बकुळीची फुलं

“हे बघून तू वेडा होणारेस!!!” सॅकमधून पाचपंचवीस सीड्यांचे दोन मनोरे बाहेर काढत स्वप्नील.

“भेंडी !!!! चिन्याचं कलेक्शन????? कडक !!!!!!” केतनचा गेम पॉझ.

“हाहा. काल काकूंनी यातून डीडीएलजे ऑलमोस्ट लावलाच होता. चिन्या पण हुशार! सीडी बाहेर ठेवली होती काढून!!!”

“हाहाहा, घोडा !”

“बेक्कार घोडा !!! फक्त पीसीवरच चालतो म्हणून कसंबसं कटवलं त्यानं. रिस्की आहे म्हणतो आता घरी ठेवणं. ”

“कूल” केतन परत खेळाकडे. “पाच मिनिटात उठवतो याला, शेवटचा राहिलाय, चिंधीगिरी करत लपून बसलाय कुठेतरी”

“ही पाहिल्येस का?” स्वप्नीलच्या हातात उभी चकती, चेहेऱ्यावरील भाव अवर्णनीय.

“अं?” गेमवरचं लक्ष साधारण अर्धा सेकंद विचलित. एक कटाक्ष. “हं” दुसरा कटाक्ष, यावेळी दीड सेकंद. “हो. अरेबिअन नाईट्स स्टार्ट !” पुन्हा गेमकडे.

“ही??”

“अं… हो” यावेळी आवलोकनासाठी दोन पू्र्ण सेकंद. किंचित वैताग “चिन्याचं ऑलमोस्ट सगळं कलेक्षन पाहिलंय, जुनं आहे.”

“आईला, लोण्याची सीडी ! हिचाच किस्सा झालेला नं?”

“हो, तुला माहीत नाही” उत्तराची वाट न बघता “हाहा, अल्टिमेट किस्सा. बघता बघता दिवे गेले.  नंतर संध्याकाळी क्लासनंतर आम्ही त्याच्याघरी गेलो तर काका फुल मिशीतल्या मिशीत हसत होते. त्याला सुमडीत म्हणाले. आपल्याकडे एकच कॉम्प्युटर आहे, आणि आई ताईही तोच वापरतात, तर जरा जपून… कसं? ” केतन, गेमपासून एक लक्ष कणभरही विचलित होऊ न देता.

“मग??” हातातलं काम सध्या थांबलेलं.

“मग लोण्या फुल्ल कव्हर करायला लागला. काय म्हणताय बाबा, काही माहितीच नाही वगैरे. फुल पळापळ झालेली त्याची. तर त्याचे बाबा सुरूच झाले… ‘एकदा ना दोन उश्या असतात’ !!! आईश्शप्पथ अरे. त्याची सुरूवात आहे तशी. लोण्या गारच पडला ! मीपण नंतर बरेच दिवस च्यायला  बघायचोच नाही काकांकडे. शेजारी उभा होतो अरे मी हा अख्खा डायलॉग झाला तेव्हा. बेक्कार ऑकवर्ड च्यायला!!”

थोडा वेळ शांतता, एकीकडे गेम चालू, दुसरीकडे सीड्या चाळणं सुरू.  शाळकरी दप्तर घेऊन केतनचा धाकटा भाऊ आत. “आईssल्ला, नवीन गेम्स ???”

“नाही रे, कॉलेज प्रोजेक्टचं काम आहे.” केतन, लक्ष अविचलित

“प्रोजेक्ट” स्वप्निल… सीड्या पुन्हा मनोऱ्यांमधे डकवून सॅककडे रवाना.

—– इति. —-

नॅकोबा !

एपिसोड

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – शेजारी बेपत्ता झाल्याचं काय लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!

नायक- काका? गायब?? … ओह्….. त्याबद्दल बोलतोयस तू . हां ते गायब आहेत दोन दिवस झाले…

नायक- ओह् हो हो, म्हणजे तुला म्हणायचं होतं धीर सोडू नकोस….. मग ठीके, मला वाटलं

मित्र – मी तेच म्हणलो… तुला काय वाटलं?

