सर्वनाम

ते. त्यांच्या त्या आणि त्यांचे ते. त्यांचे आपापले मी. त्यांच्यातलेच दोन मी वेगवेगळे, आम्ही होऊ पाहणारे… कधीकधी त्यांना न समजताच सहजगत्या आम्ही झालेले… कधीकधी मात्र आपापल्या मी ला धरून ठेवण्याच्या फोल आग्रहात अडकलेले. कधी आम्ही इतका घट्ट की मी म्हणून खपून जाईल. कधी मात्र प्रश्न पडावा की मीच इतके वेगळे, आम्ही झालेच कसे. हे बघतो मी. मग जाणवतं. सर्वनामं जास्त झाल्येत.

मीपण वाढतंय आणि असे “मी”पण वाढलेत.

एकटाच की जोडीनं?

चाललायस खरा, पण येताना एकटाच येणार…… की जोडीनं???

अमेरिकेत येण्यापूर्वी हा प्रश्न बऱ्याच वेळा ऐकला होता. या एकाच प्रश्नातून अनेक वेगवेगळ्या भावना व्यक्त होत असतात. प्रश्न विचारणाऱ्याचं प्रश्न विचारला गेलेल्या व्यक्तीशी जे नातं असतं त्यानुसार या प्रश्नाच्या गर्भितार्थात बदल होतो. घरचे किंवा नातेवाईक जेव्हा विचारतात तेव्हा त्यात जरा काळजी असते. कोणाचातरी कोणीतरी कुठेतरी जाऊन काहीतरी करून बसलेला असतो. तो प्रकार आपल्या बाबतीत घडू नये असं त्यांना वाटत असतं.  जेव्हा मित्र विचारतात तेव्हा त्यात एक चावट आशावाद दडलेला असतो.  लहान भाऊ जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा त्यात “तू जमव, म्हणजे माझी लाईन क्लिअर” असा सुप्त संदेश असतो. काही मंडळी असतात, जी तुम्हाला विनाकारण ओळखत असतात. तीही विचारतात. एकटाच येणार की जोडीनं. त्यात खोचकता वगैरे ठासून भरलेली असू शकते. काही जणं केवळ विचारायचं म्हणून विचारतात. कदाचित जोडीनं येणार म्हणला तर काय घ्या!  प्रश्न आला की आपलं ख्या ख्या ख्या करून हासायचं अन् हो हो अशी मान डोलवत नाही म्हणायचं हा नित्यक्रम मी नेटानं पाळला. कारण एकूणच, या प्रश्नात अनपेक्षित असं काही नव्हतं…..

गेल्या महिन्यापर्यंत…..

मी लवकरच सुट्टीवर जाणार ही बातमी ऑफिसात पसरली अन् साधारण दिवसभरात तीन-चार लोकांनी मला हाच प्रश्न विचारला तेव्हा मात्र माझी विकेट उडाली. अमेरिकेतून भारतात सुट्टीवर येतानाही हा प्रश्न येऊन आदळेल याची मी कल्पनाच केली नव्हती.  कल्पना करा… आंघोळीसाठी तुम्ही मोरीत शिरलाय, गंगेच यमुनेचैव म्हणत तुम्ही पहिला तांब्या अंगावर घेणार इतक्यात एखाद्या अज्ञात शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही परस्पर उत्तर ध्रुवावर येऊन पोहोचलाय… माझी अगदी इतकीही खतरनाक परिस्थिती नव्हती, पण म्हणून तुम्ही अशा रोचक आणि रंजक कल्पना करू नयेत असा नियम नाही. सुविचार असा, की  आयुष्य, विश्व आणि इतर सर्व गोष्टींचं उत्तर बेचाळीस आहे, अन् उत्तर ध्रुवावर टॉवेल सहजासहजी मिळत नाही.

