“हे बघून तू वेडा होणारेस!!!” सॅकमधून पाचपंचवीस सीड्यांचे दोन मनोरे बाहेर काढत स्वप्नील.
“भेंडी !!!! चिन्याचं कलेक्शन????? कडक !!!!!!” केतनचा गेम पॉझ.
“हाहा. काल काकूंनी यातून डीडीएलजे ऑलमोस्ट लावलाच होता. चिन्या पण हुशार! सीडी बाहेर ठेवली होती काढून!!!”
“हाहाहा, घोडा !”
“बेक्कार घोडा !!! फक्त पीसीवरच चालतो म्हणून कसंबसं कटवलं त्यानं. रिस्की आहे म्हणतो आता घरी ठेवणं. ”
“कूल” केतन परत खेळाकडे. “पाच मिनिटात उठवतो याला, शेवटचा राहिलाय, चिंधीगिरी करत लपून बसलाय कुठेतरी”
“ही पाहिल्येस का?” स्वप्नीलच्या हातात उभी चकती, चेहेऱ्यावरील भाव अवर्णनीय.
“अं?” गेमवरचं लक्ष साधारण अर्धा सेकंद विचलित. एक कटाक्ष. “हं” दुसरा कटाक्ष, यावेळी दीड सेकंद. “हो. अरेबिअन नाईट्स स्टार्ट !” पुन्हा गेमकडे.
“ही??”
“अं… हो” यावेळी आवलोकनासाठी दोन पू्र्ण सेकंद. किंचित वैताग “चिन्याचं ऑलमोस्ट सगळं कलेक्षन पाहिलंय, जुनं आहे.”
“आईला, लोण्याची सीडी ! हिचाच किस्सा झालेला नं?”
“हो, तुला माहीत नाही” उत्तराची वाट न बघता “हाहा, अल्टिमेट किस्सा. बघता बघता दिवे गेले. नंतर संध्याकाळी क्लासनंतर आम्ही त्याच्याघरी गेलो तर काका फुल मिशीतल्या मिशीत हसत होते. त्याला सुमडीत म्हणाले. आपल्याकडे एकच कॉम्प्युटर आहे, आणि आई ताईही तोच वापरतात, तर जरा जपून… कसं? ” केतन, गेमपासून एक लक्ष कणभरही विचलित होऊ न देता.
“मग??” हातातलं काम सध्या थांबलेलं.
“मग लोण्या फुल्ल कव्हर करायला लागला. काय म्हणताय बाबा, काही माहितीच नाही वगैरे. फुल पळापळ झालेली त्याची. तर त्याचे बाबा सुरूच झाले… ‘एकदा ना दोन उश्या असतात’ !!! आईश्शप्पथ अरे. त्याची सुरूवात आहे तशी. लोण्या गारच पडला ! मीपण नंतर बरेच दिवस च्यायला बघायचोच नाही काकांकडे. शेजारी उभा होतो अरे मी हा अख्खा डायलॉग झाला तेव्हा. बेक्कार ऑकवर्ड च्यायला!!”
थोडा वेळ शांतता, एकीकडे गेम चालू, दुसरीकडे सीड्या चाळणं सुरू. शाळकरी दप्तर घेऊन केतनचा धाकटा भाऊ आत. “आईssल्ला, नवीन गेम्स ???”
“नाही रे, कॉलेज प्रोजेक्टचं काम आहे.” केतन, लक्ष अविचलित
“प्रोजेक्ट” स्वप्निल… सीड्या पुन्हा मनोऱ्यांमधे डकवून सॅककडे रवाना.
—– इति. —-
नॅकोबा !