पुढच्या वेळी विचारू नका

काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या लेखाबद्दल आवर्जून सांगितलं. (जरा विषयांतर करतो..) एरवी मी आईला फायरफॉक्स उघडू दिला नसता.  कारण भारतातून निघण्यापूर्वी मी हिस्ट्री क्लियर केली आहे की नाही हे मला नक्की आठवत नाहीये… संगणक पालकांना हाताळू देताना जवळजवळ प्रत्येक तरूणाच्या मनात ही धास्ती असते. (तरूणींचं माहीत नाही. पण त्यांना असले प्रश्न पडत नसावेत या समजात (किंवा गैरसमजात) मी सुखी आहे… असो.) नुकताच घडलेला किस्सा. बाबांच्या (म्हणजे माझ्या जुन्या) संगणकात काहीतरी बिघाड झाला म्हणून माझा एक मित्र घरी जाऊन पाहून आला. काही दिवसांनी तोच मित्र परत पेन ड्राईव घेऊन आमच्या घरी!! त्याला थोडं अभ्यासाचं मटेरियल हवंय अशी कल्पना मी घरी देऊन ठेवली होती. (विषयांतर संपलं)

परवा मात्र अगदी महत्वाचं काम होतं म्हणून मला अखेर आईला फायरफॉक्सपर्यंत न्यावंच लागलं.  आई शिक्षिका. तिचं जनगणनेचं काम आता संपत आलंय. या कामाचाच भाग म्हणून त्यांना आपापल्या जनगणना प्रभागाचा एक नकाशा काढायचा असतो. (रिड्डिक्युलस. पण नाईलाज त्याला काय इलाज?) सरकारी काम असलं तरी आई चक्क ते मनापासून करते. नकाशे उरकणारे महाभागही असतीलच, शंका नाही. अशा यागणलेल्या (गंडलेल्या) माहितीबद्दल मला तर एकूणच शंका वाटते. असो. तर नकाशा. ज्या प्रभागाचं काम तिनं केलं त्याचा नकाशा काढायचा प्रयत्न करूनही कुठेतरी गंमत होत होती अन् दिशा काही जुळत नव्हत्या. आईच्या एका मैत्रिणीनं तिला इंटरनेटवरच्या मॅप्सची कल्पना सुचवली अन् आईनं मला कामाला लावलं. भारतात घरबसल्या एक आई आपल्या अमेरिकेत बसलेल्या आळशी मुलाला चक्क कामाला लावते… तंत्रज्ञानाचीही कमाल आहे !

मग प्रभाग पटापट शोधून गूगल मॅप्सची लिंक आईला स्काईपवरून घाबरत घाबरतच पाठवली. भले फायरफॉक्स स्वच्छ केला असेलही मी, पण कोणतीही अनपेक्षित विंडो आली की आई घाबरते अन् मग सगळं स्पष्ट करून सांगावं लागतं की विंडो का आली, तिचं काय करायचं वगैरे. फायरफॉक्स सुरू झाला, पण नेमकी अपडेटची विंडो आली. मग फायरफॉक्स अपडेट, त्याच्यापाठोपाठ फ्लॅश प्लेअर अपडेट, मग फायरफॉक्स रीस्टार्ट, मग पुन्हा लिंक वर क्लिक अशा सर्व पारऱ्या ओलांडून शेवटी नकाशाप्रत पोहोचलो. त्यानंतर माध्यमातून त्या नकाशाभर हिंडलो. प्रिंट कशी काढता येईल वगैरे सांगितलं. झूम कसा करायचा, नकाशा वर-खाली कसा सकरवायचा वगैरे सांगितलं. हे सगळंच्या सगळं आईला जमलंही. (मी पुण्यात असताना काही शिकायचं नसतं… मी लांब गेलो की मात्र स्काईप, गूगल चॅट अगदी मोबाईल फोनसुद्धा व्यवस्थित शिकायचं, हाताळायचं…. पण मी पुण्यात पोचलो रे पोचलो की पुन्हा फक्त स्पायडर सॉलिटेअर जिंदाबाद)

