डास, ढेकूण आणि राजकारणी

इस कहानी के सभी पात्र और घटनाऐं (और कीटक) काल्पनिक है.
अगर इस कहानी की किसी जिवित अथवा मृत व्यक्ती या घटना (या कीटक) से समानता होती है
तो इसे मात्र ऐक संयोग कहा जाएगा.

 

वगैरे.

 

एकदा एक आटपाट नगर असतं.

त्यात भरपूर डास आणि ढेकूण असतात.

गाढ झोपेत असलेल्यांचं शोषण करणं आणि पोट भरणं ह्यावरच त्यांची गुजराण चालू असते.

एक दिवस अचानक काहीतरी बिनसतं अन् डास आणि ढेकणांमध्ये सामाजिक वैमनस्य निर्माण होतं.

अफवा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. दोन्ही बाजू पेटून उठतात. असंतोष खदखदू लागतो.

मर्यादेचा पारा ओलांडून कालांतराने दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडतात.

ढेकणाचा चावा घेणाऱ्या डासाला भलताच ढेकूण चावतोय…

चार चार ढेकूण मिळून एक डास खाली धरून ठेवतायत…

दोन डास मिळून एका ढेकणाला उंचावर नेऊन खाली फेकतायत वगैरे प्रकार सुरू होतात.

हिंसक…. वाईट…. वाईट हिंसक.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

 

एरवी कीटकांकडे ढुंकूनही न बघणाऱ्या राजकारण्यांचं या दंगलीकडे लक्ष जातं.

काही राजकारणी डासांची बाजू घेतात, काही ढेकणांची.

दोन्ही बाजूंना राजकारणी भरपूर आश्वासनं देतात. एकमेकांविरुद्ध चिथावतात.

तुमचंच कसं बरोबर, दुसरे कसे चूक ते सांगतात.

मतदानाची वेळ येते. राजकारण्यांना गब्बर मते मिळतात.

बहुमत बनत नाही म्हणून राजकारणी युती करतात.

एकमेकांशी भांडताना झोपलेल्यांचं शोषण करायला विसरलेले डास आणि ढेकूण उपाशी मरतात.

झोपलेल्यांचं शोषण करणारे आपले प्रतिस्पर्धी आपसात लढूनच नष्ट झाले हे बघून राजकारणी वजयी मुद्रेने शपथविधी पार पाडतात.

 

यावरून काय शिकाल?

  1. तुम्हाला वाटेल ते.
  2. खोलीत डास किंवा ढेकूण आहेत म्हणून तक्रार करू नये, परिस्थिती याहीपेक्षा बिकट असू शकते पण ती तशी नाही यातच समाधान माना.
  3. झोपून रहा. उठलात तर गादीत डास, ढेकूण, किंवा ….   त्यापेक्षा नकोच!
  4. मतदान करा. नंतरच्या गदारोळाला आपण वैयक्तिकरित्या जबाबदार आहोत असे मानता येते. मग स्वतःलाच काहीतरी शिक्षा करावी. जबाबदार लोकांना शिक्षा झाल्याचे समाधान लाभते, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास बळावतो.

 

 

Gurren Lagannद

Leave a Reply