फेसबुक, फार्मविल आणि

भर दुपारी मस्त फेसबुकावर माफियांच्या विश्वात खळबख माजवत होतो. जरा वेळाने उर्जा संपल्यावर म्हणलं आता जरा शेतीकडे वळावं, शेवटी काही झालं तरी आपण शेतीप्रधान देशाचे नागरिक ! शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय कोण म्हणतं.. इकडे मीतर रोज माझ्या मित्रांच्या शेतावर खतपाणी करतोय!! सध्या इस्टर म्हणून सवंगड्यांना फुकटची खोटी रंगीत अंडी पाठवतोय आणि माझे मित्रही हिरीरीने या शेतीप्रकल्पात सहभागी होत आहेत. आहे की नाई मज्जा. जोश्याच्या शेतावरच्या कोंबड्या भुकेल्या आहेत पाहून नेने त्यांना पौष्टिक धान्य खाऊ घालताहेत. वाळून गेलेलं धान्य परत उगवता येतंय . सारं काही आलबेल आहे.
फार्मविलची सध्या बेक्कार हवा आहे. फेसबुकावरचा जो दिसतोय तो शेतावर काय घडलंय सांगतोय. दिवसातला थोडा वेळ काढून या खोट्याखोट्या शेतावर लक्ष देतोय, कापणी करतोय, प्राणी पाळतोय वगैरे वगैरे. माझ्य़ासारखे काही गेमाड लोक तर व्यसन लागल्यासारखे खेळतायत. काही जण तर दमड्या मोजून फार्म कॅशही घेत असतील. आणि फार्मविलचे निर्माते झिंगा गेम्स तर अशा खेळांवर खोऱ्यानं पैसा ओढतायत.

खरंतर ही पोस्ट दुसरंच काहीतरी लिहायला घेतली होती पण काहीतरी वेगळंच घडलं. वरचं ते शेतीप्रधान देशाचं वाक्य लिहिलं आणि पेपरात वाचलेल्या बातम्या आठवल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आणि कर्जमाफीसाठी नेत्यांनी चालवलेल्या खेळांच्या. आणि आपण खेळातल्या एका खोट्या जगात सर्वकाही आलबेल असल्यासारखं वागतोय या भावनेने क्षणभर मनाला चटका बसला. आणि डोक्यात उगाचच एक विचार आला, की समजा उद्या एखाद्या ना-नफा-ना-तोटा संस्थेनं असले व्यसनमयी गेम काढले आणि त्यातून मिळाणारे थेट किंवा जाहिरातीचे उत्पन्न सत्कार्यासाठी वापरलं तर काय होईल? शिवाय चार सहा डिझायनर्स डेवलपर्सना नोकरी मिळेल ती वेगळीच.

गेली दहा वर्षं वेगवेगळे गेम खेळतोय, निर्लज्जपणे, पुढेही खेळीन, त्याच निर्लज्जपणानं… पण आज पहिल्यांदाच मी कन्फ्यूज झालोय. आणि गेम्स वाईट कसे नाहीत, उलट त्यांचा फायदेशीर वापर कसा करता येईल हे स्वतःला पटवू पाहतोय. मी गुत्त्याच्या मालकाकडून जनकल्याणाची अपेक्षा करतोय का? का गेम्स खरंच वाईट असतात… माझ्या गेमर सांप्रदायिकतेवर घाला घालण्याचं काम इतके दिवस आई करायची, आज मी नकळत तेच करतोय… का ते माहीत नाही, म्हणूनतर इतका गोंधळलोय… ही पोस्ट मला अजून एकही तास ड्राफ्टमधे ठेवायची नाहीये म्हणून तुटकच संपवून मोकळा होतोय.

इतकंच !