माझा घरचा फायरफॉक्स मराठी. सगळं काम आटोपल्यावर आईनं “वरच्या उजव्या कोपऱ्यातली फुली” केली. फायरफॉक्सनं बंद होताना नेहेमीची विचारणा केली. टॅब्ज संचयित करा व बाहेर पडा, बाहेर पडा अन् रद्द करा. त्यांच्या खाली एक पर्याय होता तो आईनं अस्सा काही वाचून दाखवला की मी पोट धरून हसत सुटलो. म्हणाली “फायरफॉक्स बघ काय म्हणतोय मला… पुढच्या वेळी विचारू नका…” हा ”पुढच्या वेळी विचारू नका” चा उच्चार डिट्टो क्लोरमिंटच्या “अब दोबारा मत पूछना” या धर्तीचा होता. काम झाल्यामुळं आई खूश होती, मी हसून लोळत होतो आणि पुणेरी वाटावं अशा मराठीत फायरफॉक्समस्तपैकी माज करून दाखवत होता.

ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे. मराठील्बॉग्ज डॉट नेट वरही ही नवीन जागा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे असं का केलं ? माझ्याकडे उत्तर नाही. हे असले उपद्व्याप करण्यातच आनंद असतो, नकळत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मनातला बोका आनंदित होतो ! बरं वाटतं.  मुक्ताफळे डॉट कॉमची नोंदणी करून पण बरेच दिवस झाले होते. पंधरा वीस दिवसांपूर्वी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या जुन्या सर्विस प्रोव्हायडरकडून नवीन प्रोव्हायडरकडे फिरवून घेतलं. आता कसं, नाव लक्षात ठेवायलाही सोप्पं झालंय अगदी. :) या सर्व बदलाची एकमेव पडती बाजू हीच की जुन्या जागेवर साईट जॉईन केलेल्यांना नवीन साईटवर नव्यानं जॉईन व्हावं लागेल ( अर्थात, त्यांची इच्छा असल्यास ). जुन्या जागेवर काही गंबतजंबत प्रकार करायची इच्छा आहे. बघू कसंकाय जमतंय ते !!

सध्या तरी मुक्ताफळं दोन्हीकडून उधळत असतील. काही बदलही दिसतील. पोस्टगणिक दिसणारं रेटिंग आणि लाईक डिसलाईक विजेट. गूगल बझ सोबत स्थापन केलेलं संगनमत (नको, बरा शब्द सापडेपर्यंत इंटिग्रेशन ठीक आहे ), इत्यादी इत्यादी आणि बरंच काही. हे गूगल बझ आणि ब्लॉगचं इंटिग्रेशन हा फार छान प्रकार आहे. तुमची पोस्ट गूगल बझवर जाऊन पडते आणि तिथे तुमच्या मित्रमंडळींनी केलेल्या कॉमेंट्स येऊन पडतात तुमच्या ब्लॉगवर. (आहे किनाई जंबत !! :D ) वर्डप्रेस वापरणार्यांसाठी मी लवकरच याबद्दलची पोस्ट टाकायचा प्रयत्न करेन.

तोपर्यंत,

आपला, (संगणककिडा)

नॅकोबा

किस्सा

नवीन जागा, नवीन लोक, नवीन प्रदेश अशा परिस्थितीत बहुतेक माणूस जरा नेटका राहण्याचा आपोआपच प्रयत्न करत असावा. गेले काही महिने मी अत्यंत काळजीपूर्वक राहात होतो. घरून निघताना सर्व काही बंद आहे याची खात्री करणे, गोष्टी नजरेसमोर अथवा जागच्याजागी ठेवणे, आवश्यक गोष्टी जपून ठेवणे, किल्ल्या सांभाळणे वगैरे सुरळीत चाललं होतं.

