अनाचरटीय असुचेतन ब्ळॅ

सध्या. पोष्टीची सुरुवात सध्या नी केली की रटाळ अन् कंटाळवाणं बरंच काय काय सध्याच्या नावाखाली खपवता येतं. (इथे वाचा)

ब्लॉग सुरू करून आता दोन वर्षे होतील. ब्लॉगवर आचरटपणा सुरू करूनही आता जवळजवळ सहा महिने लोटलेत. पण कुठेतरी पाणी मुरतंय. वैचारिक शुष्कता आली आहे. पानगळीच्या हंगामात (त.टी.१) विचारवल्लीची जीर्णपर्णे प्रतिभालतिकेशी संलग्न राहण्याचा एक कृष, असहाय प्रयत्न करून अखेर दिनचक्राच्या वैचारिक अग्नेय मोसमी वाऱ्यांबरोबर फडफड… फडफड… करत उडून जातात. असंख्यातून बचावून एखादं जीर्णपर्ण अनंत मैलांचा वैचारिक प्रवास करत असेलही कदाचित, पण त्याची सुरसिक मेंदूशी असलेली अमूर्त नाळ केव्हाच तुटलेली असते. इतकंच काय…. मज्जारज्जूंनाही हल्ली मज्जा कळत नाही. अन् मी दारूही पीत नाही.

सर्दी मे पसीना गले ना भूक ना प्यास लगे, क्या यही प्यार तो नही? असेलही कदाचित, मला माहीत नाही, (तुम डॅडी से पूछ लेना.) पण उपरिनिर्दिष्टित(त.टी.२) परिच्छेदात ( सभ्य नसाल तर त.टी.३ वाचा ) उल्लेखलेली लक्षणे मात्र तिसरीकडेच अंगुलीनिर्देश करतात. (त.टी.५) याला ब्ळॅ स्थिती असं म्हणतात. ब्ळॅ या शब्दाला अर्थ जितका अर्थ आहे त्यापेक्शा अंमळ कमी अर्थ या अवस्थेला आहे. इथे गोष्टी आपोआप सुचत नाहीत. सुचल्या तरी टिकत नाहीत.  टिकले तरी ते टंकायचा कंटाळा आलेला असतो त्यामुळे असंख्य पोष्टी अशाच अटंक्यावस्थेत विरून जातात. यालाच ब्ळॅ असेही म्हणतात.

तरीपण,

मांजरं मात्र मऊ असतात. अन् ती तशी आहेत तोवर आपल्याला काळजीचं कारण नाही.

Untitled

आयकॅनहॅझचीझबर्गरवरून एक मऊशार असे मांजर जे दिसायला गोंडसही आहे.

तळटीपा :

1. हंगाम म्हणलं की नेमका भाद्रपदच आठवतो राव…. काहीतरी केलं पाहिजे…

2. उपरिनिर्दिष्टित – कणेकर या शब्दाला शिंचा असे संबोधतात. मी सहमत आहे. शिंचा म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही पण शिवी वापरताना तिचा अर्थ माहीत असणं शिवीदेयकावर बंधनकारक नाही पण उच्चार अन् आवाजाचे चढउतार बरोबरच आले पाहिजेत. त्याला पर्याय नाही. खालील उदाहरण विचारात घेणे.

3. परिच्छेद हा शब्द असाही वापरता येईल : तुझ्या **** च्या ****त परिच्छेद !!!! इथे परिच्छेद या एरव्ही निरूपद्रवी शब्दाच्या सहाय्याने अत्यंत हिंसक परिणाम साधता येतील. या शब्दात योगायोगाने ‘द्’ अन् ‘च्’  ही व्यंजने येतात त्यामुळे शब्दाच्या मूळ अर्थाशी अनभिज्ञ असणाऱ्या श्रोत्यांवर वरील वाक्प्रयोगाचे परिणाम अत्यंत तीव्र भासतील.

४. ही तळटीप वर कुठेही वापरलेली नाही. पण लिहिली नसती तर हिच्यावर अन्याय केल्याचा आरोप माझ्यावर आला असता.

५. असे म्हणतात की इतरांकडे बोट दाखवताना चार बोटं स्वतःकडे असतात.अंगुलिनिर्देशाच्या एका उपपद्धतीत मात्र मध्यगा नभाकडे तर उर्वरित बोटे वसुंधरेकडे निर्देश करीत असतात.

