कायदा, गे आणि लिव इन रिलेशन

अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही.  ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. एरवी असल्या (कोणत्याही सामाजिक, राजकीय इ.) विषयावर मी फारसं बोलत नाही. करायचीच असली तर आधी आचरट आणि नंतर गंभीर मतं व्यक्त करून मोकळा होतो. बाकी तसा माझा राजकारण किंवा समाजकारण या गोष्टींशी संबंध नाही आणि अभ्यास तर मुळीच नाही. (खरं तर मी पुण्याचा आहे एवढंच कारण पुरेसं आहे, पण…)

आज मी एवढं पेटायचं कारण म्हणजे च्यायला एवढी इंट्रेश्टिंग बातमी आणि एकाही मित्रानं साधी ऑनलाईन हिंट पण दिली नाही… अरे… काय चाललंय काय ! कित्येक दिवस मी या बातमीची, निर्णयाची वाट पाहात होतो… (तशी मी ‘फालतू लोकांना मारण्यास कायदेशीर परवानगी’ या बातमीचीही वाट बघतोय, आणि ती आली तरी मी काय लगेच उठून एकता कपूर किंवा हिमेश रेशमिया मागे लागेन असं नाही. हे म्हणजे आत्महत्येस परवानगी मिळाल्यास पंख्यांच्या व्यवसायास बरकत येईल किंवा टेरेस गार्डन्स मधे गर्दी वाढेल म्हणण्यासारखं आहे. ) जुन्या ऑफिसातील माझ्या एका कलीगने मला सल्ला दिला होता ‘तू लिव इन रिलेशनमधेच रहा अरे, तुला परफेक्ट आहे’. तेव्हापासून या ऑप्शनसाठी माझ्या जिवाचा चातक झाला होता. (वरचा कंस पुन्हा वाचावा). एकदा एका मुलीला ‘तू गोंडस दिसतेस’ असं सरळ तिच्या तोंडावर म्हणलं तर पुढचे पंधरा दिवस ती कॉलेजात दिसली नव्हती… त्यामुळे पर्याय खुला होऊन जो काय उजेड पडेल तो पडेल, पण पर्याय असणं महत्वाचं. यातूनच निर्णयस्वतंत्र्याचं चित्र उभारण्यास मदत होते.

या निर्णयानं काही जणांना आपले जिवलग शोधण्यास मदत होईल, मोठ्या निर्णयापूर्वी आपल्या जोडीदाराशी व्यवस्थित जुळवून घेण्यास त्यांना जास्त वेळ आणि जवळीक मिळेल. केवळ कायदा आला म्हणून आपला किंवा आपली पाल्य त्याचा वापर करेल असं तुम्हाला वाटत असेत तर परत एकदा वरचा कंस वाचा. आपण मराठी लोक ज्याला संस्कार म्हणतो ( सीरीयलमधले संस्कार वेगळे, आपले संस्कार वेगळे ) ते तकलादू नाहीत.

गे या शब्दाशी माझी जवळीक आहे ती गेमर या नात्यानं. मी गेमर आहे म्हणजे गे-मर अशा कोणत्यातरी समलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या संघटनेचा मेंबर आहे असं नाही. मी कॉम्प्यूटर गेम्स खेळतो म्हणून गेमर. मल्टिप्लेअर. कॅफेत मल्टिप्लेअर गेम्स खेळताना कमीत कमी वेळात एकमेकांना जास्तीत जास्त शिव्या देता येणं ही एक मोठी स्पृहणीय कला आहे. तिथे हा एकाक्षरी शब्द जादू करून जातो. खेळता खेळता खेळीमेळीत एकमेकांना उद्देशलेल्या या शब्दलीलांनी खेळाडूंमधली जवळीक वाढीस लागते (इथे कोणतेही चावट विचार नकोयत…) तसेच अधूनमधून घरच्यांची आठवण करून दिल्यानं खेळाडूंची कौटुंबिक ओढही वाढीस लागते.

