कोडचा किडा कडाडला कोड्यानं कोडर कडमडला

ऐश्यपत तुम्हाला सांगतो. (संपलं वाक्य… )

या पोष्टीत मी काहीबाही बरळणार आहे ( नेहेमीची सवय ) कदाचित वाचकांना (कंस१=( माझी पोष्ट वाचताना मी वाचक असतो त्यामुळे मी वगळून इतर . पण हे इथे लिहायची काहीच गरज नव्हती)) काहीच समजणार नाही ( मी (सुदैवानं. (आता सुदैव कोणाचं ते माहीत नाही) ) ब्लॉग हस्ताक्षरात (माझ्या, पेपर संपतानाच्या) लिहीत नसल्यानं वाचकांना (कंस १)  काहीबाही समजत असेल असा माझा अंदाज आहे. (केवळ मी पुण्याचा आहे यावरून या वाक्याचा विपरीत अर्थ काढू नये. नाहीतर म्हणाल की आम्ही एवढं आमचं डोकं (?) शिणवून ब्लॉग वाचतो. आणि हा बंड्या म्हणतो की आमची समज (?) बेताचीच आहे)

हां. तर विषयाकडे.

गेले जवळजवळ तीन चार महिने रात्रंदिवस (पहिले दोन महिने नऊ ते पाच, नंतर सात, आठ नऊ, साडेबारा.. इत्यादी) काम करून आमच्या टीमनं काम पूर्णत्वास आणलं होतं. आधी मार्चची तारीख, त्यात चार गोष्टी वाढवायच्या असं ठरल्यामुळं ती एप्रिल अखेरीस येऊन ठेपली. एक एक काम आटपत टीमनं सोमवारी ” रीलीज आटपला ” टेस्टिंग ओके आलं की काम फत्ते या स्थितीत गोष्टी आणून ठेवल्या. मंगवारी एक-दोन किरकोळ गोष्टी समोर आल्या, यायच्याच. अपेक्षित होतं. त्या हातावेगळ्या करत होतो. दरम्यान. आम्ही पूर्णत्वास आणलेल्या कामावर आधारित एक डेमो व्हिडिओ तयार करण्याचं काम दुसरीकडे सुरू होतं.  तिकडून बोलावणं आलं “क्लिक केलं, पेज आलं पण पेजवर काहीच दिसत नाहीये”. गेलो, शिफ्ट रिफ्रेश केलं, फायरफॉक्स चा कॅशे मोकळा केला. पेज नीट चालणं सुरू… कधीकधी नेटवर्कचा प्रॉब्लेम, ब्राऊजर कॅशे वगैरे मुळे पेज लोड न होण्याचा प्रकार होऊ शकतो. नॉर्मल आहे म्हणून सोडून दिलं…

थोड्या वेळानं परत तेच !  गेलो, रिकामं पान. फायरफॉक्सला म्हणलो बाबारे, पानाचा मूळ स्रोत दाखव. बघतो तर काय, स्रोत व्यवस्थित, सगळं जिथल्यातिथे ! किस्सा…. शंकेची पाल चुकचुकली… जाग्यावर परत आलो आणि माझ्या खोक्यावर तोच प्रश्न उद्भवतोय का ते बघायला लागलो (दवे बाई या कृतीला बग रीप्रॉडक्षन म्हणतात).  माझ्या खोक्यावर येईना… म्हणून जिथे टेश्टिंग होतं त्या खोक्यावरच्या टेस्ट साईटला हिट करून पाहिलं. चार पाच प्रयत्नातच पान रिकामं… आजून एक दोनदा प्रयत्न… मधेच कधीतरी व्यवस्थित पान, मधेच कधीतरी रिकामं… ढिश्क्यांव.

