माणुसकी

शाळेत असताना मूल्यशिक्षण नावाचा एक विषय होता. ग्रेड वाला विषय, त्यामुळे महत्व जवळजवळ शून्यच. एक कोणतीतरी वही काहीतरी खरडून भरायची की किमान ‘बी’ नक्की. अक्षर बरं असेल तर ए वगैरे. अशा या विषयात माणुसकी वगैरे काहीतरी शिकल्याचं पुसट पुसट आठवतंय. भूतदया जरा जास्त लक्षात आहे. प्राणिमात्रांवर दया वगैरे. त्यात जे शिकलो ते असं काहीसं होतं:

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही.

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला म्हणून जगनने पप्पूला कुदलला.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही. जगनला माणुसकी नाही.

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला अन् जगनलाही बुकलून काढला.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही अन् माणुसकीही नाही.

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला. जगनने कुत्र्याला मलमपट्टी केली.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही. जगनला आहे.

पण पप्पूने मुळात कुत्र्याला दगड का मारला हा मुद्दा इथे गौण आहे. असायचाच. आपणही त्याला तसाच ठेवून पुढे जाऊ. कारण आपला मुद्दा आहे माणुसकी.

त्याचं झालं असं… की एका शनिवारी भल्या पहाटे साडेनऊ वाजता मातोश्रींचा फोन आला अन् काय घडतंय हे कळायच्या आतच पलिकडून ”इंटरनेट वर कुठे माणुसकी मिळेल का रे?” असा प्रश्न आला.शाळेच्या कोणत्याशा स्पर्धेत माणुसकी हा विषय होता अन् त्याकरता आई कोणालातरी मुद्दे सुचवणार होती. त्यात तिला माझी मदत अपेक्षित होती. ( अमेरिकेत आल्यानंतर निबंध या प्रकारापासून माझी सुटका होईल असं वाटलं होतं पण आई आणि आधुनिक तंत्रज्ञान यांनी एकत्रितपणे तो भ्रम दूर केला.) अचानक झालेल्या या घणाघाती हल्ल्यात उरल्यासुरल्या झोपेचा पार चुराडा झाला. गूगलवर माणुसकी कशी शोधावी हे फोनवरून सविस्तर सांगण्यात पंधरा-वीस मिनिटं वाफवल्यानंतर मला नाईलाजानंच लॅपटॉप उघडावा लागला. (ही पोष्ट सोडून या ब्लॉगवर कुठेही “लॅपटॉप” आणि “नाईलाज” हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात आढळल्यास तो एक दैवी चमत्कार मानावा.) मीही गूगलवर थोडं शोधून बघितलं. काही विशेष सापडलं नाही. आईला सांगितलं “गूगलवरही शोधून पाहिलं पण माणुसकी काही सापडली नाही.” अशी सुरुवात करायला सांग. पुढे आपला रेग्युलर माणुसकी निबंध वापरायचा थोडाफार फिरवून. एकीकडे दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे, दुसरीकडे बाबा आमटे. आईला पटलं. नंतर आईनं कोणा विद्यार्थिनीला बक्षीस मिळाल्याचं सांगितलं. बरं वाटलं.

माणुसकी बद्दल मला विचाराल तर जरा वैतागलेलंच उत्तर मिळेल. माणुसकी म्हणजे काय? ती असते का? कशी असते? कुठे असते? सध्या तिचं कसं चाललंय? असे प्रश्न विचारून उगाच वात आणु नका. जरा लक्ष दिलं आजूबाजूला की आपोआप दिसेल माणुसकी अन् कळेल जागच्याजागीच, माणुसकी म्हणजे नक्की काय असतं ते. अन् असं काही दिसलं आणि कळलं की त्यातच समाधान माना अन् चालू लागा. उगाच “काय ही थोर माणुसकी! हल्ली असं दिसणं दुर्मिळच!” वगैरे सेंटिमेंटल डायलॉग मला ऐकवू नका, कारण माणुसकी कशी कशी लोपत चालल्ये हे मी तिथल्यातिथे सोदाहारण स्पष्ट करेन अन् तुमच्या त्या अल्पकालीन उत्साहावर चांगलं सायीचं विरजण पाडीन. जसं टॉमॅटो लाल असल्याचं मला फारसं कौतुक नाही तसं माणसात माणुसकी दिसणं याचंही मला विशेष कौतुक नाही.