आता गे कायदा म्हणाल तर त्याच्याशी मला खरंच काही देणंघेणं नाही. जोपर्यंत एखादा मुलगा ‘मला तुझी चड्डी आवडली’ असं माझ्या ब्लॉगवरच्या पोस्टला उद्देशून बोलतोय तोवर मला चिंतेचं कारण नाही. आणि कितीही झालं तरी तो वरचा कंस आहेच की, हिमेशवाला… या कायद्यानं अगदीच काही वाईट होईल असं नाही काही. विचार करा, एखाद्या नवसुगृहिणीला एका रम्य अनपेक्षित सायंकाळी आपला नवरा त्याच्या लंगोटी (आहा !!) मित्राबरोबर घोडा घोडा खेळताना दिसला तर बिचारीवर काय गुदरेल? त्यापेक्षा हा गुण्या आणि तो गोविंदा गुण्यागोविंदानं नांदले तर काय वाईट आहे?

प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. त्यातली एकच बाजू बघायची, दोन्ही बाजू व्यवस्थित बघायच्या का सरळ त्या नाण्याच्या दोन सिगारेटी घेऊन चिंता धुरात विलीन करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आता एवढं लिहून मी माझी ही पोस्ट संपवतो आणि मला बातमी न सांगणाऱ्या मित्रांचा फोनवरून समाचार घेतो,

नमस्कार,

आपला,

नॅकोबा

(मी सिगरेट पीत नाही)

ब्लॉगचा पत्ता बदलतोय, मुक्ताफळे डॉट कॉम !

नमस्कार मंडळी, गेले काही दिवस तुम्ही हा ब्लॉग वाचत आला आहात, प्रसंगी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आला आहात. गेल्या साधारण महिन्यापासून चालवलेल्या या प्रयोगाला मिळत असलेला एकूण प्रतिसाद बघून मी हा ब्लॉग त्याच्या स्वतःच्या अशा, वेगळ्या, हक्काच्या संकेतस्थळावर हालविण्याचं ठरवलं आहे. आत्तापर्यंत http://mr.jaguarnac.com वर असलेला हा ब्लॉग http://www.muktafale.com या संकेतस्थळावर हालविण्यास सुरुवात झाली आहे. गूगल फ्रेंड कनेक्टचं विजेट नवीन घरात त्याच्या जागी जाऊन बसलंच आहे. मराठील्बॉग्ज डॉट नेट वरही ही नवीन जागा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे असं का केलं ? माझ्याकडे उत्तर नाही. हे असले उपद्व्याप करण्यातच आनंद असतो, नकळत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मनातला बोका आनंदित होतो ! बरं वाटतं.  मुक्ताफळे डॉट कॉमची नोंदणी करून पण बरेच दिवस झाले होते. पंधरा वीस दिवसांपूर्वी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या जुन्या सर्विस प्रोव्हायडरकडून नवीन प्रोव्हायडरकडे फिरवून घेतलं. आता कसं, नाव लक्षात ठेवायलाही सोप्पं झालंय अगदी. :) या सर्व बदलाची एकमेव पडती बाजू हीच की जुन्या जागेवर साईट जॉईन केलेल्यांना नवीन साईटवर नव्यानं जॉईन व्हावं लागेल ( अर्थात, त्यांची इच्छा असल्यास ). जुन्या जागेवर काही गंबतजंबत प्रकार करायची इच्छा आहे. बघू कसंकाय जमतंय ते !!

सध्या तरी मुक्ताफळं दोन्हीकडून उधळत असतील. काही बदलही दिसतील. पोस्टगणिक दिसणारं रेटिंग आणि लाईक डिसलाईक विजेट. गूगल बझ सोबत स्थापन केलेलं संगनमत (नको, बरा शब्द सापडेपर्यंत इंटिग्रेशन ठीक आहे ), इत्यादी इत्यादी आणि बरंच काही. हे गूगल बझ आणि ब्लॉगचं इंटिग्रेशन हा फार छान प्रकार आहे. तुमची पोस्ट गूगल बझवर जाऊन पडते आणि तिथे तुमच्या मित्रमंडळींनी केलेल्या कॉमेंट्स येऊन पडतात तुमच्या ब्लॉगवर. (आहे किनाई जंबत !! :D ) वर्डप्रेस वापरणार्यांसाठी मी लवकरच याबद्दलची पोस्ट टाकायचा प्रयत्न करेन.