हेहेहे. विषयांतर खतम…

त्याचं काय आहे, की कॅलिफोर्निया बे एरियात चिक्कार भारतीय मंडळी आहेत अन् कायम नव्यानं येत असतात. एकूणच, एखादा सुकुमार (ब्याचलर) बंडू सुट्टीसाठी  एकटा मायदेशी जाणं अन् येताना सपत्नीक येणं (किंवा आल्यानंतर आपण आता ब्याचलर नसल्याचा जाहीरनामा देणं) ही संकल्पना सिलिकॉन व्हॅलीला  आजिबात नवीन नाही. (इट्सा फमिलिअर फिणॉमेणॉ युसी)

पहिल्याच प्रश्नानं गारद झालेल्या माझा या प्रश्नकर्त्यांनी पुढच्या काही वाक्यातच पूर्ण वैराचिक फडशा पाडला… त्याचा हा साधारण सारांश

प्रश्नकर्ते: काही प्रश्न विचारतो तुला, आणि मग आम्हीच सांगतो तू एकटा येणार की जोडीनं !

मी: निरुत्तर…

प्रश्नकर्ते: किती दिवस चाललायस?

मी: एक महिना.

प्रश्नकर्ते: (निश्चिततादर्शक स्मितहास्य) काही खरं नाही … बरं वय काय बाळ तुझं?

मी: चोवीस… बहुतेक……… किंवा पंचवीस…..( मनातल्या मनात – दहातून सहा गेले राहिले…..)

प्रश्नकर्ते: हा पहिला प्रश्न. पालकांबरोबर जिथे कुठे जाशील तिथे. मग एकदा गाडी वळली की तिथून पुढे हायवेच आहे.

मी: निरुत्तर… (मनातल्या मनात- खरंय…. काही खरं नाही)

प्रश्नकर्ते: घरच्यांनी या विषयावर तुझ्याशी बोलणं अचानक कमी केलंय?

मी: निरुत्तर… (हो बहुतेक, किंवा नाही…. खरं की काय???  याचा अर्थ काय समजायचा ???)

प्रश्नकर्ते: इतक्यात तुझ्या ओळखतल्या कोणाचं लग्न झालंय?

मी: (बारीक आवाजात…) हो…

प्रश्नकर्ते: हम्मम्मम्म् . (निश्चिततादर्शक स्मितहास्य, यावेळी जाणवणारी निश्चितता पूर्वीपेक्षा साधारण दसपट ) आता शेवटचा प्रश्न…

प्रश्नकर्ते: कोणा दूरच्या नातेवाईकांनी इतक्यात तुझ्या पालकांशी संपर्क साधलाय??

मी:  मी गप्प, चेहेरा मात्र उद्गारतोय ओमायगॉड !!!

प्रश्नकर्ते: अभिनंदन

मी: गार.

या फैरीत चांगलाच घायाळ झालो असतो तरी आता मात्र सावरलो आहे. आता प्रश्न विचाराल तर उत्तर तयार आहे. तेच आपलं नेहेमीचं… ख्या ख्या ख्या करून हासायचं अन् हो हो अशी मान डोलवत नाही नाही म्हणायचं.

~नॅकोबा

असंच काहीतरी

मर्कटापासून उत्क्रांत झालेल्या मज्जारज्जूंनी खच्चून भरलेल्या मर्त्य मानवाच्या मस्तिष्काच्या मर्यादांवर मनन करण्यापेक्षा मुरमुरे मटकावण्यात मर्दुमकी मानणाऱ्या मनुष्यांच्या मतमतांतरावर मल्लीनाथी करण्यापेक्षा मी मांजराच्या मिजासखोर मउपणात मश्गुल होणे पसंत करेन.

अशा अनेक गोष्टी असतात, ज्या असतात. त्यांना बरेचदा कारण असतं, पण ते नसलं किंवा आपल्याला माहीत नसलं तरी फारसा काही फरक पडत नाही.

हिमेश रेशमिया….. आहे.
राखी सावंत….. आहे.
एकता कपूर….. आहे.

का आहे याच कारण देवाला ठावूक
तोही आहे. का आहे ते माहीत नाही पण आहे.

अत्ता या क्षणी माझ्या शीतकपाटात (शीः मला फ्रिज्ज म्हणायचं होतं) कोका कोला का आहे?
इंटरनेट एक्पस्लोअरर…. का आहे?
काही चकोट इतके रेखीव का दिसतात?
शनिवारी दुपारी मी झोपलेला का असतो?
काही लोक लाच का घेतात?
काही लोक काच का खातात?
आईच्या मैत्रिणी फार्मविल का खेळतात?
इंटरनेटवर इतकी माहिती का असते?
त्यातली बरीचशी अश्लील का असते?
हे मला का माहीत असतं?