नायक – कुठं काय, ( गडबडून, गंभीर होत) बाबा गायब आहेत रे !

बाहेरच्या दारातून आवाज – नाही पोरा मी परत आलोय.

( दारावर कॅमेरा, एकदा वरून, एकदा खालून एकदा डावीकडून. मग झूम इन, त्यानंतर झूम आऊट. ढिश् झिश् फिश् असा स्पेशल इफेक्ट, मग नुसतीच भिंत. मग चुकीची दुरुस्ती करायला लगबगीनं कॅमेरा दरवाज्यातील व्यक्तीकडे.)

नायक – बाबा तुम्ही? आई, बाबा आले बघ!

( सतार वगैरे वाद्यांसकट रेग्युलर आनंदी क्षण सूचित करणारा  आवाज… मित्र फोन कट करतो, आवाज बंद)

मित्र – ओह् सॉरी, तुमचं चालू द्या

(नायक बाबांच्या दिशेने स्लो मोशन, बाबांचे हात समोर, नायकाला मिठीत घेण्यासाठी,

टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,टू नायक स्लो मोशन, टू बाबा, टू नायक स्लो मोशन, टू बाबा,

पुन्हा नायक, स्लो मोशन. बाबा कंटाळून हात खाली घेतात, नायक पोहोचून मिठी मारणार तोच् )

आई-  तू????????????? तुझी हिंमत तरी कशी झाली इथे यायची? (मुलाकडे बघून) आहेच तिथेस थांब. या माणसाच्या सावलीसही  उभा राहू नकोस….

मित्र – तुम्हाला “आहेस तिथेच” म्हणायचंय का? कारण आहेच तिथेस असं काही नसतं या जगात.

नायक – (गोंधळून) आई??? बाबा??? ( वैतागून) आधीच नाही का सांगायचं…. बळंच चालायला लावलं राव, एक तर ही अवस्था…

मित्र – कोणती अवस्था

नायक – कुठं काय? बाबा आलेत बघ !

आई – हा माणूस तुझा बाप नाही!!!!

(कॅमेरा आईकडे. वरून, खालून, डावीकडून, विथ स्पेशल इफेक्ट… अचानक कॅमेरा धप्पकन् आडवा… सावरून सरळ, पुन्हा आईकडे.)

आई – हा नक्कीच तो. यांचा जुळा भाऊ. एकदा फसले,  दोनदा फसले,  आता  लक्षातही नाही कितीदा फसल्ये ते पण आता फसणार नाही.

नायक – (एकाच वेळी हताश, अन् आश्चर्यचकित) आई, काय बोलत्येस तू? कोण जुळा भाऊ, कोणी फसवलं कोणाला?

आई – अरे, सोडून दे, ते मनातल्या मनाल होतं.

नायक – अं?

आई- नायकाकडे पूर्ण दुर्लक्ष करून – अत्ताच्या अत्ता चालता हो…

(तेवढ्यात आणखी एक आवाज)

आवाज – मला वाटलंच, मी गायब झाल्याचं पाहून तू इथं येशील

(आवाजाकडे कॅमेरा, स्थिर, नुसतेच साऊंड इफेक्ट्स… अस्पष्ट कुजबूज …… अरे हलव की…. नाही जा…… चक्कर…… डॉक्टरांचं बिल…. एक शिवी….)

बाबा- तू??????

आई- तुम्ही???????

मित्र- काका???????

नायक- अं???

आवाज – होय, मी परत आलोय…

बाबा१ – (कुत्सित संतापासह) मी तुला रस्त्यावर आणीन…

बाबा२- (तितक्याच कुत्सितपणे) पण मी आत आलोच कुठंय.

नायक – हा काय प्रकार आहे

आई – जरा प्लॅन चुकला खरा… यानं खीर खायला उशीर केला म्हणून. नाहीतर एव्हाना हा डॉक्टरकडे गेला असता. मग मी, ह्यांचा जुळा हा, हे आणि ह्याचा हा.