तोपर्यंत,

आपला, (संगणककिडा)

नॅकोबा

मटका

मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.

असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात. एखादी गोष्ट करताना “काय मेली कटकट” किंवा “करून मोकळं व्हावं” या भावनेने काहीतरी करायला जातो आणि नेमकी तीच गोष्ट वाहवा मिळवून जाते. आणि मग आपण “अत्ता नक्की काय घडलं” या गहन प्रश्नात बुडून जातो. आज असंच काहीतरी घडलं.

आम्ही आठवड्याच्या आठवड्याला काय काम केलं याचा वीकली स्टेटस रिपोर्ट पाठवतो. प्रत्येक चेकइन, प्रत्येक बग फिक्स आणि मीटिंग्जमधे तेच तेच डिस्कस केल्यानं शुक्रवारी किंवा वीकेंडदरम्यान पुन्हा त्या सर्व गोष्टींची यादी करून पाठवणं नको होतं आणि केवळ नियम म्हणून पाळलं जातं. आज रविवार संपत आला बघून मी नेहेमीच्या सवयीने माझ्या चेक इन्स चे मेल्स काढले आणि त्यातल्या कॉमेंट्स कॉपी पेस्ट करून यादी केली, सध्या करत असलेल्या टास्कचा क्रमांक आणि शीर्षक कॉपी करून ते काम यादीत टाकलं, बग डेटाबेस मधून चार-पाच कामं कॉपी करून पुढच्या आठवड्यातल्या कामांची यादी टाकली आणि गूगल कॅलेंडरवरून मागच्या आठवड्यातल्या सगळ्या मीटिंग्जची यादी पेस्ट केली. दर आठवड्याला मी हेच करत आलोय, आज जरा एक-एक ओळ जास्त लिहिली इतकंच. त्या ओळीनं काय जादू  केली देव जाणे पण रिपोर्टच्या तासाभरातच डेव्ह लीड चा सर्वांना उद्देशून रिप्लाय आला की स्टेटस रिपोर्ट्स मधून आम्हाला नेमकं हेच अपेक्षित असतं. या असल्या प्रकारालाच गेमर टर्मिनॉलॉजीत मटका म्हणतात. रिप्लाय वाचून छान वाटलं. आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक रिपोर्टमधे हा एका ओळीचा वाढीव तपशील लिहिणार. नाईलाज आहे, कन्सिस्टन्सी टिकवली पाहिजे.

अशीच गंमत एकदा माझ्या एका सहकाऱ्याच्या बाबतीत घडली होती. आमच्या दोन टीम्स ना एक दिवस अचानक “एच आर्” टास्क म्हणून गेल्या आठ महिन्यांमधल्या कामांचा एक रिपोर्ट करायला सांगितला. तेव्हा मी आणि माझ्याबरोबरचे जवळजवळ सर्व सहकारी नवीन होतो आणि तेव्हा स्टेटस रिपोर्ट लिहिणे हा प्रकारही नव्हता. रोजच्यारोज स्काईप क़ॉल्सवरून प्रगतीचा आढावा घेतला जायचा त्यामुळे कोणालाच त्या प्रोसेसची गरज भासली नाही. कामं वेगानं आणि चोख पुढे सरकत होती त्यामुळे सर्व काही अलबेल होतं. आता अचानक आठ महिन्यांचं काम आणि त्यात वेळही कमी. आम्ही काहीबाही लिहून दिलं. लवकरच कळलं की दुसऱ्या टीममधल्या एकाचा रिपोर्ट आदर्श झालाय. मी कुतूहलानं त्याला विचारायला गेलो तर खांदे उडवून तो म्हणाला “मलाही नक्की माहित नाही मी काय केलं, पाठवलं एवढं नक्की पण त्यातलं नक्की काय आवडलं हे मलाही रहस्यच आहे.”

