आज बऱ्याच दिवसांनी डोटा खेळलो.
काल एक कॅफेकरी मित्र ऑनलाईन भेटला होता त्यानं नेमकं डोटाचं नाव काढलं. रहावलं नाही. तडक वॉरक्राफ्ट-३ डाऊनलोडला लावला, आज ऑफिसातून घरी आल्या आल्या इन्स्टॉल, डोटा डाऊनलोड केला अन् खेळायला सुरूवात. डोटा. पूर्ण नाव – डिफेन्स ऑफ दि एन्शिअन्ट्स. डोटा हा वेगळा असा गेम नाही. वॉरक्राफ्ट या स्ट्रॅटेजी गेमचा हा एक तिऱ्हाइतांनी (थर्ड पार्टी) बनवलेला मॅप (किंवा सनारियो) .

डो़टा-फॅन आर्ट, स्रोत(http://chirugeon.wordpress.com/)
वॉरक्राफ्टमधे हा रिअल टाईम स्ट्रॅटजी गेम. यात तुम्ही साधनसामुग्री गोळा करणे, स्वतःचं राज्य स्थापून त्याचा विकास करणे (आईश्शपथ सांगतोय, हा सगळा प्रकार शुद्ध मराठीत लिहिताना इतकं विनोदी वाटतंय….) त्याचबरोबर एखाद-दोन नेते आणि सेना घेऊन शत्रूंचा नायनाट करणे हे प्रकार करता. एज ऑफ एम्पायर्स, एज ऑफ मायथॉलॉजी, डॉन ऑफ वॉर वगैरे गेम्स या प्रकारात मोडतात.
वॉरक्राफ्ट या मूळ गेमवर आधारित असला तरी हा डोटा हा उपप्रकार मूळ खेळापेक्षा प्रचंड वेगळा आहे. टॉवर डिफेन्स ही त्यामागची मूळ संकल्पना, पण त्यातही थोडा फरक. टॉवर डिफेन्स मधे तुमच्या टीमचं एक महत्वाचं ठिकाण असतं (झाड, घर वगैरे) अन् शत्रूच्या झुंडीच्या झुंडी येऊन हे ठिकाण नष्ट करू पाहतात. यावेळी शक्य तितके टॉवर्स बांधून या शत्रूंच्या लाटांना त्यांच्या इप्सित स्थळी पोहोचण्यापासून रोखणे हा मुख्य उद्देश असतो. जितके जास्त शत्रू रोखले जातील तितके अधिकअधिक चांगले टॉवर्स बांधता येतात अन् अधिकाधिक शक्तीशाली शत्रूंच्या लाटा थोपवता येतात. एकूण मजा असते
पण डोटा हा पूर्णपणे टॉवर डिफेएन्सही नाही. यात दोन टीम्स, प्रत्येकाला स्वतःचं ठिकाण वाचवून दुसऱ्या टीमचं ठिकाण पाडायचं असतं. प्रत्येक खेळाडू एक हीरो नियंत्रित करतो. नियमित कालावधीने प्रत्येक टीमच्या छावणीतून सैन्याच्या झुंडी बाहेर पडतात. खेळाडू या झुंडींच्या सहाय्याने प्रतिस्पर्धी संघाच्या (टीम ला प्रतिशब्द आठवला, यिप्पी वगैरे.) छावणीकडे आगेकूच करतात.प्रतिस्पर्धी संधाचे सैन्य किंवा हीरोज् ठार केले की आपल्या हीरोला एक्सपिरियन्स अन् सोनं मिळतं. एक्सपिरियन्स वाढला की लेवल वाढते, हीरोला नवनवीन अस्त्रे अन् शक्त्या प्राप्त होतात. सोनं वापरून वेगवेगळी शस्त्रे घेता यातात.
प्रत्येक हीरोच्या वेगवेगळ्या शक्त्या, हाताळायची पद्धतही वेगळी. त्यांच्यासाठी घ्यावयारी शस्त्रं वेगळी, मिळणाऱ्या शक्त्या निवडायचा क्रमही समोरच्या संघात कोणते हीरो आहेत त्यावरून बदलणारा. काही हीरोज् मोठ्या सैन्याला एकाहाती भिडू शकणारे, प्रचंड मार खाऊ शकणारे, याऊलट काही लपूनछपून कल्लोळ माजवणारे. काही एकटेच धोपणारे तर काही स्वतःसोबत अख्खी फौज गोळा करून समोक दिसेल ते भुईसपाट करणारे. अशक्य शक्यता. (सशक्त बंड्या…)
डोटा खेळणं बंद होऊन जवळजवळ तीनएक वर्षं झाली असतील पण आठवणी आजून ताज्या आहेत. हा एक गेम सतत अपडेट होत असतो. आज सुरू केला तेव्हाच बरेच बदल जाणवले. असाच मल्टिप्लेअर खेळायला घुसलो तर पार मारली जाईल. बघू. एकदोन आठवड्यांनी काय होतंय ते…