शुद्ध पाचकळपणा

बरेच दिवस झाले, मनसोक्त पाचकळपणा करता आलेला नाही. मराठीत निरर्थक, आचरट, पाचकळ बोलायला मला काहीच प्रयत्न लागत नाहीत. इंग्रजीतमात्र कितीही प्रयत्न केले तरी तितकंसं चांगलं जमत नाही. आता जवळजवळ चार महिने होत आले. मी कोणाला “तू मजेत, काय सांगतोस, मगाचपर्यंत मी तुला <समोरच्यातं नाव> समजत होतो” हा वाक्प्रयोग करून चकवलं नाहीये का कोणाला “अरे, तू किती चांगला आहेस…. सध्या” असं पुणेरी तूप लावलं नाहीये. पालच चुकल्याचुकल्याशाख्खं वात्तंय.

खी खी…

चटईवर चालणारा चतुर चोर चमच्यातला चुका चाखून चरकला. “चुक्याला चव चुन्याची ?? चांगलं चाललंय” चोर चिरकला…

“चुकून, चुना चमच्यावर चढला..” चड्डीपैलवान चेतन चाचरला…

हे असं सुचतं मग उगाच…

आज एवढंच. झोप आल्ये, मन बुंगाट सुटलंय, बोटांना मात्र वेगमर्यादा आहे.

वाटलेला नवलकोल हे शब्द नवल वाटणे या अर्थानं वापरायचे होते कुठेतरी पण पोस्ट संपवायची प्रचंड इच्छा होते आहे.

उद्या बघतो जमलं तर…

आपला,

~चॅकोबा !!! (च्या च्या च्या)

आयपॅड

काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :

वाईट :

  1. मल्टिटास्किंगचा अभाव : यावर एका वेळी एकच अॅप्लिकेशन चालतं. आयपॅड हा फक्त एक मोठ्ठा आयपॅड आहे असं वाटण्याचं हे महत्वाचं कारण.
  2. फ्लॅश चालत नाही : HTML5 उंबरठ्यावर उभं असताना खरंचर याची चिंता करायची गरज नाही पण यावर फ्लॅश मधले गेम्स खेळता येणार नाहीत हे ऐकून बघून वाईट वाटतंच.
  3. सुळसुळीत कीबोर्ड : काचेवर टंकायची सवय होईपर्यंत याचा कीबोर्ड तसा वापरायला झुळझुळीत आहे.
  4. देवनागरी कीबोर्ड उपलब्ध नाही  : यावर देवनागरी नीट चालत नाही, दिसतही नाही, वेलांटीचा आणि जोडाक्षरांचा जरा प्रॉब्लेम आहे. टंकलेखनासाठी थेट कीबोर्डही उपलब्ध नाही. ती सोय मिळवण्यासाठी काही जुगाड करावे लागण्याची  शक्यता आहे.

बऱ्या :

  1. सुटसुटीत : याचं वजन एखाद्या मध्यम आकाराच्या पुस्तकाएवढं आहे. एकूण आकारही असा आहे की फार वेळ हातात धरलं तरी त्रास होणार नाही.
  2. मोठा पडदा : आयपॅडचा पडदा (स्क्रीन) हा  आयपॉडपेक्षा जवळजवळ चौपट मोठा आहे. अॅपलची अॅप्लिकेशन्स या उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करतात. गेम्स खेळायला हा आकार उत्तम आहे तसंच एखादं पुस्तक वाचायलाही सोयिस्कर आहे. मी आयपॉडवर पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता पण तो आकार फारच छोटा पडतो. आयपॅड उभं धरलं की एका साधारण पुस्तकाच्या पानाइतका मजकूर पडद्यावर असतो. पुस्तक वाचायचा अनुभव टिकून राहतो.
  3. सिनेमे बघण्यास उत्तम : गादीवर पडून चित्रपट बघण्यासाठी हा सर्वोत्तम प्रकार आहे. यावर यूट्यूब बघता येतं, आय-ट्यून्स मधून ओतलेले सिनेमे बघता येतात तसंच नेटफ्लिक्स ऑनलाईन बघण्यासाठीही एक मोफत अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे.