वगैरे प्रश्नांची उत्तरं शोधण्यास अशक्य नाहीत. पण माहीत झाली तरी त्यानं काही होणार नाही किंवा केळं होईल. केळं होणे हा एक मराठी वाक्प्रचार आहे.  काहीच न होणे या अत्यंत नकारात्मक अर्थाची इतकी सकारात्मक मांडणी हे एक वैशिष्ट्यच म्हणायला म्हणायला पाहिजे.  असले वाक्प्रचार शाळेत शिकता येतात पण शिक्षकांकडून शिकवले जात नाहीत हा एक विरोधाभासच म्हणायला पाहिजे. शाळेत शिकलेले पण शिक्षकांनी न शिकवलेले वाक्प्रचार दैनंदिन वापरासाठी कितीही चपखल अन् उपयुक्त वाटले तरी आपणासारख्या सूज्ञ वाचकांनी ते जपूनच वापरावेत हे वेगळे सांगणे न लगे.

आता असं का, आणि वाचक कायम सूज्ञ का असतात हे प्रश्न ……..

~नॅकोबा

बोका खिदळत होता.

नळ सुटलेला, वाहत होते पाणी,
बुडले वारूळ, गडबड सारी
मुंग्या धावून वाहून गेल्या
गेले पाणी, मग तो आला
वरवर सारे पाहून गेला

वारूळात ही शिरे वाळवी
साध्या झडल्या, धडपडल्या पण
लढल्या सैनिक मुंग्या
पोखरलेल्या खाटेवर त्या
तो निवांत पहुडला होता

तिथेच त्याच्या पायाशी,
पाहत सारे, जिभल्या चाटित
बोका खिदळत होता !!!

~नॅकोबा

——————————

अर्थमैथुन : हातचा

हातचा

हातोटी

हातभट्टी

हातखंबा

हातघाई

हातमाग

हातभार

हस्तकला

हस्तोद्योग

हातसफाई

हातचलाखी

हसतमुख

हस्तांदोलन

हातमिळवणी

हस्तमुखप्रक्षालन

छे!!! पार हाताबाहेर गेलेली केस आहे…..

टक्कल

आजच कटिंग करून आलो. मान्य केलं पाहिजे. टक्कल करायला पण हिंमत लागते. माझं आपलं त्रैमासिक केशकर्तन.

टक्स, चंद्रमा, गोटा , पिच, चमन,   कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षांत मला टकलाचं बेक्कार म्हणजे बेक्कार म्हणजे बेक्कार फॅसिनेश चंद ( आकर्षण  ) होतं. मेट्रिस्कमधला मॉर्फियस, ट्रिपल एक्स मधला विन डेजेल, ‘हिटमॅन’ गेम्स सीरीजचा नायक ही सर्व टकली मंडळी वारंवार पाहण्यात (आणि खेळण्यात) होती. त्यात माझ्या ओळखीतल्या एकांनी नुकतंच च्यकोट केलं होतं आणि ते भार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्री दिसत होतं.  (होतं काय, दिसतंच आजूनही ! मेंटेन केलंय) !!! त्यामुळे आपणही टक्कल करावं असं मला मनापासून वाटायचं… ‘मी टक्कल ठेवू का’ असंही घरी विचारायलं होतं मी पण तेव्हा  ‘पडेल रे, पडेल… थांब जरा’ असं सपाट  ( पण कॉन्फिडण्ट (कॉन्सिफिडण्डण्डण्ट (रिडण्डडण्डडण्डण्ट सारखं ) ) ) उत्तर मिळालं. माझा एक गेमर मित्र दर चार सहा महिन्यांनी गुळगुळीत करून यायचा. बालाजीला जाऊन आलेली काही मंडळीही भेटायची मधून अधून. नुस्ती ज्यलन व्हायची…