चित्रपटपूर्ण रविवार

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि शेवटी जुन्या कृष्णधवल  अॅडम्स फॅमिलीचा एक एपिसोड अशी मस्त मॅरॅथॉन झाली. व्हांटेज पॉइंट एक वेगवान आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन. मी तो चित्रपट आजून किमान चारदा पहायची शक्यता आहे.*

चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी पाचसहा वर्षांचा असेन. मामाकडे व्हीसीआरवर कॅसेट भाड्यानं आणून पाहिला होता. एक तर मी खूप लहान होतो आणि पाहता पाहता झोपलो पण होतो (हे बरं आठवतंय) त्यामुळे चित्रपट लक्षात नव्हता पण नंतर या गोष्टीची मी कैक वेळा पारायणं केली होती. लहानपणीची ती एक आवडती गोष्ट इतक्या वर्षांनी परत पाहताना फार मस्तं वाटलं.

ही कथाच मुळात लहान मुलांसाठी आहे. एक विक्षिप्त संशोधक प्रोफेसर पॉट्स, त्याची दोन मुलं , त्यांना भेटणारी ट्रुली स्क्रंप्शस आणि त्यांची एक गाडी यांची ही गोष्ट. मुलांच्या आवडीखातर प्रोफेसर एक जुनी गाडी आणतात आणि तिची डागडुजी करून तिला नवं रूप देतात. या रूपांतरणात गाडीत काही सुरस व चमत्कारिक बदल होतात आणि अशी ही अफाट गाडी एका दुष्ट राजाच्या मनात भरते. त्यानंतर गुप्तहेर, प्रोफेसरांच्या वडिलांचं अपहरण, उडत्या गाडीनं केलेला पाठलाग आणि अखेर  त्या दुष्ट राजाराणीपासून जनतेची सुटका असा साहसप्रवास हा चित्रपट घडवतो.

साठच्या दशकातला हा एक ब्रिटिश चित्रपट. हिंदी चित्रपटांप्रमाणे यात दर काही मिनिटांच्या अंतरावर मस्तपैकी नाच आणि गाणी आहेत. इंग्रजी चित्रपटांत आजवरतरी असं काही बघायला मिळालं नव्हतं. या वेगळेपणामुळे आजूनच मजा आली.

हेच लहानपण पुढे चालू द्यावं म्हणून स्कूबी-डू चाही एक चित्रपट बघून टाकला. हा आधीही पाहिला होता पण परत एकता बघताना बरं वाटलं. तिकडूनच पुढे नेटफ्लिक्सवर चाळता चाळता अॅडम्स फॅमिलीचे जुने एपिसोड्स दिसले. कार्टून नेटवर्कवर याची अॅनिमेटेड सीरीज बघितली होती त्याचं मूळ कसं आहे हे बघावं म्हणून पहिला एपिसोड बघून टाकला. आठवडा दोन आठवड्यात सीझन संपवून टाकीन म्हणतो.

डोळ्यांना असा अथक त्रास दिल्यानंतर रात्री निमूटपणे देव-डी आणि रॉक ऑनची गाणी ऐकत बसलो. रात्रीच्या जेवणाची आणि उद्याच्या डब्याची सोय केली. आमटी आजही बरी जमली, सलग दुसऱ्यांदा, म्हणजे मटका नसावा…

आता झोपतो, उद्या ऑफिस आहे आणि मांजरही मऊ आहे.

आपला,
~नॅकोबा

*वाचकांस नम्र विनंती, चित्रपटांच्या आवडींबाबत लेखकावर विश्वास ठेवताना खालील बाब जरूर लक्षात घ्यावी :
सदर पोस्टच्या लेखकाने ‘टशन’ हा चित्रपट आपल्याला आवडल्याचे व तो दोनदा आणि तेही थिएटरमधे पाहिला असल्याचे कबूल केले आहे.

आमटी

आमटी हा माझा जीव की प्राण. जेवणात आमटी नसली की माझं आडतं आणि असली तर भात किंवा पोळीव्यतिरिक्त बाकी काही लागत नाही. त्यामुळेच आज जेव्हा मी जेवणात आमटी खात होतो तेव्हा आकाश ठेंगणं झालं होतं, हात गगनाला टेकले होते आणि स्वर्ग पण दोन बोटं उरला होता. मग फार वेळ न दवडता मी तो स्वर्गीय वाटणारा दोन घास आमटीभात संपवला आणि समाधानाचा ढेकर यावा म्हणून कपात कोकाकोला ओतला.( हे शेवटचं उगाच… काही कोकाकोला वगैरे ओतलेला नाईये… जरा तोंड आलंय, थंडावा म्हणून गरम हिरवा चहा पितोय ! )