आज संध्याकाळी मस्तपैकी 24 चा एक एपिसोड बघितला. त्यानंतर म्हणलं जरा चिपोट्ले मधून नेहेमीप्रमाणे बरीतो आणून पुढचे एपिसोड्स बघता बघता निवांत खात बसावं. अंगावर जर्किन आणि पायात फ्लोटर्स चढवून मी मस्तपैकी बाहेर पडलो. लॅच लावून बाहेर आलो, दार लावलं, कुलूप लावून बाहेर आलो, खिशात हात घातला अन् क्षणात जाणीव झाली की या जागेशी आता अतिपरिचय झालाय…

चविष्ट बरीतोच्या नादात मी मस्तपैकी किल्ली घरात ठेवून बाहेर आलो होतो आणि दाराचं लॅच बंद ! घरातून बाहेर पडताना बाल्कनीच्या बाजूचं सरकतं काचेचं दार. पडदा वगैरे सगळं नेहेमीच्या सवयीनं बंद केलेलं. आत जायचा कोणताच मार्ग नाही. स्वतःच्या या कर्तबगारीवर खूष होऊन मी निमूटपणे आपार्टमेंट मॅनेजर गाठायला निघालो. मनात विशेषणांच्या उकळ्या फुटत होत्या. खाली येऊन बघतो तर काय ! मॅनेजरच्या घरात अंधार ! मी डकवर आऊट !

या मॅनेजरला मी आपार्टमेंट बुक करताना बरेचदा फोन केला होता त्यामुळे माझ्या मोबाईलवर नंबर सेव्ड होता. आता ही आज परत येणार आहे का वीकेंड निमित्त सहकुटुंब प्रवासाला गेल्ये हे माहीत करून घेणं क्रमप्राप्त होतं. शेवटी काही झालं तरी रात्री फार उशीर होण्यापूर्वी कुठेतरी नीट पोहोचणं आवश्यक होतं. जर मॅनेजर बाहेरच गेली असेल तर सहकर्मचारी किंवा नजीक राहणाऱ्या मित्रमंडळींपैकी कोणालातरी फोन करून काहीतरी व्यवस्था करावी लागणार होती. फोन करायला म्हणून खिशात हात घातला अन् मनात विशेषणांचा महापूर !!!

मी चक्क स्वतःला घराबाहेर काढलं होतं, अक्षरशः नेसत्या वस्त्रांनिशी… मोबाईल या जादुई वस्तूने स्वतःचं काय महत्व निर्माण केलंय हेही जाणवत होतं. परत वर आलो, दार खरंच उघडत नाईये याची खात्री केली. शेजारी एक जपानी कुटुंब राहातं, निदान त्यांच्याकडून मॅनेजरला फोन करता आला असता. बाकी कोणाला फोन करायचा प्रश्नच नव्हता कारण मोबाईल वापरायला लागल्यापासून कोणाचा नंबर लक्षात ठेवायची वेळच आली नव्हती. मोठ्या आशेने शेजारी जाऊन बघितलं तर तिथेही अंधार. याच मजल्यावर एक भारतीय बंडूही राहतो पण त्याचीही सायकल कुठे दिसत नव्हती.

खिशात पाकीट होतं. त्यामुळे अगदीच वेळ आली तर ट्रॅवलॉज मधे जाऊन राहता आलं असतं. तिथे बऱ्यापैकी काळ राहिल्याने तिथली मॅनेजर मला प्रत्यक्ष ओळखत होती. त्यामुळे आयडी जरी घरी राहिला असला तरी कदाचित प्रॉब्लेम आला नसता. अगदीच काही नाही तर तिथूनच जवळच्या लॉजमधे बालाजी नावाचा एक सहप्रवासी राहतो. निदान त्याच्याकडे जाऊन इंटरनेट अॅक्सेस आणि पर्यायाने आवश्यक ते फोन नंबर्स मिळवता आले असते. पण हे सर्व करण्यापूर्वी एक पंधरा-वीस मिनिटं मॅनेजरची वाट पाहत बसावं असा विचार आला.

बरं झालं थांबलो, मी परत खाली आल्याच्या चक्क दुसऱ्या मिनिटाला मॅनेजर हजर !