आपला,

नॅकोबा !

पोस्ट : अशी का तशी?

कधीकधी अचानक जोरात पोस्ट लागलीय असं वाटू लागतं पण तेव्हा नेमकं ऑफिसमधे किंवा बसमधे असल्याने बसता येत नाही. घरी येऊन निवांत बसावं म्हणलं तर तोवर पोस्ट सोयिस्करपणे जिरलेली असते… कधी बसल्यानंतर कळतं की फॉल्स आलार्म होता… थोडंसं लिहून तो ड्राफ्ट सेव होतो आणि कधीतरी आपण पूर्ण होऊ ही आशा धरून तशीच बसून राहते. अशा बऱ्याच जिरलेल्या किंवा विझलेल्या पोस्ट्सनंतर जेव्हा एखादी पोस्ट ब्लॉगचं मुखपृष्ठ पाहते तेव्हा बरं वाटतं. अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं… मन…

पोस्टसाठी एवढा विचार का करतो मी देव जाणे. विचार करून टाकण्यासाठी हे काय ऑफिसचं फॉर्मल मेल नाही… पण जेव्हा लिहीत असतो तेव्हा मनात असं काहीतरी होत असतं :

_____________________________________________________________________

आधी एक तर हौस (खाज) म्हणून ऊभारलेलं संकेतस्थळ (वेबसाईट म्हण ना… कशाला उगाच जड जड काहीतरी). शिकण्याच्या (किडे करण्याच्या) उद्देशाने त्यावर स्थापन (इन्स्टॉल… इन्स्टॉल…) केलेला ब्लॉग ( आता याला अनुदिनी वगैरे म्हणलास तर पोस्टचा ड्राफ्ट करून टाकीन…) तो ही मराठीत ! (जर महाराष्ट्र… बाबा लगीन !!!!)  या ब्लॉगमागचा उद्देश असा, की मनात जे काही येईल ते लिहून मोकळं व्हावं, ( हं. ) मराठी टंकलेखनाची सवय व्हावी, ( हं. ) जरा चार गोष्टी नवीन शिकायला मिळाव्यात ( हं. ) आणि मांजरही मऊ असावं !!!

(आता कसं… :D :D :D , तूच रे तूच… ब्लॉगला मुक्ताफळे म्हणतोस आणि नाकासमोर सरळ सरळ कसं लिहितोस??? कित्ती दिवस झाले आपण निरर्थक बोललो नाही. कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. वाक्याला मांजरासकट पूर्णविराम म्हणजे कसं अगदी गब्दुल झाल्यासारखं वाटतं. :D , असं आवडतंय ते लिहावं ना गप. रोज काय घडलं, किती दिवस मांजर ब्लॉगवर आलं नव्हतं )

विषय भरकटतोय…

(त्यातच मजा आहे)

कसली ?

(ते कळत असतं तर अजून काय हवं होतं)

ड्राफ्ट करतोय मी हा पोस्ट…

(दुसरं जमतंय काय, निदान का ते कळू दे)

पोस्टवर असलं निरर्थक वाक्य कसलं अनप्रोफेशनल वाटतं…

(काय वाटतं?????)

अनप्रोफेशनल

( ब्लॉगसारखा ब्लॉग आहे, बास की… )

मजकूरही (कंटेंट)

!! मजकूर !! ही प्रोफेशनल

(कशाला ??)

(…)

पोस्ट कशाबद्दल होता?