पण मांजर मऊ असतं याचं मला कैच्याकै प्रचंड कौतुक आहे. भूतदया असावी बहुतेक.

~नॅकोबा.

कप

काल माझा एक कप फुटला. खळ्ळ् असा. त्या आधी ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक असा एक पानचट आवाज झाला. कपात चहा होता. जर कोणी अज्ञात इसम माझ्यावर पाळत ठेवून माझ्या कारवायांकडे बारकाईनं लक्ष देत असता तर  ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आणि खळ्ळ यांच्या काहीसं मध्ये ऐ च्ची ** असंही काहीसं त्याला ऐकू आलं असतं. पण तसं कोणी पाळत ठेवून नव्हतं. किंवा असलंच तरी त्यानं मला सांगितलं नव्हतं.

असा मी रविवार सकाळचा रम्य प्रहर (मला दुपारसुद्धा रम्यच वाटते. संध्याकाळ ऑफिशिअली रम्य असते अन् रात्रीचं तर …. असो. ) पकडून निवांत चहा पीत बसलो होतो. समोर उघड्या लॅपटॅपवर माईनक्राफ्ट चालू होता. ( माईनक्राफ्ट. खेळाडूच्या कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव देणारा, स्वयंप्रेरित नवनिर्मितीला चालना जेणारा असा हा अनन्यसाधारण खेळ सूज्ञाने खेळू नये. हा खेळ वेळ खातो.) लॅपटॉप आणि माझ्या मधे आपला एक कान एकवटून उभा तो कप. चहानं ओतप्रोत भरला नव्हता कारण काही घोट चहा मी घशाखाली घातला होता. उजवीकडे कोण्या एका डब्याच्या झाकणात तीन चार अस्वलं छोट्या कचोऱ्या ठेवलेल्या. (अस्वलं कुठून आली मधे देव जाणे.) माझा उजवा हात माऊसवर. तो तिथून हलवायचा कंटाळा. म्हणून मी माझा डावा हात उचलला पण निम्मं लक्ष खेळात. (कचोरी खायचं कसं बरोबर आठवतं?)

ड्राय कचोरी.

मला काही कळायच्या आतच पुढचं थरारक नाट्य घडलं. ( थरारक नाट्य म्हणे) माझ्या डावीकडून माझ्या उजवीकडे जाणाऱ्या माझ्या डाव्या हाताच्या उजव्या बाजूचा माझ्या पुढ्यात असलेल्या कपाच्या डाव्या बाजूला धक्का लागला. हाताच्या वेगामुळे कप उजवीकडे कलंडला. खरंतर लॅपटॉपवरच कलंडायचा पण त्याचा कान टेबललाला टेकला अन् नकळत कपाच्या अधःपतनाची दिशा बदललली. साधारण चार-पाच मिनिटांपूर्वी मायक्रोवेवमधे अडीच मिनिटे तापवलेल्या चहासहित तो कप माझ्या मांडीकडे झेपावला. एव्हाना त्यातील पानचट (दूध संपलं होतं…) चहा हिंदकळून इतःस्ततः पसरू पाहत होता. वर नमूद केल्याप्रमाणे तो ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आवाज आला तो इथेच!.

दरम्यान, या अचानक उद्धवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानं मला आई आठवली. पण ते स्वगत पूर्ण होण्याच्या आधीच मांडीवर उष्णतेची जाणीव होऊ लागल्यानं मी जागीच उडालो. स्वाभाविकच, मांडीवर स्थिरावू बघणारा तो कप फरशीकडे झेपावला आणि खळ्ळ (खरं तर टण्ण आणि खळ्ळ) आवाज करून दुभंगला. दुभंगला म्हणजे एकदम प्रॉप्पर दुभंगला, मोजून दोन तुकडे.

जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. फुटलेला कप फरशीवर निपचित पडला होता पण त्याच्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता. फरशीवर पसरलेला चहा निस्तरायचा की मांडीपशी गरम ओलाव्याची ऑकवर्ड (ऑकवर्डला मराठी शब्द मला माहीत होता… आठवत नाहीये अत्ता… सिरिअसली!!) जाणीव करून देणारी विजार बदलायची असा गहन प्रश्न मला भेडसावू लागला होता.

