चित्रपटपूर्ण रविवार

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि शेवटी जुन्या कृष्णधवल  अॅडम्स फॅमिलीचा एक एपिसोड अशी मस्त मॅरॅथॉन झाली. व्हांटेज पॉइंट एक वेगवान आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन. मी तो चित्रपट आजून किमान चारदा पहायची शक्यता आहे.*

चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी पाचसहा वर्षांचा असेन. मामाकडे व्हीसीआरवर कॅसेट भाड्यानं आणून पाहिला होता. एक तर मी खूप लहान होतो आणि पाहता पाहता झोपलो पण होतो (हे बरं आठवतंय) त्यामुळे चित्रपट लक्षात नव्हता पण नंतर या गोष्टीची मी कैक वेळा पारायणं केली होती. लहानपणीची ती एक आवडती गोष्ट इतक्या वर्षांनी परत पाहताना फार मस्तं वाटलं.

ही कथाच मुळात लहान मुलांसाठी आहे. एक विक्षिप्त संशोधक प्रोफेसर पॉट्स, त्याची दोन मुलं , त्यांना भेटणारी ट्रुली स्क्रंप्शस आणि त्यांची एक गाडी यांची ही गोष्ट. मुलांच्या आवडीखातर प्रोफेसर एक जुनी गाडी आणतात आणि तिची डागडुजी करून तिला नवं रूप देतात. या रूपांतरणात गाडीत काही सुरस व चमत्कारिक बदल होतात आणि अशी ही अफाट गाडी एका दुष्ट राजाच्या मनात भरते. त्यानंतर गुप्तहेर, प्रोफेसरांच्या वडिलांचं अपहरण, उडत्या गाडीनं केलेला पाठलाग आणि अखेर  त्या दुष्ट राजाराणीपासून जनतेची सुटका असा साहसप्रवास हा चित्रपट घडवतो.

साठच्या दशकातला हा एक ब्रिटिश चित्रपट. हिंदी चित्रपटांप्रमाणे यात दर काही मिनिटांच्या अंतरावर मस्तपैकी नाच आणि गाणी आहेत. इंग्रजी चित्रपटांत आजवरतरी असं काही बघायला मिळालं नव्हतं. या वेगळेपणामुळे आजूनच मजा आली.

हेच लहानपण पुढे चालू द्यावं म्हणून स्कूबी-डू चाही एक चित्रपट बघून टाकला. हा आधीही पाहिला होता पण परत एकता बघताना बरं वाटलं. तिकडूनच पुढे नेटफ्लिक्सवर चाळता चाळता अॅडम्स फॅमिलीचे जुने एपिसोड्स दिसले. कार्टून नेटवर्कवर याची अॅनिमेटेड सीरीज बघितली होती त्याचं मूळ कसं आहे हे बघावं म्हणून पहिला एपिसोड बघून टाकला. आठवडा दोन आठवड्यात सीझन संपवून टाकीन म्हणतो.

डोळ्यांना असा अथक त्रास दिल्यानंतर रात्री निमूटपणे देव-डी आणि रॉक ऑनची गाणी ऐकत बसलो. रात्रीच्या जेवणाची आणि उद्याच्या डब्याची सोय केली. आमटी आजही बरी जमली, सलग दुसऱ्यांदा, म्हणजे मटका नसावा…

आता झोपतो, उद्या ऑफिस आहे आणि मांजरही मऊ आहे.

आपला,
~नॅकोबा

*वाचकांस नम्र विनंती, चित्रपटांच्या आवडींबाबत लेखकावर विश्वास ठेवताना खालील बाब जरूर लक्षात घ्यावी :
सदर पोस्टच्या लेखकाने ‘टशन’ हा चित्रपट आपल्याला आवडल्याचे व तो दोनदा आणि तेही थिएटरमधे पाहिला असल्याचे कबूल केले आहे.

आमटी

आमटी हा माझा जीव की प्राण. जेवणात आमटी नसली की माझं आडतं आणि असली तर भात किंवा पोळीव्यतिरिक्त बाकी काही लागत नाही. त्यामुळेच आज जेव्हा मी जेवणात आमटी खात होतो तेव्हा आकाश ठेंगणं झालं होतं, हात गगनाला टेकले होते आणि स्वर्ग पण दोन बोटं उरला होता. मग फार वेळ न दवडता मी तो स्वर्गीय वाटणारा दोन घास आमटीभात संपवला आणि समाधानाचा ढेकर यावा म्हणून कपात कोकाकोला ओतला.( हे शेवटचं उगाच… काही कोकाकोला वगैरे ओतलेला नाईये… जरा तोंड आलंय, थंडावा म्हणून गरम हिरवा चहा पितोय ! )

कधी आळस, कधी उगाच म्हणून मी आमटीचा प्रयोग टाळत आलो होतो. आज मात्र ऑफिसमधून आल्या आल्या मी एका अज्ञात उत्साहाने भारलो गेलो… राईस कुकरात भात आणि प्रेशर कुकरात डाळ लागली… जरा वेळानं  मला कुकर लावायला फारसा आवडत नाही (नव्हता, आताचं माहीत नाही, सध्या आनंदी आहे,  व्हेन हॅपी पोट, डोण्ट काऊंट युअर वोट ) आधी राईस कुकरात आणि मायक्रोवेवमधे डाळ शिजवण्याचा प्रयत्न करून झाला होता पण त्यातून भांडी धुवायला लागण्यावाचून काहीच हाशिल झालं नाही. नाही म्हणायला एकदा प्रेशर कुकरात डाळ जमून गेली होती (मटका). प्रेशर कुकर नंतर धूत बसावा लागतो हो… आणि नुसता तोच नाही, डाळ हाटायला घेतलेलं भांडं, आमटी किंवा दालफ्रायसाठी वापरलेला पॅन, जेवणाचं ताट, आमटीचा बाऊल असं सर्व जग स्वच्छ करावं लागतं. केवळ करावं लागणार याच कल्पनेनं कमालीचा आळस दाटतो आणि एकूणच बेतावर पाणी फिरतं.

आज सगळं कसं मस्त मस्त झालं… डाळ व्यवस्थित शिजली… पॅनमधे तेल बदाबद पडलं नाही… गरम मोहरी उडून नाकपुडीत शिरली नाही ( आधीही कधी झालं नव्हतं, झाल्याचं ऐकलंही नाईये पण झालंच तर एखाद्याची बेक्कार शाळा होईल ), पाणी जास्त झालं नाही, तिखट घालायचं विसरलो नाही आणि मीठसुद्धा व्यवस्थित !! आता कढिलिंबाची पिशवी आणायला हरकत नाही.

समोर ताट… ताटात भात, आमटी, पोळी (गोठवून गरम केलेली), चटणी, मदर्स रेसिपीचं लोणचं… टीव्ही चालू… आनंद !!! कसं अगदी जेवल्यासारखं वाटलं.

आपुला,

(तृप्त) नॅकोबा