ह्या दोघा जुळ्यांना एकमेकांत जुंपून आम्ही दोघं पळून गेलो असतो. अन् नंतर गॅसच्या स्फोटाची बातमी वाचून विमा खायला आलो असतो.

नायक- काय??????????????

मित्र- (गडबडून) अरे, येतो रे मी.

बाबा१- काय???????????????

बाबा२- (आधीच्याच कुत्सितपणे) गॅस संपलाय !!!

बाबा१ – रस्त्यावर आणीन तुला

आई- मी हेसुद्धा मोठ्यानं बोलले वाटतं… असंच होतंय हल्ली…

सुमी – तरीच स्फोट नाही झाला आजून…

(तेवढ्यात एक मोठा आवाज, कॅमेरा कॅलेंडरकडे, १२ डिसेंबर २०१२, वार मात्र रविवार… मग पाणीच पाणी, कॅमेरा हळूहळू डावीकडे सरकतोय. पाण्यातच वाळू, काही वनस्पती, एक मासा समोरून निघून जातो, मागे बुडबुडे सोडणारं यंत्रं… फेड टू ब्लॅक)

अर्थमैथुन : टमरेल

सूचना. : ही थोडी तसली पोस्ट आहे त्यामुळे हे असलं काही ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचणं इथेचच थांबवावं.

टमरेल.

हे रंगीत असतं. (असावं, तेवढंच बरं वाटतं )

याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार… (तळटीप… तिथे समजेल)

याच्यामुळे “शून्यात बघणं सोपं जातं.” पर्यायानं, चित्त एकाग्र करणं शक्य होतं.
चित्त एकाग्र असलं की माणूस मोठमोठे चिवट, बिकट आणि कठीण प्रसंग सहज हातावेगळे करू शकतो.

पाणी हेच जीवन…

उदाहरणादाखल पहा :
ओलिताखालील प्रदेश विरूद्ध कोरडवाहू प्रदेश
हिमालय विरूद्ध ग्रॅंड कॅन्यन
अॅमेझॉन विरूद्ध सहारा

आता हे पहा… (घाबरू नका, फक्त लिहिलेलंच वाचायला सांगतोय)
नदीचं पाणी समुद्राला मिळतं
समुद्राच्या पाण्याची वाफ होते.
वाफेचे ढग बनतात
ते वाऱ्यासोबत वाहतात
जिथे ते ढग गार होतात तिथे पाऊस पडतो
डोंगराशी ढग आडत असल्यानं तिथे जास्त पाऊस होतो आणि जंगल निर्माण होतं.
मग काही लाकूडतोड्यांवर खर्च करून आपण ते जंगल तोडतो.
पुन्हा ट्रक, पेट्रोल वगैरे गोष्टींवर खर्च करून ती लाकडं शहरांत आणतो.
पुन्हा, कामगार, वीज, यंत्रसामुग्री वगैरेवर खर्च करून आपण त्या लाकडांचा घट्ट रस वगैरे काहीसा तयार करून त्याचा कागद तयार करतो.
स्वाभाविकच, निसर्गापासून एवढा लांबचा आणि निसर्गास घातक असा प्रवास करून आलेला कागद… त्यात निसर्गाचा तो ओलावा नसतोच मुळी…

याउलट सरकारनं धरणं तुमच्यासाठी बांधली आहेत. पाणीकपात असेल तर पर्यायानं पाण्याचा वापर कमी होतो आणि खर्चही वाचतो. (तो कप नंतर इतर कुठे वापरू नये. )  शिवाय, नदी – समुद्र – पाऊस – झाड – ट्रक – फॅक्ट्री – दुकान – घर  यापेक्षा नदी – धरण  - घरची टाकी – नळ – टमरेल हा बराच सुटसुटीत प्रवास आहे.

कागदानं आग पसरते. आग विझवायला अग्निशामक दलही पाणीच वापरतं….