(…)

ड्राफ्ट

(ड्राफ्ट)

_____________________________________________________________________

यालाच मराठीत प्रोक्रॅस्टिनेशन म्हणत असावेत. असो, मांजर मऊ असेपर्यंत फरक कोणाला पडतोय…

आपला,

नॅकोबा (म्हणजे मी)

ताप

पावसानं खरंच वैताग आणलाय. काल थोडासा काय भिजलो आणि रात्री लगेच हुडहुडी भरून अंग दुखून कसकस जाणवायला लागली. मग काय, गपचूप झोपलो क्रोसीन घेऊन. घरापासून इतकं दूर असताना बरं नाहीसं वाटण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आई आणि आजीची फार आठवण आली. आज दिवसभर घरीच होतो, त्यात दुपारी एक मस्त भयाण स्वप्न पडलं… मज्जा आहे.

आज दिवसभर तरी बरं वाटलं. दुपारी थोडं काम केलं, थोडी विश्रांती घेतली आणि पिकासावर फोटोतील चेहेऱ्यांना नावं देत बसलो होतो. (वेब आल्बम्स नाही, पीसीवर इन्स्टॉल केलेलं पिकासा) फार मस्त वाटलं. गेल्या वर्षी शाळेचं रीयुनियन आयोजित केलं होतं तेव्हा माझं फ्लेक्स मधील कौशल्य वापरून मी एक छान प्रेझेंटेशन तयार केलं होतं, तेव्हाचे फोटो आजूनही पीसीवर होते. आज त्यातील चेहेऱ्यांना नावं जोडताना आपोआपच तो शाळेचा नॉस्टेल्जिक प्रवास घडला. शाळेतले मित्र, आधीच्या ऑफिसातले कलीग्ज , तिथलं मांजर अशा सगळ्यांशी नकळत भेट झाली. मस्त वाटलं.

इकडे मी मांजरं फार दिसत नाहीत… पुण्यात असताना दिवसाला किमान तीन मांजरं दिसायची इकडे महिन्यातून तीन दिसली तरी फार.

आता मांजरांच्या फार तपशीलात न जाता मी ही पोस्ट संपवतो.

आपला, (मिवमिवाटास विरळा)

~नॅकोबा

पाऊस

अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.

मला नाही !!!

पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत, कदाचित त्या औषधांच्या डोसांपेक्षाही तीव्र… पावसात भिजून वाहणारं नाक आणि त्या पावसाळी पाण्यामुळे वाहणारं पोट या दोन्ही गोष्टींमधे रम्य, सुखद असं काहीच नाही. आणि या आठवणींवर हळुवार फुंकर वगैरे घालून मला शांत कोवळ्या गारव्यात गुरफटून टाकेल अशी कोणी अजून या दिशेने फिरकली नाही. मान्सूनमधे भिजलो तरी वाळवंट काही सरलं नाही.

आता मात्र पावसाचं जरा फारच चाललंय. जूनपासून मागे लागलाय हा, माझा पिच्छाच सोडायला तयार नाही… पुण्यात भेटला जूनमधे… नेहेमीसारखा पडला, थोडा कमीच पडला असेल कदाचित पण तीन महिने मधूनअधून भेटत होता. नंतर त्याला करमेला ऑक्टोबर-नोव्हेंबरमधेही  पुण्यात वाट्टेल तसा पडला. डिसेंबरमधे माझी उडायची वेळ आलेली तेव्हाही पडेल की काय असं वाटत होतं पण हा तसा शांत राहिला. जानेवारीपासून मात्र हा पडतोच आहे इकडे… बर आपल्याकडे बरं असतं. पावसाळा म्हणला की निमूट रेनकोटसकट बाहेर पडायचं नाहीतर भिजायचं. असा सोपा नियम. इकडे पावसाळा गृहीत धरून रेनकोट न्यावा तर सूर्यदेव दिवसभर कार्यभाग सांभाळतात आणि संध्याकाळी बससाठी उभं राहताना दप्तरात ओझं होतं. नेऊ नये म्हणलं तर वाहतं नाक आणि पोट आठवतं. मग काय, निमूटपणे छत्री दप्तरात सरकवतो.