माझा एकूण चेहेरा बघूनच तिच्या लक्षात आलं असावं की साहेब किल्ली विसरून आलेत. मुलांना घरी सोडून ती किल्ल्या घेऊन वर आली, दार उघडून दिलं, विषय खतम. कोणीतरी किल्ल्या विसरणं ही रोजचीच गोष्ट आहे हेही ज्ञान मिळालं.

एकूण काय, निष्काळजीपणा वाढलाय याची झणझणीत जाणीव झाली. एक धडा मिळाला.

~नॅकोबा

दिवस घालवला उठारेठी

माझ्या आईची आवडती म्हण आहे, “दिवस घालवला उठारेठी, चांदण्याखाली कापूसवाटी…”. एक आजी सोडली तर आमच्या घरच्या सगळ्यांना ही म्हण व्यवस्थित लागू होते. दिवसा वेळ नसतो असं नाही. वेळ पुष्कळ असतो पण तो नको तिथे वाया जातो किंवा कधीकधी जाणूनबुजून इकडेतिकडे घालवण्यात येतो. मग दिवस संपत आला, की बसतो आम्ही जागत, दिवसाचा बॅकलॉग भरत.

दिवस, विशेषकरून रविवार घालवण्याची सवय (किवा हौस) काही केल्या सुटत नाही. दुपारी पूर्ण वेळ मोकळा असताना मी इकडे एखादा पोस्ट लिहू शकलो असतो. दुपारी काय केलं? काही नाही. जेवण झाल्यानंतर टीव्ही पाहिला, डेक्सटर या अप्रतीम मालिकेचा तिसरा अंक बघायला सुरुवात केली, तेही झाल्यावर इंटरनेटवर आचरटपणा केला, त्याही नंतर प्लेस्टेशन वर मनसोक्त गेम खेळलो, बाहेर उंडारून आलो.

भात लावणं, भाडं भरणं, आणि वेबकॅमवरून माझ्यासोबत बोलण्यास सज्ज मामेभावंडांशी अख्खा दीड-एक तास घरभर बागडत झालेलं बोलणं या मोजक्या गोष्टी सो़डल्या तर दुपारपासूनचा वेळ  अगदीच यांव गेला. आता, झोपण्यापूर्वी बघतोय ऑफिसच्या मेल्स… करतोय कामं… टाकतोय पोस्ट्स्…

चालायचंच, शेवटी आवड आपली आपली !

आपला, (आय टी प्रमाणवेळेनुसार पहाटे झोपी जाण्यास सज्ज)
~नॅकोबा.

दोन महिने

लवकरच दोन महिने होतील मी अमेरिकेत पोचून. घर, टीव्ही, इंटरनेट असल्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाली. जसं जमेल तसं, कंटाळा आला नसेल तर किंवा लक्षात असेल तर घरी स्वयंपाकाचा प्रयत्न करतो नाहीतर घर ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीशेजारीच चिपोटले आहे त्यामुळे पोटापाण्याची पण फार चिंता नाही. दिनक्रमाचं एकूण गणितही आता सवयीचं झालंय.

एकूणच काय तर बेसिक पक्कं झालंय आता इकडेतिकडे उंडारायला, संगणकीय उचापती करायला हरकत नाही. ब्लॉग वाचणे, इंटरनेट वर नवीन काहीतरी शिकणे, इकडच्या तिकडच्या चार वेबसाईट बघणे वगैरे करायला आता जरा सवड मिळेल. जमल्यास ब्लॉगवर जरा लिहिल्यासारखंही करता येईल.

जमेल तसं..

सध्या तरी कॉमेडी सेंट्रल जिंदाबाद !

 

~नॅकोबा !

बर्याच दिवसांनी…

आज बर्याच दिवसांनी इकडे पोस्ट टाकतोय… गेल्या महिन्यात मी इकडे कॅलिफोर्नियात पोहोचलो. अख्खा ख्रिसमस मला घर शोधण्यासाठी मिळाला, त्यामुळे वेळेत लीज साइन करून मला घराची पूर्ण तयारी करता आली…

आता दैनंदिन नित्यक्रम स्थिर व्हायला लागलाय, इंटरनेट आणि टीव्हीबरोबरच आता मला थोडा वेळही मोकळा मिळायला लागलाय. मज्जा येत्ये. एकटं असल्यामुळे सुरुवातीला थोडा कंटाळा आला, एकटं वाटलं पण आता सवय व्हायला लागल्ये.