ब्राऊझर इश्शू… इंटरनेट एक्सप्लोररला आम्ही नेहेमीच शिव्या घालतो हो. कोणतंही वर्जन असो, सहा, सात, नऊ, पंच्याण्णव… इंटरनेट एक्सप्लोअररचं काहीतरी वेगळंच असणार पण या वेळी मात्र  गंडणारा ब्राऊझर फायरफॉक्स…..   फारयफॉक्सनं काशी केली…   सचिन डकवर गेला की कसं वाटतं???   डोक्याला शॉट. शोधमोहीम सुरू…

कोणकोणत्या पेजेसवर येतोय? निम्म्याहून जास्त वेळा पेज लोड होतंय नीट, म्हणजे जावास्क्रिप्ट, सीएसएस व्यवस्थित दिसतंय… रिक्वेस्टनंतर कोणती स्क्रिप्ट कधी लोड होत्ये… इकडे अॅलर्ट टाक… लॉग फाईल्सची शेपूट पकड… अॅप्लिकेशन सेटिंग्ज बदल, ब्राऊजर सेटिंग्ज बदल, कॅशिंग होत नाईये नीट, सर्वर कॅशे बंद करून बघ. डिस्क नको, मेमरीत कॅशे चालू असूदे… आता मेमरी नको डिस्क ठेव… गेल्यासारखा वाटतोय का??? हा बघ झाला रीप्रोड्यूस… कॅशे बंद करून बघ बरं… केले… आता स्क्रिप्ट एरर… परत रिकामं पान….

नेटवर बघा काय म्हणतायत… काही जण व्हिस्की इश्शू आहे असं म्हणतायत…. काही जण फायरफॉक्स इश्शू आहे म्हणतायत. चायला ब्राऊझर स्पेसिफिक इश्शू… आली का पंचाईत… एकट्यासाठी हॅक वापरावा लागणार आता…

विंडोज एफ एफ की उबुंटू? दोन्हीकडे येतोय? आईचं काय म्हणणं आहे… तिकडे नुसतीच जेएस एरर, ती पण गेली लेटेस्ट चेंजेसमुळे आई ओके आहे… सफारी पण मस्त चाललाय. क्रोमला  अॅक्टिव सपोर्ट नाही पण तोही नीट आहे… फायरफॉक्स ब्लॅंक पेज… सर्च मारा…. फायरफॉक्स इश्शू आहे हा… थ्री पॉइंट सिक्स पॉइंट थ्री… बरेच जण म्हणतायत नेटवर. इश्शू आहे. फायरफॉक्स बग आहे हा… पण फायरफॉक्स अनसपोर्ट करून चालणार नाही… (एक वेळ पाण्याला नाही म्हणतील… फायरफॉक्स किंवा आईला शक्यच नाही…)

कशामुळे होत असेल?

ब्राऊजर सेंसेटिव आहे.
एक्सएचटीएमएल चेक करा.
नीट आहे.
सीएसएस वॅलिडेटेड आहे का?
हो

तो टायनी एम सी ई… विझीविग एडिटर… कम्प्रेसर वापरतोय, प्लगिन्स लोड करायला… फक्त टायनीवाल्याच पेजेसवर इश्शू आहे…
तो इनवॅलिड रेफरन्सनंतर बॉडी हायजॅक तर करत नसेल?
डिसेबल करून बघ,
आयला, एरर
स्टेप बाय स्टेप करून बघ लोड.
होतय, मेनूला एरर आहे.
टायनीएमसीई ब्लॅंक पेज सर्च मार…
ह्ये बग… सेम केस राव. आधी सापडायला हवी होती. दोन दिवस फुक्कट गेले.
जे एस पानाच्या शेवटी टाका म्हणतायत.
टाकल्या
चालतंय रे
टेस्ट सर्वर अपडेट करतोय, ते झालं की रीप्रोडक्शन करून बघा.
नाही होते.
नक्की
हो
चला, टेस्टिंगवाल्यांच्या हातात देऊया आता. उद्या कळेलच परिस्थिती.

तर,

सांगायचा मुद्दा असा. की गेल्या तीन महिन्यात जेवढा झाला नसेल तेवढा डोक्याचा भुगा गेल्या दोन दिवसात झालाय. म्हणलं थोडा वाटावा ब्लॉगवर. तेवढंच उगाच काहीतरी (म्हणजे नेहेमीसारखं) लिहिल्यासारखं वाटेल.

आणि सांगायचा दुसरा मुद्दा असा की जर टायनी एमसीई वापरत असाल आणि रिकामं पान येत असेल तर इनिशिअलायझेशन स्क्रिप्ट्स पानाच्या तळाशी टाकाव्यात (खरं तर पानात काहीच टाकू नये म्हणतात… पण असो…)

आता मी माझ्या वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टकडे वळतो. शुभरात्री, शब्बा खेर वगैरे
(शब्बा खेर ही अनुपम खेरची कोण?)

