पुढच्या वेळी विचारू नका

काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या लेखाबद्दल आवर्जून सांगितलं. (जरा विषयांतर करतो..) एरवी मी आईला फायरफॉक्स उघडू दिला नसता.  कारण भारतातून निघण्यापूर्वी मी हिस्ट्री क्लियर केली आहे की नाही हे मला नक्की आठवत नाहीये… संगणक पालकांना हाताळू देताना जवळजवळ प्रत्येक तरूणाच्या मनात ही धास्ती असते. (तरूणींचं माहीत नाही. पण त्यांना असले प्रश्न पडत नसावेत या समजात (किंवा गैरसमजात) मी सुखी आहे… असो.) नुकताच घडलेला किस्सा. बाबांच्या (म्हणजे माझ्या जुन्या) संगणकात काहीतरी बिघाड झाला म्हणून माझा एक मित्र घरी जाऊन पाहून आला. काही दिवसांनी तोच मित्र परत पेन ड्राईव घेऊन आमच्या घरी!! त्याला थोडं अभ्यासाचं मटेरियल हवंय अशी कल्पना मी घरी देऊन ठेवली होती. (विषयांतर संपलं)

परवा मात्र अगदी महत्वाचं काम होतं म्हणून मला अखेर आईला फायरफॉक्सपर्यंत न्यावंच लागलं.  आई शिक्षिका. तिचं जनगणनेचं काम आता संपत आलंय. या कामाचाच भाग म्हणून त्यांना आपापल्या जनगणना प्रभागाचा एक नकाशा काढायचा असतो. (रिड्डिक्युलस. पण नाईलाज त्याला काय इलाज?) सरकारी काम असलं तरी आई चक्क ते मनापासून करते. नकाशे उरकणारे महाभागही असतीलच, शंका नाही. अशा यागणलेल्या (गंडलेल्या) माहितीबद्दल मला तर एकूणच शंका वाटते. असो. तर नकाशा. ज्या प्रभागाचं काम तिनं केलं त्याचा नकाशा काढायचा प्रयत्न करूनही कुठेतरी गंमत होत होती अन् दिशा काही जुळत नव्हत्या. आईच्या एका मैत्रिणीनं तिला इंटरनेटवरच्या मॅप्सची कल्पना सुचवली अन् आईनं मला कामाला लावलं. भारतात घरबसल्या एक आई आपल्या अमेरिकेत बसलेल्या आळशी मुलाला चक्क कामाला लावते… तंत्रज्ञानाचीही कमाल आहे !

मग प्रभाग पटापट शोधून गूगल मॅप्सची लिंक आईला स्काईपवरून घाबरत घाबरतच पाठवली. भले फायरफॉक्स स्वच्छ केला असेलही मी, पण कोणतीही अनपेक्षित विंडो आली की आई घाबरते अन् मग सगळं स्पष्ट करून सांगावं लागतं की विंडो का आली, तिचं काय करायचं वगैरे. फायरफॉक्स सुरू झाला, पण नेमकी अपडेटची विंडो आली. मग फायरफॉक्स अपडेट, त्याच्यापाठोपाठ फ्लॅश प्लेअर अपडेट, मग फायरफॉक्स रीस्टार्ट, मग पुन्हा लिंक वर क्लिक अशा सर्व पारऱ्या ओलांडून शेवटी नकाशाप्रत पोहोचलो. त्यानंतर माध्यमातून त्या नकाशाभर हिंडलो. प्रिंट कशी काढता येईल वगैरे सांगितलं. झूम कसा करायचा, नकाशा वर-खाली कसा सकरवायचा वगैरे सांगितलं. हे सगळंच्या सगळं आईला जमलंही. (मी पुण्यात असताना काही शिकायचं नसतं… मी लांब गेलो की मात्र स्काईप, गूगल चॅट अगदी मोबाईल फोनसुद्धा व्यवस्थित शिकायचं, हाताळायचं…. पण मी पुण्यात पोचलो रे पोचलो की पुन्हा फक्त स्पायडर सॉलिटेअर जिंदाबाद)

माझा घरचा फायरफॉक्स मराठी. सगळं काम आटोपल्यावर आईनं “वरच्या उजव्या कोपऱ्यातली फुली” केली. फायरफॉक्सनं बंद होताना नेहेमीची विचारणा केली. टॅब्ज संचयित करा व बाहेर पडा, बाहेर पडा अन् रद्द करा. त्यांच्या खाली एक पर्याय होता तो आईनं अस्सा काही वाचून दाखवला की मी पोट धरून हसत सुटलो. म्हणाली “फायरफॉक्स बघ काय म्हणतोय मला… पुढच्या वेळी विचारू नका…” हा ”पुढच्या वेळी विचारू नका” चा उच्चार डिट्टो क्लोरमिंटच्या “अब दोबारा मत पूछना” या धर्तीचा होता. काम झाल्यामुळं आई खूश होती, मी हसून लोळत होतो आणि पुणेरी वाटावं अशा मराठीत फायरफॉक्समस्तपैकी माज करून दाखवत होता.

ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे. मराठील्बॉग्ज डॉट नेट वरही ही नवीन जागा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे असं का केलं ? माझ्याकडे उत्तर नाही. हे असले उपद्व्याप करण्यातच आनंद असतो, नकळत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मनातला बोका आनंदित होतो ! बरं वाटतं.  मुक्ताफळे डॉट कॉमची नोंदणी करून पण बरेच दिवस झाले होते. पंधरा वीस दिवसांपूर्वी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या जुन्या सर्विस प्रोव्हायडरकडून नवीन प्रोव्हायडरकडे फिरवून घेतलं. आता कसं, नाव लक्षात ठेवायलाही सोप्पं झालंय अगदी. :) या सर्व बदलाची एकमेव पडती बाजू हीच की जुन्या जागेवर साईट जॉईन केलेल्यांना नवीन साईटवर नव्यानं जॉईन व्हावं लागेल ( अर्थात, त्यांची इच्छा असल्यास ). जुन्या जागेवर काही गंबतजंबत प्रकार करायची इच्छा आहे. बघू कसंकाय जमतंय ते !!

सध्या तरी मुक्ताफळं दोन्हीकडून उधळत असतील. काही बदलही दिसतील. पोस्टगणिक दिसणारं रेटिंग आणि लाईक डिसलाईक विजेट. गूगल बझ सोबत स्थापन केलेलं संगनमत (नको, बरा शब्द सापडेपर्यंत इंटिग्रेशन ठीक आहे ), इत्यादी इत्यादी आणि बरंच काही. हे गूगल बझ आणि ब्लॉगचं इंटिग्रेशन हा फार छान प्रकार आहे. तुमची पोस्ट गूगल बझवर जाऊन पडते आणि तिथे तुमच्या मित्रमंडळींनी केलेल्या कॉमेंट्स येऊन पडतात तुमच्या ब्लॉगवर. (आहे किनाई जंबत !! :D ) वर्डप्रेस वापरणार्यांसाठी मी लवकरच याबद्दलची पोस्ट टाकायचा प्रयत्न करेन.

तोपर्यंत,

आपला, (संगणककिडा)

नॅकोबा

चड्डी

काय हे ! चड्डी या नावानी पोस्ट टाकतं का कोणी… आणि टाकावी तरी का? चार लोक (सूज्ञ लोक) भेटले तर या विषयावर साधं बोलतही नाहीत. सार्वजनिक चर्चा नाहीत, परिसंवाद नाहीत, रियॅलिटी शो नाही… मग कोणी पोस्ट तरी का टाकावी? टीव्हीवर आणि सिनेमात बरेचदा डोळ्यांसमोर ढळढळीतपणे दिसत असतानाही कोणी हिच्याबद्दल उघडपणे चारचौघात बोलत नाही. एवढ्या परिचयाच्या आणि ओळखीच्या वस्तूला असं अनुल्लेखानं का मारतो आपण ?

कधी गूगल वर ‘चड्डी’ सर्च मारून पाहिलाय ?? ( का मारून पहाल या तपशीलाकडे आपण सध्या दुर्लक्ष करू… ) 76,700 गोष्टी सापडतात गूगल ला… आता लगेच सर्च मारून पाहू नका. फारसे काही चांगले निकाल नाईयेत…. मला पहिल्या पानावर किमान एक तरी लिंक अपेक्षित होती जी सुपरमॅन या संदीप खरेच्या सुपरमॅन गाण्याच्या लिरिक्सकडे नेत असेल. पण कसलं काय… कवितांव्यतिरिक्त लोकांना बरंच काय काय वाचायला आवडतं असं दिसतं एकूण. आपण कोण बुवा बोलणारे… शेवटी म्हणतात ते खरंच आहे… ये अंदर की बात है !

मटका

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.

असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात. एखादी गोष्ट करताना “काय मेली कटकट” किंवा “करून मोकळं व्हावं” या भावनेने काहीतरी करायला जातो आणि नेमकी तीच गोष्ट वाहवा मिळवून जाते. आणि मग आपण “अत्ता नक्की काय घडलं” या गहन प्रश्नात बुडून जातो. आज असंच काहीतरी घडलं.

