काल आईनं सांगितलं की पेपरात फायरफॉक्सवर कसलासा लेख आलाय म्हणे. लेखाच्या आदल्याच दिवशी तिला फायरफॉक्स बघायला मिळाला होता त्यामुळे तिनं मला या लेखाबद्दल आवर्जून सांगितलं. (जरा विषयांतर करतो..) एरवी मी आईला फायरफॉक्स उघडू दिला नसता. कारण भारतातून निघण्यापूर्वी मी हिस्ट्री क्लियर केली आहे की नाही हे मला नक्की आठवत नाहीये… संगणक पालकांना हाताळू देताना जवळजवळ प्रत्येक तरूणाच्या मनात ही धास्ती असते. (तरूणींचं माहीत नाही. पण त्यांना असले प्रश्न पडत नसावेत या समजात (किंवा गैरसमजात) मी सुखी आहे… असो.) नुकताच घडलेला किस्सा. बाबांच्या (म्हणजे माझ्या जुन्या) संगणकात काहीतरी बिघाड झाला म्हणून माझा एक मित्र घरी जाऊन पाहून आला. काही दिवसांनी तोच मित्र परत पेन ड्राईव घेऊन आमच्या घरी!! त्याला थोडं अभ्यासाचं मटेरियल हवंय अशी कल्पना मी घरी देऊन ठेवली होती. (विषयांतर संपलं)
परवा मात्र अगदी महत्वाचं काम होतं म्हणून मला अखेर आईला फायरफॉक्सपर्यंत न्यावंच लागलं. आई शिक्षिका. तिचं जनगणनेचं काम आता संपत आलंय. या कामाचाच भाग म्हणून त्यांना आपापल्या जनगणना प्रभागाचा एक नकाशा काढायचा असतो. (रिड्डिक्युलस. पण नाईलाज त्याला काय इलाज?) सरकारी काम असलं तरी आई चक्क ते मनापासून करते. नकाशे उरकणारे महाभागही असतीलच, शंका नाही. अशा यागणलेल्या (गंडलेल्या) माहितीबद्दल मला तर एकूणच शंका वाटते. असो. तर नकाशा. ज्या प्रभागाचं काम तिनं केलं त्याचा नकाशा काढायचा प्रयत्न करूनही कुठेतरी गंमत होत होती अन् दिशा काही जुळत नव्हत्या. आईच्या एका मैत्रिणीनं तिला इंटरनेटवरच्या मॅप्सची कल्पना सुचवली अन् आईनं मला कामाला लावलं. भारतात घरबसल्या एक आई आपल्या अमेरिकेत बसलेल्या आळशी मुलाला चक्क कामाला लावते… तंत्रज्ञानाचीही कमाल आहे !
मग प्रभाग पटापट शोधून गूगल मॅप्सची लिंक आईला स्काईपवरून घाबरत घाबरतच पाठवली. भले फायरफॉक्स स्वच्छ केला असेलही मी, पण कोणतीही अनपेक्षित विंडो आली की आई घाबरते अन् मग सगळं स्पष्ट करून सांगावं लागतं की विंडो का आली, तिचं काय करायचं वगैरे. फायरफॉक्स सुरू झाला, पण नेमकी अपडेटची विंडो आली. मग फायरफॉक्स अपडेट, त्याच्यापाठोपाठ फ्लॅश प्लेअर अपडेट, मग फायरफॉक्स रीस्टार्ट, मग पुन्हा लिंक वर क्लिक अशा सर्व पारऱ्या ओलांडून शेवटी नकाशाप्रत पोहोचलो. त्यानंतर माध्यमातून त्या नकाशाभर हिंडलो. प्रिंट कशी काढता येईल वगैरे सांगितलं. झूम कसा करायचा, नकाशा वर-खाली कसा सकरवायचा वगैरे सांगितलं. हे सगळंच्या सगळं आईला जमलंही. (मी पुण्यात असताना काही शिकायचं नसतं… मी लांब गेलो की मात्र स्काईप, गूगल चॅट अगदी मोबाईल फोनसुद्धा व्यवस्थित शिकायचं, हाताळायचं…. पण मी पुण्यात पोचलो रे पोचलो की पुन्हा फक्त स्पायडर सॉलिटेअर जिंदाबाद)
माझा घरचा फायरफॉक्स मराठी. सगळं काम आटोपल्यावर आईनं “वरच्या उजव्या कोपऱ्यातली फुली” केली. फायरफॉक्सनं बंद होताना नेहेमीची विचारणा केली. टॅब्ज संचयित करा व बाहेर पडा, बाहेर पडा अन् रद्द करा. त्यांच्या खाली एक पर्याय होता तो आईनं अस्सा काही वाचून दाखवला की मी पोट धरून हसत सुटलो. म्हणाली “फायरफॉक्स बघ काय म्हणतोय मला… पुढच्या वेळी विचारू नका…” हा ”पुढच्या वेळी विचारू नका” चा उच्चार डिट्टो क्लोरमिंटच्या “अब दोबारा मत पूछना” या धर्तीचा होता. काम झाल्यामुळं आई खूश होती, मी हसून लोळत होतो आणि पुणेरी वाटावं अशा मराठीत फायरफॉक्समस्तपैकी माज करून दाखवत होता.