कधी आळस, कधी उगाच म्हणून मी आमटीचा प्रयोग टाळत आलो होतो. आज मात्र ऑफिसमधून आल्या आल्या मी एका अज्ञात उत्साहाने भारलो गेलो… राईस कुकरात भात आणि प्रेशर कुकरात डाळ लागली… जरा वेळानं  मला कुकर लावायला फारसा आवडत नाही (नव्हता, आताचं माहीत नाही, सध्या आनंदी आहे,  व्हेन हॅपी पोट, डोण्ट काऊंट युअर वोट ) आधी राईस कुकरात आणि मायक्रोवेवमधे डाळ शिजवण्याचा प्रयत्न करून झाला होता पण त्यातून भांडी धुवायला लागण्यावाचून काहीच हाशिल झालं नाही. नाही म्हणायला एकदा प्रेशर कुकरात डाळ जमून गेली होती (मटका). प्रेशर कुकर नंतर धूत बसावा लागतो हो… आणि नुसता तोच नाही, डाळ हाटायला घेतलेलं भांडं, आमटी किंवा दालफ्रायसाठी वापरलेला पॅन, जेवणाचं ताट, आमटीचा बाऊल असं सर्व जग स्वच्छ करावं लागतं. केवळ करावं लागणार याच कल्पनेनं कमालीचा आळस दाटतो आणि एकूणच बेतावर पाणी फिरतं.

आज सगळं कसं मस्त मस्त झालं… डाळ व्यवस्थित शिजली… पॅनमधे तेल बदाबद पडलं नाही… गरम मोहरी उडून नाकपुडीत शिरली नाही ( आधीही कधी झालं नव्हतं, झाल्याचं ऐकलंही नाईये पण झालंच तर एखाद्याची बेक्कार शाळा होईल ), पाणी जास्त झालं नाही, तिखट घालायचं विसरलो नाही आणि मीठसुद्धा व्यवस्थित !! आता कढिलिंबाची पिशवी आणायला हरकत नाही.

समोर ताट… ताटात भात, आमटी, पोळी (गोठवून गरम केलेली), चटणी, मदर्स रेसिपीचं लोणचं… टीव्ही चालू… आनंद !!! कसं अगदी जेवल्यासारखं वाटलं.

आपुला,

(तृप्त) नॅकोबा

पाऊस

अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.

मला नाही !!!

पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत, कदाचित त्या औषधांच्या डोसांपेक्षाही तीव्र… पावसात भिजून वाहणारं नाक आणि त्या पावसाळी पाण्यामुळे वाहणारं पोट या दोन्ही गोष्टींमधे रम्य, सुखद असं काहीच नाही. आणि या आठवणींवर हळुवार फुंकर वगैरे घालून मला शांत कोवळ्या गारव्यात गुरफटून टाकेल अशी कोणी अजून या दिशेने फिरकली नाही. मान्सूनमधे भिजलो तरी वाळवंट काही सरलं नाही.

आता मात्र पावसाचं जरा फारच चाललंय. जूनपासून मागे लागलाय हा, माझा पिच्छाच सोडायला तयार नाही… पुण्यात भेटला जूनमधे… नेहेमीसारखा पडला, थोडा कमीच पडला असेल कदाचित पण तीन महिने मधूनअधून भेटत होता. नंतर त्याला करमेला ऑक्टोबर-नोव्हेंबरमधेही  पुण्यात वाट्टेल तसा पडला. डिसेंबरमधे माझी उडायची वेळ आलेली तेव्हाही पडेल की काय असं वाटत होतं पण हा तसा शांत राहिला. जानेवारीपासून मात्र हा पडतोच आहे इकडे… बर आपल्याकडे बरं असतं. पावसाळा म्हणला की निमूट रेनकोटसकट बाहेर पडायचं नाहीतर भिजायचं. असा सोपा नियम. इकडे पावसाळा गृहीत धरून रेनकोट न्यावा तर सूर्यदेव दिवसभर कार्यभाग सांभाळतात आणि संध्याकाळी बससाठी उभं राहताना दप्तरात ओझं होतं. नेऊ नये म्हणलं तर वाहतं नाक आणि पोट आठवतं. मग काय, निमूटपणे छत्री दप्तरात सरकवतो.

पाऊस चार दिवस बरा वाटतो, चहाचे घोट किंवा गरमागरम मॅगीच्या लडींबरोबर गटागट गिळता येतो. सहा महिने होतील आता, वाट बघतोय हा थांबायची. किती हा माझा स्वार्थीपणा… इकडे कॅलिफोर्निया पावसाबाबत समाधानी आहे. मी अमेरिकेतच कोलंबसमधल्या मित्राला फोन केला होता मधे तेव्हा या पावसाबाबत कुरकूर केली. “साल्या, कॅलिफोर्नियात राहून हवामानाबद्दल तक्रार काय करतोस !! ” ऐकायला मिळालं.