इकडे मला आता वरचेवर पोस्ट करता येईल. अशी आशा बाळगू…

 

~नॅकोबा

इलेक्ट्रॉनिक साडेसाती

मी सिंहेचा. गेली पाच वर्षे माझी साडेसाती सुरूच आहे, पण गेल्या काही दिवसात माझ्याशी निगडीत इलेक्ट्रॉनिक वस्तू माझी अशी काही शाळा करताहेत की जणू हा त्या साडेसातीचाच परिणाम असावा…

सप्टेंबरच्या सुरुवातीस माझ्या दोन-दोन यूपीएस् नी माझी साथ सोडली… एक तर चक्क उडालाच, दुसरा अजिबात बॅकप देईना… बॅकप सोडाच… साधं एक कॉम्प्युटर आणि एक मॉनिटरचं लोड घ्यायलाही तो तयार नव्हता… त्यातच काही दिवसांत माझा संगणक वारंवार रिस्टार्ट होऊ लागला. असे होणे हे संगणकासाठी वा त्यातल्या प्रणालींसाठी काही फारसे पौष्टिक नसते. यात महत्वाच्या फाईल्स करप्ट होण्याची शक्यता असते. मर्फीचा एक तूफान लॉ आहे, “व्हॉटेव्हर कॅन गो रॉंग, विल गो रॉंग”… त्यानुसार व्हायचं तेच झालं… एकदा रिस्टार्ट होता होता रिस्टार्ट झाला आणि विंडोजच्या काही सिस्टीम फाईल्स कामातून गेल्या.

मला वाटलं की तिसरा यूपीएस पण धक्क्याला लागला की काय… म्हणून त्यावरचं लोड जरा कमी केलं. काही गोष्टी (मुख्यत्वे नेटवर्क आणि इंटरनेट) यांचा बॅकप काढून घेतला. मग पीसी जरा नीट चालू लागतोय असं वाटलं तेव्हा विंडोज परत इन्स्टॉल केलं जुनी सोफ्टवेअर परत इन्स्टॉल केली. या सगळ्या फंदात अख्खा आठवडा तर गेलाच् वर माझ्या ब्लॉग्जचा काही डेटा पण उडला… आता जरा नीट चाललंय असं वाटतं तोच रिस्टार्ट मागचं मूळ कारण समोर आलं… एस एम पी एस चा पंखा ठार झाला होता… त्याने नीट होण्यास परत चार दिवस खाल्ले.

हे होतंय तोच दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात विजा कडाडत पाऊस झाला… नेमका तेव्हा मी कामात मग्न… तिकडे काड्कन् वीज कडाडली आणि माझ्या मोडेम्सकडून चर्रर्र असा आवाज आला… मी काय समजायचे ते समजलो… पुढील दोन दिवसांत माझ्याकडच्या पडीक वायर्स, एक नवीन लॅनकार्ड आणि माझं नेटवर्कचं अर्धवट ज्ञान वापरून नेटवर्क परत माणसांत आणलं आणि हुश्श केलं…

दोन दिवसांपूर्वी मी काम करत असलेल्या एका दूरस्थ सर्वरची अचानक वाट लागली… अगदी दुरुस्तीपलीकडे… तेही मी त्यावर काहीही करत नसताना… त्यादिवशी रात्री अमेरिकेची सकाळ झाली आणि कळलं की क्लायंटला तो सर्वर प्रेझेंटेशनसाठी हवाय… माझी हवा टाईट… लगेच बसलो आणि एका सिस्टीम ऍडमिनसोबत तासाभरात गोष्टी ठीकठाक केल्या. हायसं वाटलं पण बेक्कार धावपळ झाली…

आता बघतोय वाट, कुठलं यंत्र पुढचा डाव टाकतंय याची… बघू काय होतंय…

~नॅकोबा