शेवटी पाणी ते पाणी आणि कागद तो कागद ( स्रोत  : आयुष्यावर बोलू काही  (कार्यक्रम) )

टमरेल काय किंवा कागद काय… काय वापरायचं ते तुमच्या हातात आहे …

तळटीप -
: वाचलंतच ना इथपर्यंत… वाटलंच मला !!
:  पूर्वी रेडिओ पुणे स्टेशन वर ही फर्निचरच्या दुकानाची जाहिरात लागायची. आजूनही लागत असेल माहित नाही… त्यात “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं… रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…” अशा ओळी होत्या. त्या जाहिरातिच्या वेळेत मी नेमका अभ्यासात असायचो (नाहितर रेडिओवरच्या जाहिरातीकडे कशाला जातंय लक्ष..) तेव्हापासून जेव्हा जेव्हा “याशिवाय तर घर अपूर्ण वाटतं (रविंद्र…. रविंद्र, गरवारे पुलाजवळ डेक्कन जिमखाना पुणे चार…)”  हा वाक्प्रचार येतो तेव्हा पुढचं म्हणल्यावाचून (मनातल्या मनात का होईना) राहावत नाही.. (वाक्यात मधे कुठेतरी “स्वप्नासारखे सुंदर घर प्रत्यक्षात उतरते” अशा ओळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की आठवत नाईये. )

अर्थमैथुन : बांबूच्या वाटेवरचे घोडेस्वार

“आज माझी चांगलीच लागली” ऐकला असेलच हा वाक्यप्रयोग तुम्ही. वापरलाही असेल कदाचित. पाचावर धारण बसली, बिकट परिस्थिती आली, तोंडचं पाणी पळालं की माणसाला हे शब्द सुचतात. काहीतरी बेक्कार किस्सा झालेला असतो आणि आपण संकटात सापडलेलो असतो. परीक्षा असते आणि ऑप्शनला टाकलेल्या भागातलेच प्रश्न अनिवार्य म्हणून आलेले असतात, गोंडस मैत्रिणीसोबत फिरताना गर्लफ्रेंड समोर आलेली असते किंवा बकुळीच्या फुलांचा खजिना घरच्यांना सापडण्यापासून थोडक्यात वाचलेला असतो. अशा वेळी “आज माझी चांगलीच लागली” हे शब्द सुचणं रास्तच आहे.

हो… ठीक आहे… लागली  वगैरे सगळं ठीक आहे…
पण नक्की काय लागली???

जर तुम्हाला सुचलेलं पहिलं उत्तर सांगण्यासारखं नसेल ( नसणारच !! ) तर खंग्राज्युलेशचंद (विंग्रजीत कॉंग्रॅज्युलेशन्स) वुई ( विंग्रजीत वी, स्रोत : तर्खडकर भाषांतरपाठमाला वा तत्सम पुस्तिका ) हॅव ए विनर !!! (  हा कंस वाचू नये. )

आता थोडेसे लहान (किंवा सभ्य, शामळू वगैरे) झालात तर तुम्हाला यातून एक वाट दिसेल. हीच ती वाट. काही श्यंकट आलं की आपली लागते ती म्हणजे वाट (वाटलंच होतं…)!  तसं बघायला गेलं तर वाट ही तिच्या जागी स्थिर. “ही वाट कुठे जाते?” वाल्या विनोदाप्रमाणे, ती कुठेही जात नाही. याउलट, प्रवासादरम्यान आपणच कोणत्यातरी वळणावर एखाद्या वाटेला लागतो. अगदीच जर आपणच लागायचं असेल तर मग वाट सोडून आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. बरा वाईट कसाही असो पण आपण मात्र मार्गी लागतो. ( तसे आपण नादीही लागतो, पण  नादच खुळा त्याला आपण तरी काय करणार ! ) (संगतीलाही लागतो, हरकत नाही… फक्त काना,मात्रा, वेलांटीचं भान असू द्या.. नाहीतर…. असो…..)

