आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.
व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि शेवटी जुन्या कृष्णधवल अॅडम्स फॅमिलीचा एक एपिसोड अशी मस्त मॅरॅथॉन झाली. व्हांटेज पॉइंट एक वेगवान आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन. मी तो चित्रपट आजून किमान चारदा पहायची शक्यता आहे.*
चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी पाचसहा वर्षांचा असेन. मामाकडे व्हीसीआरवर कॅसेट भाड्यानं आणून पाहिला होता. एक तर मी खूप लहान होतो आणि पाहता पाहता झोपलो पण होतो (हे बरं आठवतंय) त्यामुळे चित्रपट लक्षात नव्हता पण नंतर या गोष्टीची मी कैक वेळा पारायणं केली होती. लहानपणीची ती एक आवडती गोष्ट इतक्या वर्षांनी परत पाहताना फार मस्तं वाटलं.
ही कथाच मुळात लहान मुलांसाठी आहे. एक विक्षिप्त संशोधक प्रोफेसर पॉट्स, त्याची दोन मुलं , त्यांना भेटणारी ट्रुली स्क्रंप्शस आणि त्यांची एक गाडी यांची ही गोष्ट. मुलांच्या आवडीखातर प्रोफेसर एक जुनी गाडी आणतात आणि तिची डागडुजी करून तिला नवं रूप देतात. या रूपांतरणात गाडीत काही सुरस व चमत्कारिक बदल होतात आणि अशी ही अफाट गाडी एका दुष्ट राजाच्या मनात भरते. त्यानंतर गुप्तहेर, प्रोफेसरांच्या वडिलांचं अपहरण, उडत्या गाडीनं केलेला पाठलाग आणि अखेर त्या दुष्ट राजाराणीपासून जनतेची सुटका असा साहसप्रवास हा चित्रपट घडवतो.
साठच्या दशकातला हा एक ब्रिटिश चित्रपट. हिंदी चित्रपटांप्रमाणे यात दर काही मिनिटांच्या अंतरावर मस्तपैकी नाच आणि गाणी आहेत. इंग्रजी चित्रपटांत आजवरतरी असं काही बघायला मिळालं नव्हतं. या वेगळेपणामुळे आजूनच मजा आली.
हेच लहानपण पुढे चालू द्यावं म्हणून स्कूबी-डू चाही एक चित्रपट बघून टाकला. हा आधीही पाहिला होता पण परत एकता बघताना बरं वाटलं. तिकडूनच पुढे नेटफ्लिक्सवर चाळता चाळता अॅडम्स फॅमिलीचे जुने एपिसोड्स दिसले. कार्टून नेटवर्कवर याची अॅनिमेटेड सीरीज बघितली होती त्याचं मूळ कसं आहे हे बघावं म्हणून पहिला एपिसोड बघून टाकला. आठवडा दोन आठवड्यात सीझन संपवून टाकीन म्हणतो.
डोळ्यांना असा अथक त्रास दिल्यानंतर रात्री निमूटपणे देव-डी आणि रॉक ऑनची गाणी ऐकत बसलो. रात्रीच्या जेवणाची आणि उद्याच्या डब्याची सोय केली. आमटी आजही बरी जमली, सलग दुसऱ्यांदा, म्हणजे मटका नसावा…
आता झोपतो, उद्या ऑफिस आहे आणि मांजरही मऊ आहे.
आपला,
~नॅकोबा
*वाचकांस नम्र विनंती, चित्रपटांच्या आवडींबाबत लेखकावर विश्वास ठेवताना खालील बाब जरूर लक्षात घ्यावी :
सदर पोस्टच्या लेखकाने ‘टशन’ हा चित्रपट आपल्याला आवडल्याचे व तो दोनदा आणि तेही थिएटरमधे पाहिला असल्याचे कबूल केले आहे.
#1 by Kanchan Tamhankar on March 29, 2010 - 12:27 am
छान…. पण एकच पोस्ट तीनदा का..?? नाही म्हणजे परिणाम वाढवण्याचा काही प्रयत्न वगैरे..?????
आवडतंय हो आपलं लेखन… असंच चालू ठेवा…
मांजर परिणामापासून थोडा लांब गेल्यासारखा वाटतोय्स. छान.. खूप बरं वाटलं…
This comment was originally posted on Google Buzz.
#2 by anjali bapat on March 29, 2010 - 11:10 am
"टशन" दोन वेळा थिअटर मधे बघणारा माणूस जगात काहीही सहन करू शकतो, त्याच्या सहन-शक्ति ला सलाम !!! [:P]

This comment was originally posted on Google Buzz.
#3 by हेरंब on March 29, 2010 - 11:25 am
‘टशन’?? दोनदा?? आणि तेही थिएटरमधे ??? अरे देवा देवा !!
#4 by Harsh on April 1, 2010 - 7:07 am
मीही साधारण २ महिन्यापूर्वी असेच शनिवार – रविवारी थिअटरमधे ३ मराठी चित्रपट बघितले. मजा आली. पण तू तर record केलास. एक दिवसात ४. लगे रहो …
#5 by JaguarNac on April 3, 2010 - 1:06 am
गंमत म्हणून असं काहीतरी करायला मजा येते
#6 by JaguarNac on April 3, 2010 - 1:07 am
नो स्मोकिंग थेटरात पाहिलाय. तेव्हापासून नावड ही संवेदनाच नाहीशी झाल्यासारखी वाटत्ये
#7 by हेरंब on April 6, 2010 - 10:04 am
रच्याक (मराठी BTW) नॅकोबा, एक सांगायचं राहिलं. माझा एका विकेंडचा १५ पिक्चर्सचा रेकॉर्ड आहे. अर्थात सगळे विंग्रजी हेसांनल ..!!
#8 by JaguarNac on April 6, 2010 - 10:41 am
आता पुढ्चा वीकएण्ड डेडिकेटेड टू हेरंब !!!