एकमेकांमागे धावताहेत… डोळे मिटतात, थोडाच वेळ
मंद श्वास चालू आहे… परत आपण खोलीत.काहीतरी जड सभोवती जाणवतंय खोली आहे तशीच फक्त आता जरा बदललीय, आधीपेक्षाही वाईट. अचानक तसबिरी आल्यात चेहेरा नीटसा आठवत नाही पण या आजीबाई बहुतेक त्या मगाच्याच. खोलीची प्रकाशयोजना बदलत्ये… तितकीच मंद पण आता प्रकाशाचा स्त्रोत अधिक स्पष्ट, हा प्रकाश भिंतीतून येतोय, किंवा तसबिरीतून तरी. आपण भराभर नजर फिरवतोय खोलीभर,
काहीतरी योग्य नाही अशी जाणीव, काय करावं… इथून बाहेर पडलं पाहिजे… वरती एक कुटुंब आहे… निदान तिकडे तरी पोहोचावं… तेवढीच सोबत. भास होताहेत सांगावं त्यांना. जरा धीर तरी मिळेल. तसबिरींच्या काही भागात चंदेरी चमक, नजर आता बाहेरच्या बाजूस वळू बघणाऱ्या… तसबिरीत एक अनोळखी बाई, आपण बहुदा तिला फारसे आवडलो नसू असे भाव तिच्या चेहेऱ्यावर… अरे ती हलली की काय… अरे देवा ! हा काय प्रकार आहे. बाहेरच्या दिशेने आपण पळू पाहतोय. कसला वेग आणि कसलं काय, आपल्याला हव्या त्या दिशेत हालतोय एवढं खरं…
नजर मंदावत्ये हालचाल जड. चालणं कसलं हे तर तरंगतोय आपण, कोणत्यातरी प्रचंड दबावाच्या वातावरणात आपण कसेबसे तरंगत, स्वतःला ओढत जिन्याकडे चाललोय. हा जिना पण नेमका सगळ्यांपेक्षा वेगळा… लोखंडी, चक्राकार वळणाने वर जाणारा… आधी कसं नाही आलं लक्षात. एव्हाना लहानपणापासून ऐकलेल्या देवांची, संतांची आणि स्तोत्रांची आठवण होऊ लागलेली, नामस्मरण सुरू झालेलं… मगाशी त्या आजीबाईसमोरच घडाघडा हनुमानस्तोत्र म्हणायला हवं होतं या विचाराने तेव्हाही हसू… मनातल्या मनातच बहुतेक, चेहेऱ्यावर उमटलं नसावं. आत्ता कसा दिसतोय देव जाणे… देव… देवा, फक्त वरच्या मजल्यावर… नजर मंदावत्ये, श्वास घेणं जड, श्वासासाठी धडपड, जिन्यावरून आगेकूच सुरूच आणि मनात उमटणारे देवही तसेच, तिथेच… बहुतेक तेच आपल्याला पुढे नेत आहेत. आपली नजर त्या दाराकडे, मागे बघायची तर हिंमतही नाही आणि कारणही…
आता दबाव कमी होऊ लागलेला पण हातपाय जवळजवळ बांधले गेले असावेत, दार उघडायला सांगावं कसं… एवढ्यात काकू दार उघडतात, त्यांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह. त्यांच्या घरी कसलातरी विधी असावा, कोणी गुरूजी आलेले. काय हायसं वाटतंय त्यांना बघून… आपण अजूनही दारातच, कसल्याश्या पिंजऱ्यात असल्याची जाणीव. चालण्याचा प्रयत्न पण त्यात फारसं यश नाही. पिंजरा मधे येतोय. काकू आणि गुरूजी आपल्याला आत घेऊन येतात, बहुदा आपण आजूनही तरंगतच आहोत… दार बंद…
इकडे आजूनही काही माणसे दिसताहेत, सुदैवाने सतबिरींतील कोणीही नाही. गुरूजी त्या पिंजऱ्याचं अवलोकन करताहेत. थोडा वेळ.. गुरूजी आपल्या कामाकडे परत वळलेले, प्रत्येकाला घाई असावी बहुदा. आपण अजूनही त्याच जागी. शून्य विचार, शून्य अवलोकन. मनाची एकूणच शून्य स्थिती.मधे कधीतरी पिंजरा गायब झाला असावा, काकू आता आपल्याला सोफ्याकडे नेऊन बसायला सांगतायत. आता दबाव नाही, श्वास नीट, डोळे मिटलेले.
खाड्कन जाग… काय खतरनाक स्वप्न पडलं अत्ता मला. भितीदायक चित्रपट किंवा एखाद अनपेक्षित अनुभव म्हणा. तापामुळे आज घरीच होतो. दुपारच्या झोपेत हे स्वप्न. उठल्यावर मात्र प्रचंड मोकळं आणि प्रसन्न वाटलं. मधे वेगास ला सहलीला गेलो असतानाही असंच एक गंमतजंमत स्वप्न पडलं होतं तेव्हाही उठल्यावर असंच शांत आणि आनंदी वाटलं होतं.
स्वप्न… हुश्श्…..
आपला, (आपल्याच स्वप्नात टरकलेला)
~नॅकोबा