लवकरच मला माझे केस माझ्याइतक्याच आतुरतेने कीबोर्डकडे झेपावताना दिसले आणि टकलाचं वेड आपोआप ओसरलं. पण कधी काही पाहिलं किंवा ऐकलं अंधारात गेलेलं टक्कल पुन्हा डोकं वर काढतं. मधे एकदा “आसमा केहेता है रब से, तुमने चांद दो क्यू बनाए” ऐकलं… रहावलं नाही… त्यातच पुढे “एकमें रखा दै दाग दाग दूसरा है साफ साफ” आणि वर “सबकी नरज उसपे जाए” असंही आहे… कमाल… ( !!! )  टकलावर फुलटू झकास अशी ड्रॅगनवगैरे वाली मेंदी काढली तर ती कशी दिसेल असाही प्रश्न माझ्या मनात आहे. कदाचित तो प्रकार हेअर स्टाईलप्रमाणे टक्कल स्टाईल होऊन जाईल कोणास ठावूक (टकलावर मेंदीचा अजुन रंग ओला वगैरे गाणीही सुचतील) .

असो.

~नॅकोबा.

काम चालू… मेंदू बंद.

हल्ली (चायला) पोष्टी सुचत नाईयेत. म्हणजे सुचतायत पण पूर्ण नाही.

असं कसं? अर्धवट कसं सुचू शकतं ? असं होतं का कधी, काहीतरीच अपलं तुझं.

सुचू शकतं.

का?

मी जे काय बोलतोय तो प्रत्येक शब्द आणि त्यामागचं कारण माहीत असावं हा बंगलोरी नियम मला मान्य नाही.

बंगलोरी का?

कारण पुणेरी नाही म्हणून.

हो का?

बोका !

बोका कुठून आला?

बोका मऊ असतो.

हो पण आला कुठून

मऊ

कुठून

रशिया

रशिया का काय संबंध?

रशिया हा देश मला वाक्यात वापरायला आवडतो.

बरं मग?

मग नाही कप.

कपात काय

चहा, पाणी, वीज.

हं.

संपले का प्रश्न. आता मी

विचार

जर पाणी सुपर कंडक्टर तर मग सुपर ड्रायवर कोण? ख्या ख्या ख्या

फल्तू प्रश्न नकोत.

का?

या प्रश्नाला काही उत्तर नाही.

असं नस्तं. कोणत्याही प्रश्नाला उत्तर हे असतंच. फक्त ते बरोबर असेलच असं नाही. आणि चुकू म्हणून उत्तर न देणं ही एक मोठी चूक आहे.

चूकभूल द्यावी घ्यावी.

तू मला चूक दे, मी तुला भूल देतो.

चूक कशी देणार?

पुन्हा प्रश्न… चूक रे आपली हाडवैरच्या दुकानात मिळणारी, येईल की देता. बर, एक नाही मिळाली तर सरळ चुका आणायचा आणि म्हणायचं… चुका घ्या…

दवे बाई, शीर्षकाचा कुठेच काही संबंध नाही…

दवे बाई कोण ?

दवे बाई म्हणजे बाय द वे, ख्या ख्या ख्या

आयला, जमलं की तुला पण

मंग! शेवटी मन कोणाचं आहे !!!

~नॅकोबा

चष्टगो-३

भाग-१
भाग-२

आ वासून बघणाऱ्या सशाला आता काय सांगावं असा मोठा प्रश्न अंघोळ्यापुढे पडला होता. बरं खोटा पासवर्ड तीन वेळा सांगितला तर सशाचं अस्वलात रुपांतर होऊन उघडणाऱ्यांच्या मागे लागतं मग काही धडगत नाही… आजून थोडा वेळ उघडं ठेवलं तर हा ससा स्वतःहून दार लाऊन घेतो म्हणे.

जाम चिडलेले असतात हे ससे. सहाजिकच आहे. कोणी कपाटाला कळीचा शब्द लावेपर्यंत हे जंगलात निवांत चित्तानं आपले “ससुले उद्योग” करत असतात. शब्द लावला रे लावला की ससा आहे तिथून अंतर्धान आणि कपाटात हजर. यावर कडी म्हणून त्याला वाचासुद्धा प्राप्त होते. अनुभवी लोक सांगतात की नव्वद टक्के पेक्षा जास्त ससे आल्या आल्या शिव्या द्यायला सुरूवात करतात. दार उघडून बरोबर पासवर्ड दिला की मग ससा जागच्याजागी परत जातो. दार परत लावलं की दुसरा ससा आत. दार लावावं लागलं की चिडचिड होते मग त्यांची. ऐकवणार नाहीत अशा शिव्या देत दार लावतात आणि नंतर दार उघडलं गेलं होतं हे खऱ्या मालकाला कळतं ते वेगळंच…