आम्ही आठवड्याच्या आठवड्याला काय काम केलं याचा वीकली स्टेटस रिपोर्ट पाठवतो. प्रत्येक चेकइन, प्रत्येक बग फिक्स आणि मीटिंग्जमधे तेच तेच डिस्कस केल्यानं शुक्रवारी किंवा वीकेंडदरम्यान पुन्हा त्या सर्व गोष्टींची यादी करून पाठवणं नको होतं आणि केवळ नियम म्हणून पाळलं जातं. आज रविवार संपत आला बघून मी नेहेमीच्या सवयीने माझ्या चेक इन्स चे मेल्स काढले आणि त्यातल्या कॉमेंट्स कॉपी पेस्ट करून यादी केली, सध्या करत असलेल्या टास्कचा क्रमांक आणि शीर्षक कॉपी करून ते काम यादीत टाकलं, बग डेटाबेस मधून चार-पाच कामं कॉपी करून पुढच्या आठवड्यातल्या कामांची यादी टाकली आणि गूगल कॅलेंडरवरून मागच्या आठवड्यातल्या सगळ्या मीटिंग्जची यादी पेस्ट केली. दर आठवड्याला मी हेच करत आलोय, आज जरा एक-एक ओळ जास्त लिहिली इतकंच. त्या ओळीनं काय जादू  केली देव जाणे पण रिपोर्टच्या तासाभरातच डेव्ह लीड चा सर्वांना उद्देशून रिप्लाय आला की स्टेटस रिपोर्ट्स मधून आम्हाला नेमकं हेच अपेक्षित असतं. या असल्या प्रकारालाच गेमर टर्मिनॉलॉजीत मटका म्हणतात. रिप्लाय वाचून छान वाटलं. आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक रिपोर्टमधे हा एका ओळीचा वाढीव तपशील लिहिणार. नाईलाज आहे, कन्सिस्टन्सी टिकवली पाहिजे.

अशीच गंमत एकदा माझ्या एका सहकाऱ्याच्या बाबतीत घडली होती. आमच्या दोन टीम्स ना एक दिवस अचानक “एच आर्” टास्क म्हणून गेल्या आठ महिन्यांमधल्या कामांचा एक रिपोर्ट करायला सांगितला. तेव्हा मी आणि माझ्याबरोबरचे जवळजवळ सर्व सहकारी नवीन होतो आणि तेव्हा स्टेटस रिपोर्ट लिहिणे हा प्रकारही नव्हता. रोजच्यारोज स्काईप क़ॉल्सवरून प्रगतीचा आढावा घेतला जायचा त्यामुळे कोणालाच त्या प्रोसेसची गरज भासली नाही. कामं वेगानं आणि चोख पुढे सरकत होती त्यामुळे सर्व काही अलबेल होतं. आता अचानक आठ महिन्यांचं काम आणि त्यात वेळही कमी. आम्ही काहीबाही लिहून दिलं. लवकरच कळलं की दुसऱ्या टीममधल्या एकाचा रिपोर्ट आदर्श झालाय. मी कुतूहलानं त्याला विचारायला गेलो तर खांदे उडवून तो म्हणाला “मलाही नक्की माहित नाही मी काय केलं, पाठवलं एवढं नक्की पण त्यातलं नक्की काय आवडलं हे मलाही रहस्यच आहे.”

आपला,

नॅकोबा !

फीडली – ब्लॉग वाचण्याचे एक उत्तम साधन.

Feedly

फीडली

गेला साधारण एक महिना मी माझे आवडते ब्लॉग आणि गूगलवरच्या बातम्या वाचण्यासाठी “फीडली” नावाचा एक फीड रीडर वापरतोय. फीडली हा फायरफॉक्स आणि गूगल क्रोम चा विस्तार म्हणून स्थापन करता येतो (म्हणजे, इट कॅन बी इन्स्टॉल्ड अॅज ए फायरफॉक्स ऑर गूगल क्रोम एक्स्टेंशन)

Feedly Minibar
फीडलीचा मिनीबार

फीडली तुमच्या गूगल रीडरच्या फीड्स अत्यंत सुटसुटीत रचनेत सादर करतो, अत्यंत सोप्या प्रकारे नवीन ब्लॉग्ज आणी फीड्स ना सबस्क्राईब करू देतो तसेच वाचनाच्या सोयीसाठी तुमच्या फीड्स चे वर्गीकरणही करू देतो.

जर विस्तार म्हणून वापरायचं नसेल तर http://www.feedly.com/home या संकेतस्थळावरून परस्पर वापरता येतो.