माझा निष्कर्ष :

सध्या थोडं थांबायला हरकत नाही. पुढच्या पिढीतील (नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट वर्जन) आयपॅड्समधे काही वाढीन सोयी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या आयपॉड किंवा आयफोनवर सहज भागेल. (शिवाय आयफोन गेल्याच महिन्यात घेतलाय..)

आपला,

~नॅकोबा

(एक सरळ अर्थाची, एक विषय धरून आणि अव्रात्य पोस्ट… काही खरं नाही… निमूटपणे झोपलेलं बरं.)

मांजर इतकं मऊ का असतं?

मांजर इतकं मऊ का असतं?


मांजर मऊ असतं का?
मांजर हा उपद्रव ठरू शकतं का?
उपद्रवी मांजरावर उतारा म्हणून मालकाने कोणता द्रव घ्यावा?
द्रवाचा अंमल जाणवत असताना मांजर मधे आल्यास काय होईल?

06052009462.jpg

तुम्ही मांजर पाळाल का?
तुम्ही आजून काय काय पाळाल ? (कुत्रा, ससा, कायदा, सिग्नल वगैरे…)
घरच्या मांजराचं महत्व किती?
कोणी एक धनू जर तिच्या घरधन्याने धावून धावून जमवलेल्या धनापैकी निम्मं धन घरच्या बन्या बोक्याच्या सुशोभितीकरणास खर्च करत असेल तर ते योग्य की अयोग्य?
हा धनी जर धनूच्या ताटाखालचं मांजर असेल तर परिस्थितीत काय फरक पडेल ?
धन्या आणि बन्यापैकी कोणत्या मांजराचा मालकिणीवर जास्त अधिकार असेल?
लग्नानंतर मुलीबरोबर तिचं पाळीव मांजर सासरी जाउ शकतं का?
तेव्हा त्या मांजराचं नाव बदलण्याबद्दल तुमची मतं काय?
व्याहीभोजनात मांजराची जागा कुठे?

हे आणि यासारखे बरेच प्रश्न मला उगाच पडतात…
काही दिवसांपूर्वी एके कम्युनिटिवर हा टॉपिक टाकला होता. काळाच्या ओघात तो उडाला. बरेच दिवस तो ईमेलमधे टिकून होता, आज म्हणलं इकडे टाकावा. तेवढीच थोडी मज्जा !

22012009319.jpg

आपला,

~नॅकोबा

चित्रपटपूर्ण रविवार

आजच्या दिवसात मी “आरोग्याला अपायकारक” इतका टीव्ही पाहिलाय. सकाळी घराची स्वच्छता केली, आठवड्याचा बाजार आणला, (म्हणजे फक्त ब्रेड, सिनामन रेझिन व्हीट), जेवलो, आणि नंतर हातात लॅपटॉप घेऊन प्रोग्रॅमिंग आणि समोर अविरत टीव्ही असा सुखद आळस सुरू झाला. नेटफ्लिक्स हे एक वरदान आहे. बरेच चित्रपट सीडीवर आणि ऑनलाईन बघण्यास उपलब्ध आहेत.

व्हांटेज पॉइंट, चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग, स्कूबी डू आणि शेवटी जुन्या कृष्णधवल  अॅडम्स फॅमिलीचा एक एपिसोड अशी मस्त मॅरॅथॉन झाली. व्हांटेज पॉइंट एक वेगवान आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन. मी तो चित्रपट आजून किमान चारदा पहायची शक्यता आहे.*

चिट्टी चिट्टी बॅंग बॅंग मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी पाचसहा वर्षांचा असेन. मामाकडे व्हीसीआरवर कॅसेट भाड्यानं आणून पाहिला होता. एक तर मी खूप लहान होतो आणि पाहता पाहता झोपलो पण होतो (हे बरं आठवतंय) त्यामुळे चित्रपट लक्षात नव्हता पण नंतर या गोष्टीची मी कैक वेळा पारायणं केली होती. लहानपणीची ती एक आवडती गोष्ट इतक्या वर्षांनी परत पाहताना फार मस्तं वाटलं.