पासवर्ड चुकले की जाम राग येतो या सशांना, त्याचं कारण वेगळंच. सशांचा एक गुणधर्म आहे. हे आसपास असले तर एखाद्या जागेतली जादू निष्णात जादूगार किंवा मांत्रिकांनाही सहजासहजी काढता येत नाही. म्हणूनच मांत्रिक वगैरे लोक सशांची हाडं किंवा केस असलेल्या कांड्या आणि कुंचले वापरतात. ससा जवळ असेपर्यंत चोरांना तिजोऱ्या आणि कपाटं फोडता येत नाहीत. मग ते एकाला पुढे करून तीनदा चुकीचा शब्द सांगायला लावतात. मग हा शूर चोर चिडलेल्या ससा-अस्वलाला स्वतःमागे लांब पळवून आणतो आणि त्याचे उरलेले साथीदार निवांत तिजोरी फोडतात. जादू नाहीशी झाल्यावर बिचारा ससा कायम अस्वल बनून राहतो. कधीकधी जर टोळी मोठी असेल तर या अस्वलाचीपण शिकार होते. अस्वलाच्या गर्जना एकूणच जोरात असल्यानं शहरी भागात हे चोर असले उद्योग करत नाहीत पण एखाद्या दुर्गम महालात असले प्रकार झाल्याची उदाहरणं आहेत.

नाईलाज… सध्या तरी आंघोळ्या एकटाच होता आणि ससा समोर असताना जादू काढणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. तरीही ससावाल्या तिजोऱ्यांची ही माहिती आपल्या आजून लक्षात आहे हे बघून त्याला थोडं बरं वाटलं. चार वर्षापूर्वी आपण अगदीच बाळू होतो. सगळे गंडवून जायचे… एवढंच काय, स्वतः लवकरचनं गुप्तहेरी कारवाईच्या नावाखाली आपल्याला त्याच्या योजनेबाहेर ठेवलं होतं… तेव्हा नाही कळलं पण तेच काम करताकरता हळूहळू एकएक शिकत गेलो आणि मग लक्षात आलं की आपल्याला चांगलंच गंडवलंय… तरीही दिलेलं काम करत राहिल्याचा त्याला अभिमान होता. गंडवलं गेल्याबद्दल तो स्वतःवरच नाखूश होता पण लवकरच वरची त्याची निष्ठा ढळली नव्हती… नाही म्हणायला त्याला या कामाचा फायदाच झाला होता. या तिजोरीप्रमाणेच इतर बऱ्याच गोष्टींची, घडामोडींची अद्ययावत माहिती त्याला होती शिवाय स्वतःला अदृष्य ठेवण्याची कलाही त्याला चांगली जमू लागली होती. नाहीतर या कारस्थानाचा सुगावा त्याला लागलाच नसता…

काय आहे तरी काय त्या कागदपत्रांत ? लवकरचशी त्याचा काय संबंध ? या प्रधानांचं नक्की चाललंय तरी काय? आणि हा ससा दार लावायला निघाला की काय ?? आणि त्या शेवटच्या ओळीचा नक्की अर्थ काय???

‘लवकरच येत आहे’ नकळत आंघोळ्या पुटपुटला…

ससा बाजूला सरकला. कपाटाचं अंतरंग हळूहळू स्पष्ट होत गेलं…

चष्टगो – २

पूर्वार्ध : चष्टगो – १

पिंगपिंगसेन हे क्वाग्रीच राजघराण्याचं शेंडेफळ. बबन क्वाग्रीच हा त्या सत्तेचा चौथा वारसदार. वास्तविक बबन स्वतः तसा साधाच, स्वभावाला मृदू. एरवी राजसत्तेवर आलाच नसता. बबनचा भाऊ, अजिंक्य क्वाग्रीच हा एक अतिशय शूर, मुत्सद्दी राजा. त्याच्या अल्प कारकीर्दीत त्यानं आपासच्या सर्व राज्यांशी योग्य ते सर्व मार्ग वापरून शांतता नाहीतर सख्य प्रस्थापित केलं होतं. सैन्याची व्यवस्थाही अगदी चोख होती. बिचारा ड्रॅगनच्या अपघातात गेला.