हां. तर मार्ग… हा मार्ग चांगला असेल तर प्रश्नच नाही. (प्रश्न असा की उत्तर काय ? )  पण जर मार्ग वाईट असेल तर मात्र आपली पार वाट लागून आपण रस्त्यावर येऊ शकतो आणि कालांतरानं धक्क्यालाही लागू शकतो… ही धक्क्याला लागायची वेळ येईपर्यंत माणसाचं प्रचंड आर्थिक नुस्कान (तस्कर, स्कंधस्नायू, मुस्काड, बिस्किट, स्कोडा, स्किन, स्किल, स्क्रू … स्क्या स्क्या स्क्या !!! स्कायपण स्काललंय :D ) होऊ शकतं. एवढ्या मेजर स्केलवर (पुन्हा स्क…) निस्कान (…) काय असं  फस्कन (…) होत नसतं… या धक्क्याला लागेपर्यंतच्या वाटेवर अनेकदा घोडे आणि बांबू लागलेले असतात.

आता घोडा आणि बांबूच का ?? मी फार खोलात(!) जाणार नाही. घोडा हे तसं श्रीमंती जनावर, शिवाय हा रेसमधेही असतो, घोड्यांच्या रेसवर मजबूत पैसा लागतो(!) त्यामुळे घोड्याचा त्यातल्यात्यात पैशाशी किंवा नुकसानाशी संबंध लावता येईल.  पण बांबूचं काय???

बांबू हे पांडांचं आवडतं खाद्य, (पांडा हा एक अस्वलप्रजातीय प्राणी आहे (माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यानुसारच तो मऊही आहे…), तोही नामशेष होत चालला आहे. त्यांची लागणारी वाट थांबवली नाही तर लवकरच पांडा ही प्रजाती धक्क्याला लागेल…) पांडा चीनमधे असतात, बांबूही… चीनी बनावटीच्या वस्तू कशा… स्वस्त पण सहा महिन्यात बत्तीगुल… मग आपलं नुसकान !!! (नुस्कान, नुस्कान, नुस्कान… उद्या शंभर वेळा लिहून आण !!! ) म्हणून बांबूही आर्थिक तोट्याशी निगडित (निगडी सोडून आमची इतर कोठेही शाखा नाही…).

एवढं लिहून मी ही बांबूंची लागवड संपवतो.

तरी, सूज्ञांनी (आणि तुम्हीसुद्धा) या बांबूच्या वाटेवरील घोड्यांचा लागेल तसा वापर करा आणि काही लागलंच तर निःसंकोचपणे मागून घ्या….

आपला,

नॅकोबा.

कायदा, गे आणि लिव इन रिलेशन

अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही.  ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. एरवी असल्या (कोणत्याही सामाजिक, राजकीय इ.) विषयावर मी फारसं बोलत नाही. करायचीच असली तर आधी आचरट आणि नंतर गंभीर मतं व्यक्त करून मोकळा होतो. बाकी तसा माझा राजकारण किंवा समाजकारण या गोष्टींशी संबंध नाही आणि अभ्यास तर मुळीच नाही. (खरं तर मी पुण्याचा आहे एवढंच कारण पुरेसं आहे, पण…)

आज मी एवढं पेटायचं कारण म्हणजे च्यायला एवढी इंट्रेश्टिंग बातमी आणि एकाही मित्रानं साधी ऑनलाईन हिंट पण दिली नाही… अरे… काय चाललंय काय ! कित्येक दिवस मी या बातमीची, निर्णयाची वाट पाहात होतो… (तशी मी ‘फालतू लोकांना मारण्यास कायदेशीर परवानगी’ या बातमीचीही वाट बघतोय, आणि ती आली तरी मी काय लगेच उठून एकता कपूर किंवा हिमेश रेशमिया मागे लागेन असं नाही. हे म्हणजे आत्महत्येस परवानगी मिळाल्यास पंख्यांच्या व्यवसायास बरकत येईल किंवा टेरेस गार्डन्स मधे गर्दी वाढेल म्हणण्यासारखं आहे. ) जुन्या ऑफिसातील माझ्या एका कलीगने मला सल्ला दिला होता ‘तू लिव इन रिलेशनमधेच रहा अरे, तुला परफेक्ट आहे’. तेव्हापासून या ऑप्शनसाठी माझ्या जिवाचा चातक झाला होता. (वरचा कंस पुन्हा वाचावा). एकदा एका मुलीला ‘तू गोंडस दिसतेस’ असं सरळ तिच्या तोंडावर म्हणलं तर पुढचे पंधरा दिवस ती कॉलेजात दिसली नव्हती… त्यामुळे पर्याय खुला होऊन जो काय उजेड पडेल तो पडेल, पण पर्याय असणं महत्वाचं. यातूनच निर्णयस्वतंत्र्याचं चित्र उभारण्यास मदत होते.