ही कथाच मुळात लहान मुलांसाठी आहे. एक विक्षिप्त संशोधक प्रोफेसर पॉट्स, त्याची दोन मुलं , त्यांना भेटणारी ट्रुली स्क्रंप्शस आणि त्यांची एक गाडी यांची ही गोष्ट. मुलांच्या आवडीखातर प्रोफेसर एक जुनी गाडी आणतात आणि तिची डागडुजी करून तिला नवं रूप देतात. या रूपांतरणात गाडीत काही सुरस व चमत्कारिक बदल होतात आणि अशी ही अफाट गाडी एका दुष्ट राजाच्या मनात भरते. त्यानंतर गुप्तहेर, प्रोफेसरांच्या वडिलांचं अपहरण, उडत्या गाडीनं केलेला पाठलाग आणि अखेर  त्या दुष्ट राजाराणीपासून जनतेची सुटका असा साहसप्रवास हा चित्रपट घडवतो.

साठच्या दशकातला हा एक ब्रिटिश चित्रपट. हिंदी चित्रपटांप्रमाणे यात दर काही मिनिटांच्या अंतरावर मस्तपैकी नाच आणि गाणी आहेत. इंग्रजी चित्रपटांत आजवरतरी असं काही बघायला मिळालं नव्हतं. या वेगळेपणामुळे आजूनच मजा आली.

हेच लहानपण पुढे चालू द्यावं म्हणून स्कूबी-डू चाही एक चित्रपट बघून टाकला. हा आधीही पाहिला होता पण परत एकता बघताना बरं वाटलं. तिकडूनच पुढे नेटफ्लिक्सवर चाळता चाळता अॅडम्स फॅमिलीचे जुने एपिसोड्स दिसले. कार्टून नेटवर्कवर याची अॅनिमेटेड सीरीज बघितली होती त्याचं मूळ कसं आहे हे बघावं म्हणून पहिला एपिसोड बघून टाकला. आठवडा दोन आठवड्यात सीझन संपवून टाकीन म्हणतो.

डोळ्यांना असा अथक त्रास दिल्यानंतर रात्री निमूटपणे देव-डी आणि रॉक ऑनची गाणी ऐकत बसलो. रात्रीच्या जेवणाची आणि उद्याच्या डब्याची सोय केली. आमटी आजही बरी जमली, सलग दुसऱ्यांदा, म्हणजे मटका नसावा…

आता झोपतो, उद्या ऑफिस आहे आणि मांजरही मऊ आहे.

आपला,
~नॅकोबा

*वाचकांस नम्र विनंती, चित्रपटांच्या आवडींबाबत लेखकावर विश्वास ठेवताना खालील बाब जरूर लक्षात घ्यावी :
सदर पोस्टच्या लेखकाने ‘टशन’ हा चित्रपट आपल्याला आवडल्याचे व तो दोनदा आणि तेही थिएटरमधे पाहिला असल्याचे कबूल केले आहे.

पाऊस

अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.

मला नाही !!!

पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत, कदाचित त्या औषधांच्या डोसांपेक्षाही तीव्र… पावसात भिजून वाहणारं नाक आणि त्या पावसाळी पाण्यामुळे वाहणारं पोट या दोन्ही गोष्टींमधे रम्य, सुखद असं काहीच नाही. आणि या आठवणींवर हळुवार फुंकर वगैरे घालून मला शांत कोवळ्या गारव्यात गुरफटून टाकेल अशी कोणी अजून या दिशेने फिरकली नाही. मान्सूनमधे भिजलो तरी वाळवंट काही सरलं नाही.