अखेर, कमरेशी बांधलेल्या नाडीला स्मरून त्या विजारीला तिच्या कर्तव्यातून मुक्त करण्यासाठी मी चहाच्या पानचट थारोळ्यातून बाहेर पडलो. मात्र त्या कपाची आठवण झाल्याशिवाय एक दिवसही गेला नाहीये. (कालच फोडलाय!)

 

~नॅकोबा

इंद्रधनू

दूर नभाच्या त्या क्षितिजावर

इंद्रधनूचा अलगद वावर

 

ढगाळ वातावरण

ढगाळ संध्याकाळ

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

तेच इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

पुन्हा एकदा

 

संध्याकाळी घरी आलो, पाहतो तर काय?
समोरच्या इमारतीच्या छतामागून चक्क इंद्रधनुष्य डोकावत होतं.
हल्लीच्या धकाधकीच्या (?) जीवनात असा निर्मळ निसर्गाविष्कार दिसणं दुर्मिळच!
निसर्गदेवतेच्या अशा निखळ सौंदऱ्याकडे पाहिलं की मन कसं प्रफुल्लित होऊन जातं.

 

ढगांच्या धुरकस पडद्यातून या भूतलावर ओसंडू पाहणाऱ्या
या सप्तरंगी रेषमी लडीकडे बघून दिवसभराचा थकवा, शिणवटा
कुठच्याकुठे पळून गेला.

त्यामुळेच
फारसा विचार न करता तात्काळ कॅमेरा उचलला
अन् जमेल त्या क्षमतेत फोटो काढले अन् इकडे टाकले.

 

पाऊस, पावसाळा, निसर्गाचं निरागस गोजिरं रूप
आणि यावर कळस म्हणजे इंद्रधनुष्य
या धनुष्याच्या लडिवाळ बाणांनी घायाळ झालेल्या अगदी दगडालाही
स्फुरतील काव्यपंक्ती

 

 

 

दूर नभाच्या त्या क्षितिजावर
इंद्रधनूचा अलगद वावर

अडखळताना मजला सावर
चार पावलांवरती वावर

फडफडत्या जखमी पदरावर
थेंब थेंब आसूचे

 

चाsssर दिवस सासूचे (ए ए ए)
चाsssर दिवस सा सूचे !!!

:D :D :D :mrgreen: :twisted:
:shock: :cool: :smile: :grin:
:eek: :razz: :wink: :roll: :P :D

 

 

शिर्षकच एवढं मोठ्ठं द्यायचं की वाचूनच लोकांनी म्हणलं पाहिजे की अरे काय चाललंय काय ही काय पद्धत झाली पोष्टीचं शीर्षक द्यायची? उद्या अख्खा निबंध लिहून झाल्यावर म्हणाल की चला निबंधाचं नाव तरी ठरलं बुवा. आता निबंध लिहायला हरकत नाही.

हे म्हणजे असं झालं की पोटभर जेवायचं अन् म्हणायचं की आता मस्तपैकी लंचला जावं कुठेतरी. आता तुम्हाला वाटेल की हुश्श बुवा संपलं एकदाचं शीर्षक. आता पोष्ट. एकदा वाचून झाली की आपण सुटलो. वगैरे. पण तसं नसतं. ब्यादेचं नाव कळलं तरी ब्याद काही जात नाही. ब्याद ही ब्याद असते. अन् तिला यमक जुळवायचंच म्हणून ही ओळ बाद असते. आता बाद चा विषय निघालाच आहे म्हणून सांगावसं वाटतं की सद्यस्थितीत डोकं हा प्रकार सपशेल बाद असल्याकारणानं एका वैचारिक बादलीक एकापाठोपाठ एक शब्द सोडून ते ब्लॉगावर ओतायचा आटापिटा चालला आहे.

एक मांजर.

एक मांजर.

डोक्यातले विचार बाहेर पडायला लागले तर त्यातून एकतरी बोका नक्कीच उडी मारणार. कोणीतरी म्हणलेलंच आहे, माझिया मनी म्याव, त्यास मांजर ऐसे नाव.

आता एवढा गबदुल प्राणी डोक्यातून बाहेर पडल्यावर आत आपसूकच जागा होणार. त्यामुळे शाब्दिक ओताओती आता बंद.

 

इति.