या निर्णयानं काही जणांना आपले जिवलग शोधण्यास मदत होईल, मोठ्या निर्णयापूर्वी आपल्या जोडीदाराशी व्यवस्थित जुळवून घेण्यास त्यांना जास्त वेळ आणि जवळीक मिळेल. केवळ कायदा आला म्हणून आपला किंवा आपली पाल्य त्याचा वापर करेल असं तुम्हाला वाटत असेत तर परत एकदा वरचा कंस वाचा. आपण मराठी लोक ज्याला संस्कार म्हणतो ( सीरीयलमधले संस्कार वेगळे, आपले संस्कार वेगळे ) ते तकलादू नाहीत.

गे या शब्दाशी माझी जवळीक आहे ती गेमर या नात्यानं. मी गेमर आहे म्हणजे गे-मर अशा कोणत्यातरी समलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या संघटनेचा मेंबर आहे असं नाही. मी कॉम्प्यूटर गेम्स खेळतो म्हणून गेमर. मल्टिप्लेअर. कॅफेत मल्टिप्लेअर गेम्स खेळताना कमीत कमी वेळात एकमेकांना जास्तीत जास्त शिव्या देता येणं ही एक मोठी स्पृहणीय कला आहे. तिथे हा एकाक्षरी शब्द जादू करून जातो. खेळता खेळता खेळीमेळीत एकमेकांना उद्देशलेल्या या शब्दलीलांनी खेळाडूंमधली जवळीक वाढीस लागते (इथे कोणतेही चावट विचार नकोयत…) तसेच अधूनमधून घरच्यांची आठवण करून दिल्यानं खेळाडूंची कौटुंबिक ओढही वाढीस लागते.

आता गे कायदा म्हणाल तर त्याच्याशी मला खरंच काही देणंघेणं नाही. जोपर्यंत एखादा मुलगा ‘मला तुझी चड्डी आवडली’ असं माझ्या ब्लॉगवरच्या पोस्टला उद्देशून बोलतोय तोवर मला चिंतेचं कारण नाही. आणि कितीही झालं तरी तो वरचा कंस आहेच की, हिमेशवाला… या कायद्यानं अगदीच काही वाईट होईल असं नाही काही. विचार करा, एखाद्या नवसुगृहिणीला एका रम्य अनपेक्षित सायंकाळी आपला नवरा त्याच्या लंगोटी (आहा !!) मित्राबरोबर घोडा घोडा खेळताना दिसला तर बिचारीवर काय गुदरेल? त्यापेक्षा हा गुण्या आणि तो गोविंदा गुण्यागोविंदानं नांदले तर काय वाईट आहे?

प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. त्यातली एकच बाजू बघायची, दोन्ही बाजू व्यवस्थित बघायच्या का सरळ त्या नाण्याच्या दोन सिगारेटी घेऊन चिंता धुरात विलीन करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आता एवढं लिहून मी माझी ही पोस्ट संपवतो आणि मला बातमी न सांगणाऱ्या मित्रांचा फोनवरून समाचार घेतो,

नमस्कार,

आपला,

नॅकोबा

(मी सिगरेट पीत नाही)