आता मात्र पावसाचं जरा फारच चाललंय. जूनपासून मागे लागलाय हा, माझा पिच्छाच सोडायला तयार नाही… पुण्यात भेटला जूनमधे… नेहेमीसारखा पडला, थोडा कमीच पडला असेल कदाचित पण तीन महिने मधूनअधून भेटत होता. नंतर त्याला करमेला ऑक्टोबर-नोव्हेंबरमधेही  पुण्यात वाट्टेल तसा पडला. डिसेंबरमधे माझी उडायची वेळ आलेली तेव्हाही पडेल की काय असं वाटत होतं पण हा तसा शांत राहिला. जानेवारीपासून मात्र हा पडतोच आहे इकडे… बर आपल्याकडे बरं असतं. पावसाळा म्हणला की निमूट रेनकोटसकट बाहेर पडायचं नाहीतर भिजायचं. असा सोपा नियम. इकडे पावसाळा गृहीत धरून रेनकोट न्यावा तर सूर्यदेव दिवसभर कार्यभाग सांभाळतात आणि संध्याकाळी बससाठी उभं राहताना दप्तरात ओझं होतं. नेऊ नये म्हणलं तर वाहतं नाक आणि पोट आठवतं. मग काय, निमूटपणे छत्री दप्तरात सरकवतो.

पाऊस चार दिवस बरा वाटतो, चहाचे घोट किंवा गरमागरम मॅगीच्या लडींबरोबर गटागट गिळता येतो. सहा महिने होतील आता, वाट बघतोय हा थांबायची. किती हा माझा स्वार्थीपणा… इकडे कॅलिफोर्निया पावसाबाबत समाधानी आहे. मी अमेरिकेतच कोलंबसमधल्या मित्राला फोन केला होता मधे तेव्हा या पावसाबाबत कुरकूर केली. “साल्या, कॅलिफोर्नियात राहून हवामानाबद्दल तक्रार काय करतोस !! ” ऐकायला मिळालं.

सकाळी उठल्या उठल्या पावसाचा आवाज ऐकला की उठायची जिद्दच निघून जाते. घरीच बसावं वाटतं पण ऑफिसला तर जावंच लागतं… एकूणच मी पावसात जायचं टाळतो. शनिवार-रविवार पाऊस असेल तर फारच बोर होतं. एरवी कसाही संपणारा दिवस अचानक फार कंटाळवाणा आणि मोठा वाटायला लागतो.

आता एकतर हा पाऊस लवकर संपो, किंवा मृद्गंध जागृत करणारी ती हळुवार फुंकर तरी सापडो हीच इच्छा….

आपला,

~नॅकोबा

दिवस घालवला उठारेठी

माझ्या आईची आवडती म्हण आहे, “दिवस घालवला उठारेठी, चांदण्याखाली कापूसवाटी…”. एक आजी सोडली तर आमच्या घरच्या सगळ्यांना ही म्हण व्यवस्थित लागू होते. दिवसा वेळ नसतो असं नाही. वेळ पुष्कळ असतो पण तो नको तिथे वाया जातो किंवा कधीकधी जाणूनबुजून इकडेतिकडे घालवण्यात येतो. मग दिवस संपत आला, की बसतो आम्ही जागत, दिवसाचा बॅकलॉग भरत.

दिवस, विशेषकरून रविवार घालवण्याची सवय (किवा हौस) काही केल्या सुटत नाही. दुपारी पूर्ण वेळ मोकळा असताना मी इकडे एखादा पोस्ट लिहू शकलो असतो. दुपारी काय केलं? काही नाही. जेवण झाल्यानंतर टीव्ही पाहिला, डेक्सटर या अप्रतीम मालिकेचा तिसरा अंक बघायला सुरुवात केली, तेही झाल्यावर इंटरनेटवर आचरटपणा केला, त्याही नंतर प्लेस्टेशन वर मनसोक्त गेम खेळलो, बाहेर उंडारून आलो.

भात लावणं, भाडं भरणं, आणि वेबकॅमवरून माझ्यासोबत बोलण्यास सज्ज मामेभावंडांशी अख्खा दीड-एक तास घरभर बागडत झालेलं बोलणं या मोजक्या गोष्टी सो़डल्या तर दुपारपासूनचा वेळ  अगदीच यांव गेला. आता, झोपण्यापूर्वी बघतोय ऑफिसच्या मेल्स… करतोय कामं… टाकतोय पोस्ट्स्…

चालायचंच, शेवटी आवड आपली आपली !

