नांदा सौख्य भरे?

पूर्णपणे दिशाभूल करणारं शीर्षक टाकून झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो एक कहाणी.

दोन वर्षं झाली, दोघं सुखानं नांदत होते. यांचं फिस्कटेल अशी बाहेरच्या कोणाला पुसटशीही शंका आली नसती. चारआठ महिन्यांपूर्वी म्हणायला जरा घुरघुर, गरमागरमी झाली होती पण ते केवळ जवळच्यांनाच माहीत. परिस्थिती बदलली आणि ही घुरघुर कमी झाली. एकूणच प्रकरण निवळलं म्हणायला हरकत नव्हती. पण अचानक परवा त्यानं तिच्यासोबत नांदण्यास सपशेल नकार दिला. बाहेरच्यांनी हस्तक्षेपही करून पाहिला पण परिणाम शून्य… शेवटी अमेरिकेचं वारं लागलंय म्हणायचं…

“ही जोपर्यंत निघून जात नाही तोवर माझा पूर्ण असहकार असेल”, तो म्हणाला. तिचं मन फारसं मोठं नाही म्हणे… मनात सत्राशेसाठ गोष्टी असतात हिच्या, पण माझ्या जवळच्यांसाठी हिच्या मनात जागा नाही असा सरळसरळ आरोप होता त्याचा तिच्यावर. मधूनअधून भेटायला येणारी हिची मैत्रीण बरी हिच्यापेक्षा. त्रयस्थ, पण जे सांगू ते मनात साठवून ठेवते. ही मात्र…..

एरवी आत बसून शांतपणे आपलं काम चोख पार पाडणारी ती सर्व बंध तोडून बाहेर पडली. तिच्या मनाला चांगलाच धक्का होता हा. त्यातून ती सावरणं मुश्किलच.

ती गेली अन् तोही पार एकटा पडला… आता बाहेरच्यांच्या मदतीशिवाय त्याचं काहीच चालत नाही. साली “बॅड सेक्टर” वाली….. गेली तेच बरं असं समजवू पाहतोय तो स्वतःला. सध्या तो दुसऱ्या “ती”च्या शोधात आहे…

आता सांगतो नक्की काय झालं…..

परवा माझा लॅपटॉप राम म्हणल्याचं सांगितलं होतं ना. त्याचंच हे विश्लेषण. दोन वर्षं अविरत झटल्यानंतर शेवटी हार्ड डिस्क गंडली… ईन मीन एकशेवीस जीबी ची काय ती हार्ड डिस्क. भरून गेली होती. नवीन काही टाकावं म्हणलं तर आधीचं उडवायला लागायचं… तरी मधून अधून एक्सटर्नल हार्ड डिस्कवर बॅकप घेतला असल्यानं फार फोटो वगैरे आठवणी शाबूत आहेत. परवापासून लॅपटॉप  सुरू करतानाच डार्डवेअर एरर वर गोष्टी थांबायच्या. यूएसबी लावून लाईव उबुंटू सुरू करायचा प्रयत्न केला तरी पुन्हा तेच. शेवटी हार्ड डिस्क काढली. त्यानंतर कुठे लॅपटॉप उबुंटू मधे सुरू झाला. पण त्याला आला स्वतःची हार्ड डिस्क नाही. नवीन आणावी लागणार आहे. तोवर यूएसबी शिवाय काही तो चालायचा नाही.

बघू… मस्तपैकी पाचशे जीबी डिस्क टाकता येईल आता. पण आता विंडोज वगैरे नव्यानं इन्टॉल करणं आलं… कामासाठी उबुंटू ठीक आहे पण गेम्स खेळायला आणि इतर उद्योग करायला विंडोजच बरं पडतं… पुढचा वीकेंड लांबरूंद आहे त्यात या सगळ्या गोष्टी जमवता येतील. बऱ्याच दिवसांपासून लॅपटॉपचा डीवीडी रायटरही नीट चालत नाहीये त्याच्याकडेही बघता येईल. शेवटी तोही तिचाच नातलग…

7 thoughts on “नांदा सौख्य भरे?

  1. इकडे सुद्धा सेम रे…पण गंडल वैगरे काही नाही…अजूनही दोघात उतत्म जमतंय पण दुसरा जोडीदर हवा आहे…अन दुसरीचा रेट सध्या झेपत नाहीये… :(

  2. माझ्या माहितीप्रमाणे एका हार्ड डिस्कवरील प्रोग्राम दुसरीवर उतरविणारी प्रणाली उपलब्ध आहे

  3. ही पोस्ट वाचताना उगाच हेरंबची आठवण झाली…:) मस्तच जमलीय….

  4. अपर्णा, धन्यवाद.
    हेरंबचा ब्लॉग आवडीनं वाचतो मीसुद्धा. तिकडून थोडे संस्कार यायची अगदीच शक्यता आहे :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>