अजिंक्यला एक मुलगा होता ‘लवकरच’. तो तर महायोद्धा म्हणून प्रसिद्ध. ‘लवकरच येत आहे’ अशी आरोळी ऐकली की शत्रूचे सैनिक चळाचळा कापायला लागायचे. बापाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचा काका सत्तेवर आला. ही बातमी कळल्याच्या तिरऱ्याच दिवशी लवकरच त्याच्या छावणीसकट गायब झाला. लोकांमधे अनेक अफवा आहेत पण जो एक घाबरलेला सैनिक सापडला त्यानं सांगितलं की लवकरच नं स्वतःचा प्रचंड शक्तिशाली स्फोट घडवून आणला, छावणीतल्या सगळ्यांची वाफ केली आणि नंतर अंतर्धान पावला. तेव्हा हा सैनिक अंघोळ करत होता म्हणे…

मिंगमिंगलेन बस्तिडा, शुशार बस्तिडा या राजाचा एकमेव वारस… मोठ्या प्रयत्नानंतर राजाला मिळालेलं हे रत्न. शुशार राजानं आधी खूप उपाय करून पाहिले, बडे बडे हकीम झाले, वैद्य झाले, देशोदेशीचे विद्वान झाले, अगदी तांत्रिक मांत्रिक सुद्धा झाले पण परिणाम शून्य, शेवटी या सर्वांना कंटाळून राजानं लग्न केलं… बाकी हा राजा तसा कर्तुत्ववान होताच… लवकरच शोधण्यासाठी यानंही जंग जंग पछाडलं पण काही हाती लागलं नाही. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटली होती.

आज मात्र तो अंघोळ्या सैनिक हैराण झाला होता. दोन्ही प्रधान ‘टाटा’ म्हणून गेल्यावर हा हळूच त्याच्या अदृष्य वेशातून बाहेर आला आणि नुकतंच कुलूपबंद केलेलं दस्ताऐवजांचं कपाट त्यानं मोठ्या शिताफीनं उघडलं… समोर बघतो तर एक ससा आ वासून उभा… “शिट्.. पासवर्ड… लागली वाट !”, वैतागून अंघोळ्या स्वतःशीच म्हणाला… काहीतरी करायलाच हवं होतं… त्या कागदावरचं  त्याच्या दृष्टीस पडलेलं शेवटचं वाक्य एकसारखं त्याच्या मनात घुटमळत होतं…

लवकरच येत आहे….

शुद्ध पाचकळपणा

बरेच दिवस झाले, मनसोक्त पाचकळपणा करता आलेला नाही. मराठीत निरर्थक, आचरट, पाचकळ बोलायला मला काहीच प्रयत्न लागत नाहीत. इंग्रजीतमात्र कितीही प्रयत्न केले तरी तितकंसं चांगलं जमत नाही. आता जवळजवळ चार महिने होत आले. मी कोणाला “तू मजेत, काय सांगतोस, मगाचपर्यंत मी तुला <समोरच्यातं नाव> समजत होतो” हा वाक्प्रयोग करून चकवलं नाहीये का कोणाला “अरे, तू किती चांगला आहेस…. सध्या” असं पुणेरी तूप लावलं नाहीये. पालच चुकल्याचुकल्याशाख्खं वात्तंय.

खी खी…

चटईवर चालणारा चतुर चोर चमच्यातला चुका चाखून चरकला. “चुक्याला चव चुन्याची ?? चांगलं चाललंय” चोर चिरकला…

“चुकून, चुना चमच्यावर चढला..” चड्डीपैलवान चेतन चाचरला…

हे असं सुचतं मग उगाच…

आज एवढंच. झोप आल्ये, मन बुंगाट सुटलंय, बोटांना मात्र वेगमर्यादा आहे.

वाटलेला नवलकोल हे शब्द नवल वाटणे या अर्थानं वापरायचे होते कुठेतरी पण पोस्ट संपवायची प्रचंड इच्छा होते आहे.

उद्या बघतो जमलं तर…

आपला,

~चॅकोबा !!! (च्या च्या च्या)