~नॅकोबा.

अदृश्य

आज संध्याकाळी घरी आलो तोच अत्यंत दम्याभाग्या अवस्थेत. खरं तर मला दमल्याभागल्या म्हणायचं होतं. पण दमल्याभागल्या हा शब्द जरा मोठा वाटतो. श्रांतक्लांत हा जरा वेगळा शब्द पण मी यापूर्वी तो भलत्याभलत्या संदर्भांसहित वाचलाय त्यामुळे तो वापरताना जरा दडपणच येतं… तरी सांगायचा मुद्दा असा की गेले काही दिवस (आठवडे) कामाची बेक्कार शाळा चालू आहे. म्हणजे भरपूर काम आहे. खूप भरपूर. म्हणजे इतकं, की रात्रीचे दोन अडीच वाजले असताना आम्ही कलीग्ज (ट्रस्ट मी, कलीग इज ए मच, मच फ्रेंडलिअर वर्ड दॅन सहकर्मचारी. ) एकमेकांना “आता तरी झोप” असं सांगत असतो. आणि डेडलाईन नेहेमीप्रमाणेच डेडली…

आता तरी झोप म्हणल्यावर मग ऑनलाईन दिसून चालत नाही.  मग हातातलं काम संपवून झोपेपर्यंत आजून थोडा वेळ आळमटळम. पडल्या पडल्याच आयपॅडवर स्टारक्राफ्टचा एखादा यूट्यूब रीप्ले बघायला सुरुवात करायची. पाचएक मिनटात नकळत झोप लागती तर शेवट निसटतो.  सकाळी साडेसातला आईचा फोन. मी जागलो असं सांगता येत नाही. ती काळजी करते. मग उठायचं… झोप शाबूत असेल तर काल रात्रीचा उरलेला रीप्ले बघत ती झटकून टाकायची. मग आवराआवरी. तरी सध्या सकाळी सगळे लॅपटॉप बंद असतात… नाहीतर कोणीतरी पिंगा घालणार. भारतातले टीम मेंबर्स भेटले तर कामाचं कारीतरी निघणार.. मग बोलण्यात वेळ जाणार. चहा गार होणार….. नकोच.

मग सायकल काढायची (इथे येईपर्यंत मी आंघोळ केली आहे हे गृहीत आहे. उगाच चौकशा नकोत…) हवा पावसाळी. सर्द का काय म्हणतात तसली. मग कानात थंडी जाऊ नये म्हणून लावलेल्या हेडसेटमधे हळूच आवाज सोडायचा, आयफोनमधून. मग वळण, वळण, पादचारी मार्ग, वळण, सिग्नल, वळण, वळण करत ऑफिसला पोहोचायचं. तिथं काम. मीटिंग. दुपारचं जेवण, शक्यतो बाहेरच. परत काम, मीटिंग वगैरे. मग निघायचं. पुन्हा पावसाळी सर्द हवा, पुन्हा कानात सोडलेला आवाज. वळण, वळण, सिग्नल, वळण, पादचारी मार्ग, वळण, वळण. घरी यायचं. एव्हाना जिवाचं माकड झालेलं…

पुन्हा चहा. जमल्यास बिस्किटं, चॉकलेट वगैरे. बरेच दिवसात पट्टी सामोसे आणले नाहीत… बाकरवडी खाऊनही महिने झाले… आणलं पाहिजे काहीतरी. टाईमपास…. मग टीव्ही. मूड असेत तर थोडा वेळ काहीतरी खेळायचं. टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर. मग जेवण, शक्यतो बाहेरचंच काहीतरी घेऊन यायचं. किंवा सॅंडविच. सिनामन रेझिन व्हीट ब्रेड सही लागतो, मधाबरोबर….

जेवताना पुन्हा आईचा फोन. गुडमॉर्निंग वगैरे… पुढच्या आठवड्यात घरीच करीन जेवायला काहीतरी असं जेवताजेवताच तिला सांगायचं. टाटा, गुड्डे, बरंच काम आहे तरी लवकर झोपीन म्हणायचं… जेवण पूर्ण… पुन्हा काम. एव्हाना ऑफिसात भारत जागा झालेला. त्यांच्याशी चर्चा, शंकानिरसन वगैरे. एकीकडे टीव्ही चालूच.