चड्डी

काय हे ! चड्डी या नावानी पोस्ट टाकतं का कोणी… आणि टाकावी तरी का? चार लोक (सूज्ञ लोक) भेटले तर या विषयावर साधं बोलतही नाहीत. सार्वजनिक चर्चा नाहीत, परिसंवाद नाहीत, रियॅलिटी शो नाही… मग कोणी पोस्ट तरी का टाकावी? टीव्हीवर आणि सिनेमात बरेचदा डोळ्यांसमोर ढळढळीतपणे दिसत असतानाही कोणी हिच्याबद्दल उघडपणे चारचौघात बोलत नाही. एवढ्या परिचयाच्या आणि ओळखीच्या वस्तूला असं अनुल्लेखानं का मारतो आपण ?

कधी गूगल वर ‘चड्डी’ सर्च मारून पाहिलाय ?? ( का मारून पहाल या तपशीलाकडे आपण सध्या दुर्लक्ष करू… ) 76,700 गोष्टी सापडतात गूगल ला… आता लगेच सर्च मारून पाहू नका. फारसे काही चांगले निकाल नाईयेत…. मला पहिल्या पानावर किमान एक तरी लिंक अपेक्षित होती जी सुपरमॅन या संदीप खरेच्या सुपरमॅन गाण्याच्या लिरिक्सकडे नेत असेल. पण कसलं काय… कवितांव्यतिरिक्त लोकांना बरंच काय काय वाचायला आवडतं असं दिसतं एकूण. आपण कोण बुवा बोलणारे… शेवटी म्हणतात ते खरंच आहे… ये अंदर की बात है !

हुक्की

आज ब्लॉगपोस्ट करायची मजबूत हुक्की आलीय… हुक्की, साधीसुधी इच्छा नाही तर चक्क हुक्की. एरवी मधून अधून होत असते इच्छा, इथे काहीतरी लिहायची पण या ना त्या कारणानी दुर्लक्ष होतं. आज मात्र या इच्छेचा वेग प्रचंड आहे. काहीतरी खरडल्याशिवाय राहावत नाईये.

लिहायचा विचार डोक्यात आला की वाट्टेल ते लिहिता येईल असं वाटतं पण प्रत्यक्षात कीबोर्ड बडवायला बसलं की विचाराचा पोपट होऊन भुर्रर्र उडून जातो. मांजरं, नुकत्याच पाहिलेल्या अमेरिकन सिरीयल्स, जून पासून मागे लागलेला आणि नोव्हेंबरमधे पुण्यात वैताग आणल्यानंतर इथे कॅलिफोर्नियातही माझा पिच्छा न सोडलेला पाऊस, चावट विचार, गंभीर विचार, सचिन तेंडुलरकचं नुकतंच झालेलं एकमेवाद्वितीय विश्वविक्रमी द्विशतक, परत एकदा मांजरं असे अनेक विचार एकापोठोपाठ येतात आणि एकमेकांशी भांडून तरातरा निघून जातात आणि त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्या डोक्यात तरंगत राहतात. मग “श्या !!!” (ट)  काही लिहिताच येत नाही आपल्याला ब्लॉगवर असं वाटत राहातं. विचारांना पकडून जेरबंद करायचा विचारही कधीकधी येतो पण तोही स्वतःचा स्वार्थ साधून बरोबर आळसाला पुढे करतो. अशी पंचाईत आहे.

पण ऐसा कैसा चलेंगा ना??? इतके दिवस (म्हणजे पुण्यात असताना) बऱ्याच निरर्थक विचारांना तोंडामार्फत बाहेची वाट दाखवल्ये. या ब्लॉगच्या सुरूवातीमागचा उद्देशही हाच होता की मनात येईल ते बरंचसं निरर्थक आणि कधीकधी सार्थ असं इथे मांडावं. आळस आपली टांग मधेमधे घालतो ना…… मग जेव्हा असं उजाडतं तेव्हा ठरवतो आता रोज काहीतरी लिहायचं न विसरता. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

चालायचंच…

चहाची हुक्की फिटल्यानंतर पुढच्या चहाची चिंता करायची नसते.

आपला,

~नॅकोबा