पाऊस चार दिवस बरा वाटतो, चहाचे घोट किंवा गरमागरम मॅगीच्या लडींबरोबर गटागट गिळता येतो. सहा महिने होतील आता, वाट बघतोय हा थांबायची. किती हा माझा स्वार्थीपणा… इकडे कॅलिफोर्निया पावसाबाबत समाधानी आहे. मी अमेरिकेतच कोलंबसमधल्या मित्राला फोन केला होता मधे तेव्हा या पावसाबाबत कुरकूर केली. “साल्या, कॅलिफोर्नियात राहून हवामानाबद्दल तक्रार काय करतोस !! ” ऐकायला मिळालं.

सकाळी उठल्या उठल्या पावसाचा आवाज ऐकला की उठायची जिद्दच निघून जाते. घरीच बसावं वाटतं पण ऑफिसला तर जावंच लागतं… एकूणच मी पावसात जायचं टाळतो. शनिवार-रविवार पाऊस असेल तर फारच बोर होतं. एरवी कसाही संपणारा दिवस अचानक फार कंटाळवाणा आणि मोठा वाटायला लागतो.

आता एकतर हा पाऊस लवकर संपो, किंवा मृद्गंध जागृत करणारी ती हळुवार फुंकर तरी सापडो हीच इच्छा….

आपला,

~नॅकोबा

असेच काही फोटो

आज लिहायला विशेष काही सुचत नाहीये म्हणून काही फोटो अपलोड करणार आहे…

सकाळ

सकाळ

सकाळ, लख्ख प्रकाश, झाडाच्या फांद्यांतून येणारे उन्हाचे कवडसे… नुसतं बाहेर बघितलं की शांत, स्वच्छ, प्रसन्न वाटतं.

उन्हाच्या कवडशांचं मला शाळेपासून कौतुक. लहान असताना काहीही केलं तरी मजा येते. कोणतीही परावर्तक वस्तू आणि एक मांजराचं पिल्लू [:D] किंवा कागद, पालापाचोळा आणि भिंग असे बरेच उद्योग कवडशांच्या सहाय्याने केलेत. प्लॅस्टिकची पट्टी उन्हात उभी ठेवून समोरच्या भिंतीवर इंद्रधनुष्य काढायला मजा यायची.

एकदा मात्र उन आणि भिंग घेउन मी एक गादी जवळजवळ पेटवली होती. सुदैवाने आई त्याच खोलीच होती, जळका वास येताच योग्य ती पावलं उचलण्यात आली. मला तर गालावर वेगवान हाताची अपेक्षा होती, तसं काही झालं नाही मात्र भिंगावर बरेच निर्बंध आले.

प्सेस्टेशन कंट्रोलर

प्लेस्टेशन कंट्रोलर

प्लेस्टेशन 3: मनोरंजन आणि खेळांचा खजिना. या फोटोत आहे तो या प्लेस्टेशनचा कंट्रोलर. (तोही उन्हाच्या कवडशांत) [:D]  खिशात मावेल अशा पॉकेट व्हिडीओ गेम पासून मला लागलेलं या इलेक्ट्रॉनिक खेळांचं वेड आजूनही कायम आहे. (साधारण गेली चौदा पंधरा वर्षं.) आधी पॉकेट व्हिडीओ गेम, नंतर ब्रिक्स, मग टीव्ही गेम त्यानंतर संगणक आणि त्याच्यावरचे गेम, कॅफेत जाऊन मित्रांबरोबर तासन् तास खेळण्यात घालवलेला वेळ यानंतर हा प्लेस्टेशन.

चित्रपट आणि अॅनिमेशन्सना लाजवतील इतके नेत्रदीपक आणि उत्कंठावर्धक खेळ  या प्लेस्टेशन वर खेळता येतात, यातील  ब्लू रे प्लेअर वर सीडी-डीव्हीडीही बघता येतात. सध्यातरी याचा उपयोग मी नेटफ्लिक्स् वरून निरनिराळे चित्रपट आणि मालिका बघण्यासाठी करतोय.