आपला, (आय टी प्रमाणवेळेनुसार पहाटे झोपी जाण्यास सज्ज)
~नॅकोबा.

हुक्की

आज ब्लॉगपोस्ट करायची मजबूत हुक्की आलीय… हुक्की, साधीसुधी इच्छा नाही तर चक्क हुक्की. एरवी मधून अधून होत असते इच्छा, इथे काहीतरी लिहायची पण या ना त्या कारणानी दुर्लक्ष होतं. आज मात्र या इच्छेचा वेग प्रचंड आहे. काहीतरी खरडल्याशिवाय राहावत नाईये.

लिहायचा विचार डोक्यात आला की वाट्टेल ते लिहिता येईल असं वाटतं पण प्रत्यक्षात कीबोर्ड बडवायला बसलं की विचाराचा पोपट होऊन भुर्रर्र उडून जातो. मांजरं, नुकत्याच पाहिलेल्या अमेरिकन सिरीयल्स, जून पासून मागे लागलेला आणि नोव्हेंबरमधे पुण्यात वैताग आणल्यानंतर इथे कॅलिफोर्नियातही माझा पिच्छा न सोडलेला पाऊस, चावट विचार, गंभीर विचार, सचिन तेंडुलरकचं नुकतंच झालेलं एकमेवाद्वितीय विश्वविक्रमी द्विशतक, परत एकदा मांजरं असे अनेक विचार एकापोठोपाठ येतात आणि एकमेकांशी भांडून तरातरा निघून जातात आणि त्यांनी एकमेकांना दिलेल्या शिव्या डोक्यात तरंगत राहतात. मग “श्या !!!” (ट)  काही लिहिताच येत नाही आपल्याला ब्लॉगवर असं वाटत राहातं. विचारांना पकडून जेरबंद करायचा विचारही कधीकधी येतो पण तोही स्वतःचा स्वार्थ साधून बरोबर आळसाला पुढे करतो. अशी पंचाईत आहे.

पण ऐसा कैसा चलेंगा ना??? इतके दिवस (म्हणजे पुण्यात असताना) बऱ्याच निरर्थक विचारांना तोंडामार्फत बाहेची वाट दाखवल्ये. या ब्लॉगच्या सुरूवातीमागचा उद्देशही हाच होता की मनात येईल ते बरंचसं निरर्थक आणि कधीकधी सार्थ असं इथे मांडावं. आळस आपली टांग मधेमधे घालतो ना…… मग जेव्हा असं उजाडतं तेव्हा ठरवतो आता रोज काहीतरी लिहायचं न विसरता. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

चालायचंच…

चहाची हुक्की फिटल्यानंतर पुढच्या चहाची चिंता करायची नसते.

आपला,

~नॅकोबा

दोन महिने

लवकरच दोन महिने होतील मी अमेरिकेत पोचून. घर, टीव्ही, इंटरनेट असल्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाली. जसं जमेल तसं, कंटाळा आला नसेल तर किंवा लक्षात असेल तर घरी स्वयंपाकाचा प्रयत्न करतो नाहीतर घर ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीशेजारीच चिपोटले आहे त्यामुळे पोटापाण्याची पण फार चिंता नाही. दिनक्रमाचं एकूण गणितही आता सवयीचं झालंय.

एकूणच काय तर बेसिक पक्कं झालंय आता इकडेतिकडे उंडारायला, संगणकीय उचापती करायला हरकत नाही. ब्लॉग वाचणे, इंटरनेट वर नवीन काहीतरी शिकणे, इकडच्या तिकडच्या चार वेबसाईट बघणे वगैरे करायला आता जरा सवड मिळेल. जमल्यास ब्लॉगवर जरा लिहिल्यासारखंही करता येईल.

जमेल तसं..

सध्या तरी कॉमेडी सेंट्रल जिंदाबाद !

 

~नॅकोबा !