(कोणी का असेना, मी मात्र)
आपला,

~नॅकोबा

फेसबुक, फार्मविल आणि

भर दुपारी मस्त फेसबुकावर माफियांच्या विश्वात खळबख माजवत होतो. जरा वेळाने उर्जा संपल्यावर म्हणलं आता जरा शेतीकडे वळावं, शेवटी काही झालं तरी आपण शेतीप्रधान देशाचे नागरिक ! शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय कोण म्हणतं.. इकडे मीतर रोज माझ्या मित्रांच्या शेतावर खतपाणी करतोय!! सध्या इस्टर म्हणून सवंगड्यांना फुकटची खोटी रंगीत अंडी पाठवतोय आणि माझे मित्रही हिरीरीने या शेतीप्रकल्पात सहभागी होत आहेत. आहे की नाई मज्जा. जोश्याच्या शेतावरच्या कोंबड्या भुकेल्या आहेत पाहून नेने त्यांना पौष्टिक धान्य खाऊ घालताहेत. वाळून गेलेलं धान्य परत उगवता येतंय . सारं काही आलबेल आहे.
फार्मविलची सध्या बेक्कार हवा आहे. फेसबुकावरचा जो दिसतोय तो शेतावर काय घडलंय सांगतोय. दिवसातला थोडा वेळ काढून या खोट्याखोट्या शेतावर लक्ष देतोय, कापणी करतोय, प्राणी पाळतोय वगैरे वगैरे. माझ्य़ासारखे काही गेमाड लोक तर व्यसन लागल्यासारखे खेळतायत. काही जण तर दमड्या मोजून फार्म कॅशही घेत असतील. आणि फार्मविलचे निर्माते झिंगा गेम्स तर अशा खेळांवर खोऱ्यानं पैसा ओढतायत.

खरंतर ही पोस्ट दुसरंच काहीतरी लिहायला घेतली होती पण काहीतरी वेगळंच घडलं. वरचं ते शेतीप्रधान देशाचं वाक्य लिहिलं आणि पेपरात वाचलेल्या बातम्या आठवल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आणि कर्जमाफीसाठी नेत्यांनी चालवलेल्या खेळांच्या. आणि आपण खेळातल्या एका खोट्या जगात सर्वकाही आलबेल असल्यासारखं वागतोय या भावनेने क्षणभर मनाला चटका बसला. आणि डोक्यात उगाचच एक विचार आला, की समजा उद्या एखाद्या ना-नफा-ना-तोटा संस्थेनं असले व्यसनमयी गेम काढले आणि त्यातून मिळाणारे थेट किंवा जाहिरातीचे उत्पन्न सत्कार्यासाठी वापरलं तर काय होईल? शिवाय चार सहा डिझायनर्स डेवलपर्सना नोकरी मिळेल ती वेगळीच.

गेली दहा वर्षं वेगवेगळे गेम खेळतोय, निर्लज्जपणे, पुढेही खेळीन, त्याच निर्लज्जपणानं… पण आज पहिल्यांदाच मी कन्फ्यूज झालोय. आणि गेम्स वाईट कसे नाहीत, उलट त्यांचा फायदेशीर वापर कसा करता येईल हे स्वतःला पटवू पाहतोय. मी गुत्त्याच्या मालकाकडून जनकल्याणाची अपेक्षा करतोय का? का गेम्स खरंच वाईट असतात… माझ्या गेमर सांप्रदायिकतेवर घाला घालण्याचं काम इतके दिवस आई करायची, आज मी नकळत तेच करतोय… का ते माहीत नाही, म्हणूनतर इतका गोंधळलोय… ही पोस्ट मला अजून एकही तास ड्राफ्टमधे ठेवायची नाहीये म्हणून तुटकच संपवून मोकळा होतोय.

इतकंच !