फायरफॉक्स चा विस्तार म्हणून वापरताना प्रत्येक पानावर फीडलीचा एक मिनी टूलबार सदैव आपल्या उजवीकडे असतो, यावरचे पर्याय वापरून आपल्याला आपल्या फीड्स, बातम्या आणि आवडत्या ब्लॉग्ज् मधून अत्यंत सहजपणे चाळता येतं, काही बातम्या किंवा पोस्ट्सची नंतर वाचण्यासाठी नोंद करता येते व आवडलेल्या गोष्टी सोशल नेटवर्किंग साईट्सवर किंवा ईमेल द्वारे आपल्या लोकसंग्रहात प्रसारित करता येतात.

Feeds arranged in categories

फीडली - वर्गीकरण

आजवर ब्लॉग्ज च्या फीड्स वाचण्यासाठी कैक प्रकार वापरून पाहिले, खुद्द गूगल रीडर देखील वापरून बघितली पण काहीच सुटसुटीत, समाधानकारक वाटलं नाही. गेल्या काही दिवसांत बातम्या चाळण्यासाठी याचा भरपूर वापर केलाय तसंच मराठी ब्लॉग्ज् वाचण्यासाठीही. फीडलीमधे मराठी ब्लॉग्ज् चाळताना काही इतर मराठी ब्लॉग्जची शिफारसींमधून (रेकमेंडेशन्स) काही इतर चांगले मराठी ब्लॉग्जही सापडले.

वापरून बघा, उत्तम आहे…

आपला,

~नॅकोबा

Feedly

कबाब मे हड्डी

काय सुरेख दिवस चालले होते… चार सहा वर्षं नक्कीच झाली असतील… तो माझ्यासाठी खूप काही करायचा, नाही, अजूनही करतो… फक्त माझ्यासाठीच नाही तर आनेक जणांसाठी त्याचं काही ना काहीतरी चालू असतं.हेच त्याचं नेमकं मला आवडतं. परवा मात्र जे काही घडलं त्याने मी पुरता गोंधळून गेलोय… अगदीच अनपेक्षित गोष्ट. तसा हे त्याच्या स्वभावात आहेच, थोडा मिश्किलपणा, लोकांना अचंबित करण्याची आवड… पण परवा नक्की काय घडलं ते मला अजून पुरेसं कळलंच नाहीये. तो कोणालातरी त्याच्याबरोबर घेऊन आला. तसा घाईघाईतच. म्हणाला नवीनच ओळख आहे,  तुला पण आवडेल …. यापूर्वीही त्याने कोणाची नवीन ओळख करून दिली नाही असं नाही, पण निदान पूर्वकल्पना तरी होती. हा प्रकार नवीनच होता. तुझीही याच्याशी छान मैत्री होईल म्हणाला. मी बघतोय नुसता… नव्या मैत्रीशी जुळवूल घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा जाणवलं, त्यांचं आधी बरंच बोलणं झालं होतं, माझ्याबद्दल… आणि अजूनही काही माहिती मागत होता.
मी दिली.. हा आगांतुक कोण आहे हे अजून फारसं कळलं नाही पण त्याचा ह्याच्यावर विश्वास आहे, आणि माझा त्याच्यावर…
बहुतेक….
काहीच कळेना झालंय…
त्याने आणलेला हा गूगल बझ्झ नक्की काय प्रकार आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय…

~नॅकोबा~

दुसर्यांदा सीमोल्लंघन

जवळजवळ वर्षं होत आलं होतं हा ब्लॉग सुरू करून. गेल्या वर्षी दसर्याच्या मुहूर्तावर हा ब्लॉग सुरू केला खरा, पण यावर काही लिहिण्याच्या बाबतीत मात्र पार बट्ट्याबोळ होता… नाही म्हणायला अगदीच ५-७ पोस्ट्स होत्या… पण फार विशेष असे काही नाही.
मी तसा संगणकवेडा त्यामुळे माझा हा ब्लॉग सुद्धा मी स्वतःच्या संगणकावरून चालवला होता (भारी वाटतं… करून बघा !). अचानक गोष्टी बंद पडू शकतात व नंतर ब्लॉगचे किस्से होऊ शकतात या वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव होती… या गेल्या वर्षातच दोनदा माझ्या संगणकाने या ब्लॉगला दिवसा तारे दाखवले होते…

दोनदा ब्लॉगचा श्वास अडे..
मजबुत डेटा लॉस घडे…
बॅकप तरिही जो न करे
तो (मी) एक मूर्ख !!

आळस नडला… गेल्या वेळी निदान गूगल रीडर मधून एक-दोन पोस्ट परत मिळवता आल्या होत्या या वेळी मात्र सपशेल हार…

शेवटी, नवीन जागी नवीन ब्लॉगने सुरुवात केली. बघू कसं काय जमतंय ते…

~नॅकोबा