सकाळी उठल्या उठल्या पावसाचा आवाज ऐकला की उठायची जिद्दच निघून जाते. घरीच बसावं वाटतं पण ऑफिसला तर जावंच लागतं… एकूणच मी पावसात जायचं टाळतो. शनिवार-रविवार पाऊस असेल तर फारच बोर होतं. एरवी कसाही संपणारा दिवस अचानक फार कंटाळवाणा आणि मोठा वाटायला लागतो.

आता एकतर हा पाऊस लवकर संपो, किंवा मृद्गंध जागृत करणारी ती हळुवार फुंकर तरी सापडो हीच इच्छा….

आपला,

~नॅकोबा

हुक्की

आज ब्लॉगपोस्ट करायची मजबूत हुक्की आलीय… हुक्की, साधीसुधी इच्छा नाही तर चक्क हुक्की. एरवी मधून अधून होत असते इच्छा, इथे काहीतरी लिहायची पण या ना त्या कारणानी दुर्लक्ष होतं. आज मात्र या इच्छेचा वेग प्रचंड आहे. काहीतरी खरडल्याशिवाय राहावत नाईये.

लिहायचा विचार डोक्यात आला की वाट्टेल ते लिहिता येईल असं वाटतं पण प्रत्यक्षात कीबोर्ड बडवायला बसलं की विचाराचा पोपट होऊन भुर्रर्र उडून जातो. मांजरं, नुकत्याच पाहिलेल्या अमेरिकन सिरीयल्स, जून पासून मागे लागलेला आणि नोव्हेंबरमधे पुण्यात वैताग आणल्यानंतर इथे कॅलिफोर्नियातही माझा पिच्छा न सोडलेला पाऊस, चावट विचार, गंभीर विचार, सचिन तेंडुलरकचं नुकतंच झालेलं एकमेवाद्वितीय विश्वविक्रमी द्विशतक, परत एकदा मांजरं असे अनेक विचार एकापोठोपाठ येतात आणि एकमेकांशी भांडून तरातरा निघून जातात आणि त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्या डोक्यात तरंगत राहतात. मग “श्या !!!” (ट)  काही लिहिताच येत नाही आपल्याला ब्लॉगवर असं वाटत राहातं. विचारांना पकडून जेरबंद करायचा विचारही कधीकधी येतो पण तोही स्वतःचा स्वार्थ साधून बरोबर आळसाला पुढे करतो. अशी पंचाईत आहे.

पण ऐसा कैसा चलेंगा ना??? इतके दिवस (म्हणजे पुण्यात असताना) बऱ्याच निरर्थक विचारांना तोंडामार्फत बाहेची वाट दाखवल्ये. या ब्लॉगच्या सुरूवातीमागचा उद्देशही हाच होता की मनात येईल ते बरंचसं निरर्थक आणि कधीकधी सार्थ असं इथे मांडावं. आळस आपली टांग मधेमधे घालतो ना…… मग जेव्हा असं उजाडतं तेव्हा ठरवतो आता रोज काहीतरी लिहायचं न विसरता. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

चालायचंच…

चहाची हुक्की फिटल्यानंतर पुढच्या चहाची चिंता करायची नसते.

आपला,

~नॅकोबा

दुसर्यांदा सीमोल्लंघन

जवळजवळ वर्षं होत आलं होतं हा ब्लॉग सुरू करून. गेल्या वर्षी दसर्याच्या मुहूर्तावर हा ब्लॉग सुरू केला खरा, पण यावर काही लिहिण्याच्या बाबतीत मात्र पार बट्ट्याबोळ होता… नाही म्हणायला अगदीच ५-७ पोस्ट्स होत्या… पण फार विशेष असे काही नाही.
मी तसा संगणकवेडा त्यामुळे माझा हा ब्लॉग सुद्धा मी स्वतःच्या संगणकावरून चालवला होता (भारी वाटतं… करून बघा !). अचानक गोष्टी बंद पडू शकतात व नंतर ब्लॉगचे किस्से होऊ शकतात या वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव होती… या गेल्या वर्षातच दोनदा माझ्या संगणकाने या ब्लॉगला दिवसा तारे दाखवले होते…

दोनदा ब्लॉगचा श्वास अडे..
मजबुत डेटा लॉस घडे…
बॅकप तरिही जो न करे
तो (मी) एक मूर्ख !!

आळस नडला… गेल्या वेळी निदान गूगल रीडर मधून एक-दोन पोस्ट परत मिळवता आल्या होत्या या वेळी मात्र सपशेल हार…

शेवटी, नवीन जागी नवीन ब्लॉगने सुरुवात केली. बघू कसं काय जमतंय ते…

~नॅकोबा