आयपॅड

काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :

वाईट :

  1. मल्टिटास्किंगचा अभाव : यावर एका वेळी एकच अॅप्लिकेशन चालतं. आयपॅड हा फक्त एक मोठ्ठा आयपॅड आहे असं वाटण्याचं हे महत्वाचं कारण.
  2. फ्लॅश चालत नाही : HTML5 उंबरठ्यावर उभं असताना खरंचर याची चिंता करायची गरज नाही पण यावर फ्लॅश मधले गेम्स खेळता येणार नाहीत हे ऐकून बघून वाईट वाटतंच.
  3. सुळसुळीत कीबोर्ड : काचेवर टंकायची सवय होईपर्यंत याचा कीबोर्ड तसा वापरायला झुळझुळीत आहे.
  4. देवनागरी कीबोर्ड उपलब्ध नाही  : यावर देवनागरी नीट चालत नाही, दिसतही नाही, वेलांटीचा आणि जोडाक्षरांचा जरा प्रॉब्लेम आहे. टंकलेखनासाठी थेट कीबोर्डही उपलब्ध नाही. ती सोय मिळवण्यासाठी काही जुगाड करावे लागण्याची  शक्यता आहे.

बऱ्या :

  1. सुटसुटीत : याचं वजन एखाद्या मध्यम आकाराच्या पुस्तकाएवढं आहे. एकूण आकारही असा आहे की फार वेळ हातात धरलं तरी त्रास होणार नाही.
  2. मोठा पडदा : आयपॅडचा पडदा (स्क्रीन) हा  आयपॉडपेक्षा जवळजवळ चौपट मोठा आहे. अॅपलची अॅप्लिकेशन्स या उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करतात. गेम्स खेळायला हा आकार उत्तम आहे तसंच एखादं पुस्तक वाचायलाही सोयिस्कर आहे. मी आयपॉडवर पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता पण तो आकार फारच छोटा पडतो. आयपॅड उभं धरलं की एका साधारण पुस्तकाच्या पानाइतका मजकूर पडद्यावर असतो. पुस्तक वाचायचा अनुभव टिकून राहतो.
  3. सिनेमे बघण्यास उत्तम : गादीवर पडून चित्रपट बघण्यासाठी हा सर्वोत्तम प्रकार आहे. यावर यूट्यूब बघता येतं, आय-ट्यून्स मधून ओतलेले सिनेमे बघता येतात तसंच नेटफ्लिक्स ऑनलाईन बघण्यासाठीही एक मोफत अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे.

माझा निष्कर्ष :

सध्या थोडं थांबायला हरकत नाही. पुढच्या पिढीतील (नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट वर्जन) आयपॅड्समधे काही वाढीन सोयी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आयपॉड किंवा आयफोनवर सहज भागेल. (शिवाय आयफोन गेल्याच महिन्यात घेतलाय..)

आपला,

~नॅकोबा

(एक सरळ अर्थाची, एक विषय धरून आणि अव्रात्य पोस्ट… काही खरं नाही… निमूटपणे झोपलेलं बरं.)

ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे. मराठील्बॉग्ज डॉट नेट वरही ही नवीन जागा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे असं का केलं ? माझ्याकडे उत्तर नाही. हे असले उपद्व्याप करण्यातच आनंद असतो, नकळत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मनातला बोका आनंदित होतो ! बरं वाटतं.  मुक्ताफळे डॉट कॉमची नोंदणी करून पण बरेच दिवस झाले होते. पंधरा वीस दिवसांपूर्वी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या जुन्या सर्विस प्रोव्हायडरकडून नवीन प्रोव्हायडरकडे फिरवून घेतलं. आता कसं, नाव लक्षात ठेवायलाही सोप्पं झालंय अगदी. :) या सर्व बदलाची एकमेव पडती बाजू हीच की जुन्या जागेवर साईट जॉईन केलेल्यांना नवीन साईटवर नव्यानं जॉईन व्हावं लागेल ( अर्थात, त्यांची इच्छा असल्यास ). जुन्या जागेवर काही गंबतजंबत प्रकार करायची इच्छा आहे. बघू कसंकाय जमतंय ते !!

सध्या तरी मुक्ताफळं दोन्हीकडून उधळत असतील. काही बदलही दिसतील. पोस्टगणिक दिसणारं रेटिंग आणि लाईक डिसलाईक विजेट. गूगल बझ सोबत स्थापन केलेलं संगनमत (नको, बरा शब्द सापडेपर्यंत इंटिग्रेशन ठीक आहे ), इत्यादी इत्यादी आणि बरंच काही. हे गूगल बझ आणि ब्लॉगचं इंटिग्रेशन हा फार छान प्रकार आहे. तुमची पोस्ट गूगल बझवर जाऊन पडते आणि तिथे तुमच्या मित्रमंडळींनी केलेल्या कॉमेंट्स येऊन पडतात तुमच्या ब्लॉगवर. (आहे किनाई जंबत !! :D ) वर्डप्रेस वापरणार्यांसाठी मी लवकरच याबद्दलची पोस्ट टाकायचा प्रयत्न करेन.

