वेळ : ३ तास
विषय : सगळे
गुण : १००
सूचना :
१. उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूस लिहावे.
२. प्रश्नाचे गुण समोर कंसात दिले आहेत.
३. उगाच शंभरपेक्षा जास्त गुणांचा पेपर लिहायचा प्रयत्न करू नये. असला आगाऊपणा तपासणं ही जबाबदारी मंडळाची नाही.
४. उत्तरपत्रिका लिहिलाना एकाच रंगाच्या शाईचा वापर करावा. ही परीक्षा आहे, रंगपंचमी नाही.
५. कॉपी करताना पकडले गेल्यास तात्काळ पाच गुण वजा केले जातील.
६. पण वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या उत्तरांशी आढळणाऱ्या साधर्म्यानुसार “संभाषण कौशल्य” या विषयाची श्रेणी ठरवली जाईल.
७. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाने कोणाच्या धार्मिक, सामाजिक अथवा इतर भावना दुखावल्या गेल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
८. टेरीफ प्रमाणे पैसे देणे, कृपया सुट्टे पैसे देणे
आवांतर वाचनावर आधारित असल्याने या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विशेषकरून “चंद्राळली लाट वर गगनाला भिडे” या ओळीवर आधारित असतील.
प्र १ : निबंध लिहा [संपूर्ण लिहिता येत असल्यास कोणताही एक, नाहीतर कितीही लिहा, काय फरक पडतोय ] (१५)
१. मी ढगात गेलो तर
२. गटारी अमावस्या
३. गगन भिडे आणि भारतीय अर्थव्यवस्था
४. भारतातील हत्तींचे कमी होणारे प्रमाण अन् त्याचा शिक्षणावर होणारा परिणाम
६. गाय
प्र २. थोडक्यात उत्तरे लिहा [कोणतेही पाच] (२५)
१. गगन भिडे कोण?
२. तुम्ही गगन भिडे आहात असे समजून वरील वाक्यातील परिस्थितीचे व्यक्तीसापेक्ष वर्णन करा.
३. खरंच, गगन भिडे कोण?????
४. ” चंद्राळली लाट ” काय आहे? काय केल्याने ती उतरते? या क्रियेतील जैविक प्रक्रियेचे वर्णन करा
५. हायड्रोक्लोरिक अॅसिडचा कौटुंबिक मालिकांमधील वापर
६. चंद्र, सूर्य अन् पृथ्वी यांच्यात नव्वद अंशांचा कोन असताना उत्तर ध्रुवावर काय स्थिती असेल याचे वर्णन करा,
प्र ३. निबंध, इंग्रजी [प्र. १ प्रमाणे...] (१५)
क्वेश्चन वन मधले एस्सेज आपल्या डेली लॅंग्वेजमधे लिहा.
प्र ४. टीपा लिहा [कोणत्याही तीन] (१५)
१. एकविसाव्या शतकातल्या कविता अन् त्यांचे कपडे
२. कॉपीपेस्ट
३. गगन भिडेची कारकीर्द
४. चंद्राळल्या लाटेचा इतिहास
५. चंद्राळल्या लाटेचा खरा इतिहास
प्र ५. फरक लिहा (15)
१. चंद्राळली लाट आणि काजूफेणी
२. लुबाडणूक आणि महाविद्यालांचे प्रवेशमूल्य
३. माझं म्हणणं आणि तुमचं म्हणणं.
प्र. ६. उताऱ्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. [15]
“माणसाला थंडीत थंडी वाजते, पण थंडीचा आवाज येत नाही. आवाज काढता येतो. आवाज जरी वेगवेगळ्या ठिकाणी काढता येत असला तरी कानाखालच्या आवाजाला मानवी इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. या आवाजाला भलेभले घाबरतात. आवाजाची तीव्रता काढणाऱ्याच्या शारिरिक क्षमतेवर अवलंबून असते, थोडक्यात आवाज हा शक्तीशी निगडित मानला गेला आहे. किंबहुना म्हणूनच मतदानाच्या प्रकारांत आवाजी मतदान या नावाने एक प्रकार प्रचलित आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रचार अन् विजयानंतरच्या घोषणांमधेही आपल्याला ‘आवाज कोणाचा’ ऐकू येतं. ज्याचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही तो स्वतःला दुर्बल समजतो. शक्तीचे इतर मार्गांनी प्रदर्शन करून तो आपला ‘आवाज’ ‘ वर’ पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो…. ऐकावं ते नवलच !!!”
१. काय कळलं?