असा एखादातरी गेमिग कन्सोल असावा अशी बरेच दिवसांपासून इच्छा होती पण भारतात असेपर्यंत एवढ्या किंमतीची वस्तू केवळ खेळण्यासाठी घ्यायची हे पालकांना पटवून देणं माझ्या आवाक्याच्याबाहेरचं होतं.

मउमउ चपला

रेलिंग

रेलिंग

हे दोन असेच उगाच…

चपलांनी पायाला छान गुब्बू गुब्बू वाटतं. [:D]

आणि वेळ जात नसेल तर माणूस काहीही करतो…  

आपला,

नॅकोबा

दिवस घालवला उठारेठी

माझ्या आईची आवडती म्हण आहे, “दिवस घालवला उठारेठी, चांदण्याखाली कापूसवाटी…”. एक आजी सोडली तर आमच्या घरच्या सगळ्यांना ही म्हण व्यवस्थित लागू होते. दिवसा वेळ नसतो असं नाही. वेळ पुष्कळ असतो पण तो नको तिथे वाया जातो किंवा कधीकधी जाणूनबुजून इकडेतिकडे घालवण्यात येतो. मग दिवस संपत आला, की बसतो आम्ही जागत, दिवसाचा बॅकलॉग भरत.

दिवस, विशेषकरून रविवार घालवण्याची सवय (किवा हौस) काही केल्या सुटत नाही. दुपारी पूर्ण वेळ मोकळा असताना मी इकडे एखादा पोस्ट लिहू शकलो असतो. दुपारी काय केलं? काही नाही. जेवण झाल्यानंतर टीव्ही पाहिला, डेक्सटर या अप्रतीम मालिकेचा तिसरा अंक बघायला सुरुवात केली, तेही झाल्यावर इंटरनेटवर आचरटपणा केला, त्याही नंतर प्लेस्टेशन वर मनसोक्त गेम खेळलो, बाहेर उंडारून आलो.

भात लावणं, भाडं भरणं, आणि वेबकॅमवरून माझ्यासोबत बोलण्यास सज्ज मामेभावंडांशी अख्खा दीड-एक तास घरभर बागडत झालेलं बोलणं या मोजक्या गोष्टी सो़डल्या तर दुपारपासूनचा वेळ  अगदीच यांव गेला. आता, झोपण्यापूर्वी बघतोय ऑफिसच्या मेल्स… करतोय कामं… टाकतोय पोस्ट्स्…

चालायचंच, शेवटी आवड आपली आपली !

आपला, (आय टी प्रमाणवेळेनुसार पहाटे झोपी जाण्यास सज्ज)
~नॅकोबा.

चष्टगो – १

एकदा पिंगपिंगसेन आणि मिंगमिंगलेन असे दोन राजपुत्र होते.
मिंगमिंगलेन मोठा

दोघेही राजपुत्र, पण दोघांचे वडिल वेगळे वेगळे … म्हणजे ….. आयाही तशा वेगळ्या वेगळ्याच … जसं नोर्मली असतं तसं !!
दोन्ही राजघराण्यांत फार सख्य.

पिंगपिंगसेन अणि मिंगमिंगलेन हे फॅमिली फ्रेंड्स तर होतेच , पण लंगोटी यार पण होते.

रोज एकमेकांकडे जाणं-येणं असायचं …

पण दोन्ही राज्यांच्या प्रधानांना हे मान्य नव्हतं
कारण रोज जाण्या येण्यात खर्च खूप व्हायचा
आणि मग प्रधानजींना CA ला उत्तरं द्यावी लागायची.

एकदा, दोन्ही प्रधान मिळून एक कट रचतात…
त्यांचा प्लॅन जवळजवळ तयार झालेला असतो एवढ्यात मिंगमिंगलेनच्या फॅमिलीची परत जायची वेळ होते…

ठीकाय, उद्या कंप्लीट करू म्हणत दोन्ही प्रधान एकमेकांना टाटा करतात.
प्लॅनच्या डॉक्युमेंटवर शेवटचं वाक्य असतं……

“लवकरच येत आहे !!!”