मग बघता बघता अडीच. कलीग्ज ऑनलाईन. त्यांना झोपायला सांगायचं. स्वतः मात्र अदृश्य व्हायचं.

अदृश्य…

 

~नॅकोबा

डास, ढेकूण आणि राजकारणी

इस कहानी के सभी पात्र और घटनाऐं (और कीटक) काल्पनिक है.
अगर इस कहानी की किसी जिवित अथवा मृत व्यक्ती या घटना (या कीटक) से समानता होती है
तो इसे मात्र ऐक संयोग कहा जाएगा.

 

वगैरे.

 

एकदा एक आटपाट नगर असतं.

त्यात भरपूर डास आणि ढेकूण असतात.

गाढ झोपेत असलेल्यांचं शोषण करणं आणि पोट भरणं ह्यावरच त्यांची गुजराण चालू असते.

एक दिवस अचानक काहीतरी बिनसतं अन् डास आणि ढेकणांमध्ये सामाजिक वैमनस्य निर्माण होतं.

अफवा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. दोन्ही बाजू पेटून उठतात. असंतोष खदखदू लागतो.

मर्यादेचा पारा ओलांडून कालांतराने दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडतात.

ढेकणाचा चावा घेणाऱ्या डासाला भलताच ढेकूण चावतोय…

चार चार ढेकूण मिळून एक डास खाली धरून ठेवतायत…

दोन डास मिळून एका ढेकणाला उंचावर नेऊन खाली फेकतायत वगैरे प्रकार सुरू होतात.

हिंसक…. वाईट…. वाईट हिंसक.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

 

एरवी कीटकांकडे ढुंकूनही न बघणाऱ्या राजकारण्यांचं या दंगलीकडे लक्ष जातं.

काही राजकारणी डासांची बाजू घेतात, काही ढेकणांची.

दोन्ही बाजूंना राजकारणी भरपूर आश्वासनं देतात. एकमेकांविरुद्ध चिथावतात.

तुमचंच कसं बरोबर, दुसरे कसे चूक ते सांगतात.

मतदानाची वेळ येते. राजकारण्यांना गब्बर मते मिळतात.

बहुमत बनत नाही म्हणून राजकारणी युती करतात.

एकमेकांशी भांडताना झोपलेल्यांचं शोषण करायला विसरलेले डास आणि ढेकूण उपाशी मरतात.

झोपलेल्यांचं शोषण करणारे आपले प्रतिस्पर्धी आपसात लढूनच नष्ट झाले हे बघून राजकारणी वजयी मुद्रेने शपथविधी पार पाडतात.

 

यावरून काय शिकाल?

  1. तुम्हाला वाटेल ते.
  2. खोलीत डास किंवा ढेकूण आहेत म्हणून तक्रार करू नये, परिस्थिती याहीपेक्षा बिकट असू शकते पण ती तशी नाही यातच समाधान माना.
  3. झोपून रहा. उठलात तर गादीत डास, ढेकूण, किंवा ….   त्यापेक्षा नकोच!
  4. मतदान करा. नंतरच्या गदारोळाला आपण वैयक्तिकरित्या जबाबदार आहोत असे मानता येते. मग स्वतःलाच काहीतरी शिक्षा करावी. जबाबदार लोकांना शिक्षा झाल्याचे समाधान लाभते, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास बळावतो.

 

 

Gurren Lagannद

कैच्याकैच्याकैच्याकैकैकैकैकैकैकै(प्रतिध्वनी)कैकैकैकैकै

ससा गेला बोका आला
पेरूच्या बागेत अस्वल धीट
सोडावॉटर भरल्या गोणीत
बनपाव चारी मुंड्या चीत

स्पष्ट विहिरीला काचेचं दार
दाताखाली भरल्ये अवजड बाग
रहस्याच्या मताला उडवली दोरी
रबराच्या शेजारी खारूताई गोरी

चहाच्या सौंदर्यात फुकट पास
चोराच्या मनात पौष्टिक त्रास
दृष्टिकोन छप्पन कानात डास
लबाड भांडी मोठा घास

नऊ नऊ नऊ नऊ

नऊ नऊ नऊ नऊ

नऊ नऊ नऊ नऊ

का असतं *** इतकं मऊ???

खरंच…… अवघड आहे………

अवघड आहे………

~नॅकोबा