तोपर्यंत,

आपला, (संगणककिडा)

नॅकोबा

चकोट

इतर पोस्ट्सपेक्षा जरा वेगळा, हा जरा तांत्रिक पोस्ट आहे. च ची भाषा माहीत नसेल असा मराठी माणूस विरळाच. लहानपणी सगळ्यांनीच कधी ना कधीतरी ही भाषा वापरली असेलच. संदीप खरेचं एक गाणंही आहे “चम्हालातु चंगतोसा चमी चकए चष्टगो” म्हणून. मी प्रोग्रॅमर, सतत काही ना काही उपद्व्याप करून बरंच काही शिकलो. सध्या जरा थंड असले तरी मधूनअधून उपद्व्याप चालूच असतात. तसंच आज सहज म्हणून म्हणलं, एक असा प्रोग्रॅम करावा जो टाईप केलेलं च च्या भाषेत रूपांतरित करून देईल. तुमच्या “क्वोट्स” ना च लावणारा असा हा प्रोग्रॅम “चकोट” …

जेव्हा प्रोग्रॅमिंग शिकवतात तेव्हा बरेच सराव अक्षरांच्या धाग्यांशी निगडित असतात. स्ट्रिंग्ज, स्ट्रिंग प्रोसेसिंग आणि प्रोग्रॅमिंगच्या भाषेतील मूळ पद्धती स्वतःहून, शून्यातून प्रोग्रॅम करून अवलंबणे याने बेसिक्स पक्की होण्यास मदत होते. व्हेरिएबल्स, डेटा टाईप्स, पॉइंटर्स, ऑप्टिमायझेशन वगैरे हरंच काही हे सराव प्रोग्रॅम्स शिकवतात.

तर असा हा प्रोग्रॅम. जावास्क्रिप्ट मधे आहे. मराठी ‘अक्षर’ आणि संगणकाच्या दृष्टीने असलेलं एक कॅरॅक्टर यात थोडा फरक आहे. उदा. ब्लॉग, किंवा सर्वांच्या सोयीसाठी ओळखीचा शब्द ‘प्रेम’

प्रेम हा जरी दोन (किंवा अडीच) अक्षरांचा शब्द असला तरी संगणकासाठी तो  [ प ् र े म ] असा पाच अक्षरांचा बनला आहे. जोडाक्षर , क्ष सारखी काही विशिष्ट अक्षरे हाताळायला चार वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सध्या तरी हा प्रोग्रॅम प्रचंड अपूर्ण स्वरूपात आहे. जाणकारांना सुधारणा लगेचच लक्षात येतील.

http://projects.jaguarnac.com/mr/chaquote/chaquote.html या दुव्यावर तुम्हाला हे पान सापडेल. यातून पुढे मला देवनागरी स्क्रिप्ट स्पेसिफिक एखादी जावास्र्किप्ट लायब्ररी तयार करायला आवडेल. कोड अतिशय बेसिक आहे. व्ह्यू सोर्स करून वाचता येईल.  MIT  लायसन्स आहे, मुक्तपणे वापरा, बदल सुचवा, खेळून बघा. बोलावंसं वाटलं, प्रतिक्रिया नोंदवा. तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल, यासारखी आणखी काही स्क्रिप्ट्स् , प्रोग्रॅम्स माहीत असतील तर अवश्य सांगा. तुम्ही वाचलंत आणि असा प्रकार आवडू शकेल असे कोणी तुम्हाला माहीत असतील तर त्यांनाही सांगून पहा.

च ची भाषा, र-फ ची भाषा, शुद्घलेखन चाचणी, टॅग/कीवर्ड/फीड हार्वेस्टिंगसाठी असे काही स्पष्ट आणि अस्पष्ट उपयोग मनात आहेत. यावर पुढे मी खेळत राहीनच…

आपला

~नॅकोबा.