अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही. ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. एरवी असल्या (कोणत्याही सामाजिक, राजकीय इ.) विषयावर मी फारसं बोलत नाही. करायचीच असली तर आधी आचरट आणि नंतर गंभीर मतं व्यक्त करून मोकळा होतो. बाकी तसा माझा राजकारण किंवा समाजकारण या गोष्टींशी संबंध नाही आणि अभ्यास तर मुळीच नाही. (खरं तर मी पुण्याचा आहे एवढंच कारण पुरेसं आहे, पण…)
आज मी एवढं पेटायचं कारण म्हणजे च्यायला एवढी इंट्रेश्टिंग बातमी आणि एकाही मित्रानं साधी ऑनलाईन हिंट पण दिली नाही… अरे… काय चाललंय काय ! कित्येक दिवस मी या बातमीची, निर्णयाची वाट पाहात होतो… (तशी मी ‘फालतू लोकांना मारण्यास कायदेशीर परवानगी’ या बातमीचीही वाट बघतोय, आणि ती आली तरी मी काय लगेच उठून एकता कपूर किंवा हिमेश रेशमिया मागे लागेन असं नाही. हे म्हणजे आत्महत्येस परवानगी मिळाल्यास पंख्यांच्या व्यवसायास बरकत येईल किंवा टेरेस गार्डन्स मधे गर्दी वाढेल म्हणण्यासारखं आहे. ) जुन्या ऑफिसातील माझ्या एका कलीगने मला सल्ला दिला होता ‘तू लिव इन रिलेशनमधेच रहा अरे, तुला परफेक्ट आहे’. तेव्हापासून या ऑप्शनसाठी माझ्या जिवाचा चातक झाला होता. (वरचा कंस पुन्हा वाचावा). एकदा एका मुलीला ‘तू गोंडस दिसतेस’ असं सरळ तिच्या तोंडावर म्हणलं तर पुढचे पंधरा दिवस ती कॉलेजात दिसली नव्हती… त्यामुळे पर्याय खुला होऊन जो काय उजेड पडेल तो पडेल, पण पर्याय असणं महत्वाचं. यातूनच निर्णयस्वतंत्र्याचं चित्र उभारण्यास मदत होते.
या निर्णयानं काही जणांना आपले जिवलग शोधण्यास मदत होईल, मोठ्या निर्णयापूर्वी आपल्या जोडीदाराशी व्यवस्थित जुळवून घेण्यास त्यांना जास्त वेळ आणि जवळीक मिळेल. केवळ कायदा आला म्हणून आपला किंवा आपली पाल्य त्याचा वापर करेल असं तुम्हाला वाटत असेत तर परत एकदा वरचा कंस वाचा. आपण मराठी लोक ज्याला संस्कार म्हणतो ( सीरीयलमधले संस्कार वेगळे, आपले संस्कार वेगळे ) ते तकलादू नाहीत.
गे या शब्दाशी माझी जवळीक आहे ती गेमर या नात्यानं. मी गेमर आहे म्हणजे गे-मर अशा कोणत्यातरी समलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या संघटनेचा मेंबर आहे असं नाही. मी कॉम्प्यूटर गेम्स खेळतो म्हणून गेमर. मल्टिप्लेअर. कॅफेत मल्टिप्लेअर गेम्स खेळताना कमीत कमी वेळात एकमेकांना जास्तीत जास्त शिव्या देता येणं ही एक मोठी स्पृहणीय कला आहे. तिथे हा एकाक्षरी शब्द जादू करून जातो. खेळता खेळता खेळीमेळीत एकमेकांना उद्देशलेल्या या शब्दलीलांनी खेळाडूंमधली जवळीक वाढीस लागते (इथे कोणतेही चावट विचार नकोयत…) तसेच अधूनमधून घरच्यांची आठवण करून दिल्यानं खेळाडूंची कौटुंबिक ओढही वाढीस लागते.
आता गे कायदा म्हणाल तर त्याच्याशी मला खरंच काही देणंघेणं नाही. जोपर्यंत एखादा मुलगा ‘मला तुझी चड्डी आवडली’ असं माझ्या ब्लॉगवरच्या पोस्टला उद्देशून बोलतोय तोवर मला चिंतेचं कारण नाही. आणि कितीही झालं तरी तो वरचा कंस आहेच की, हिमेशवाला… या कायद्यानं अगदीच काही वाईट होईल असं नाही काही. विचार करा, एखाद्या नवसुगृहिणीला एका रम्य अनपेक्षित सायंकाळी आपला नवरा त्याच्या लंगोटी (आहा !!) मित्राबरोबर घोडा घोडा खेळताना दिसला तर बिचारीवर काय गुदरेल? त्यापेक्षा हा गुण्या आणि तो गोविंदा गुण्यागोविंदानं नांदले तर काय वाईट आहे?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. त्यातली एकच बाजू बघायची, दोन्ही बाजू व्यवस्थित बघायच्या का सरळ त्या नाण्याच्या दोन सिगारेटी घेऊन चिंता धुरात विलीन करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आता एवढं लिहून मी माझी ही पोस्ट संपवतो आणि मला बातमी न सांगणाऱ्या मित्रांचा फोनवरून समाचार घेतो,
नमस्कार,
आपला,
नॅकोबा
(मी सिगरेट पीत नाही)
नॅकोबा, लय बेश बगा. नाही ते कंसाची आठवण वारंवार करून दिल्याने कसं हायसं वाटतंय बगा
..
आणि हो ब्लॉगला नवीन मुक्कामी लावल्याबद्दल अभिनंदन !! असेच उधळत रहा…. मुक्ताफळं हो
कंसचं कंसचं
Prachanda talya, please let me know if the falatu lokanna maranyas kayadeshir parawanagi kayada comes up in the near future!
सगळ्या कंसासहित लई भारी पोस्ट….