सदर पोष्टीचा राम, म. गांधी किंवा वाळकं गवत यापैकी कशाशीही काहीही संबंघ नाही. असल्यास, त्याला निव्वळ योगायोग मानण्याइतकेही कष्ट घेण्यात येणार नाहीत याची तज्ञांनी, सूज्ञांनी आणि बाकीच्यांनीही दखल घ्यावी.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा. काही दिवसांपूर्वी मनाचे श्लोक वाचत होतो लॅपटॉप वर. बहुतेक त्यानंही मनावर घेतलं असावं. आज सकाळी सकाळी माझा विंडोज लॅपटॉप “राम” म्हणाला. (हे रामही म्हणाला असेल, पण फॅनचा आवाज असतो, परत मनातल्या मनात म्हणला.) हार्ड डिस्कचा काहीतरी किस्सा झाला असावा. असो, मांजर मऊ असेपर्यंत मला फार चिंता करायचं कारण नाही (म्यौ म्यौ म्यौ). कसाबसा एखादा महिना काढून सरळ एलियनवेअर घेता आला तर मज्जाच येईल (एलियनवेअर हा एक लय भारी कॉन्फिगरेशनचा, लय भारी दिसणारा (आणि लय भारी किमतीचा
) संगणक. एलियनवेअरवर गेम खेळणं म्हणजे फुल्टू दंगा !! समस्त गेमरांचं स्वप्न !!! ) एकूण काय, हा शनि-रवि नेहेमीपेक्षा थोडा वेगळा जाणार. कामाचा लॅपटॉप तेवढा शाबूत आहे. कदाचित थोडं कामही करीन कंटाळा आला तर.
तो लॅपटॉप असाच बंद राहिला पुढील काही दिवसांत खालील गोष्टींचं प्रमाण वाढेल.
१. इथे खरडणं (मी आणि माझे कंस)
२. नेटफ्लिक्स वर सिनेमे आणि वेगवेगळ्या सीरीयल्स बघणं.(मी आणि माझा दूरदर्शनसंच)
३. घरच्याघरी स्वयंपाक (मी आणि माझं उदरभरण)
४. “एकांत” गाठणं. (मी आणि माझं टमरेल) (माझाच स्वयंपाक… दुसरं काय होणार…)
५. कधीही दारू न पिणं (मी आणि माझा (माझे) चहा) (व्यसनेशु वगैरे काहीतरी)
६. मित्रांना फोन करणं (मी आणि माझे मित्र)
७. बाकी फारसं सांगण्यासारखं नाही (खरं तर “सांगण्यासारखं” वापरायची गरज नव्हती, तरी आपलं… )
या गोष्टी वाढण्याचं कारण असं की गेले काही दिवस मोठ्या आनंदानं खेळत असलेला वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट या लॅपटपासोबत बंद झालाय. खेळायला बाकी काहीच नाही असं नाही पण वेळकाढूपणा वॉरक्राफ्टनं सर्वाधिक साधता येतो.
बाकी काही झालं तरी पुढच्या शनिवारपर्यंत तरी लॅपटॉपची काहीतरी सोय पाहिली पाहिजे. हा लॅपटॉप दुरुस्त झाला तर उत्तमच पण अमेरिकेत माणसाला अव्वाच्या सव्वा किंमत असते. लॅपटॉप बघण्याचेही काहीच्याकाही बांबू लागतील. पुण्यात असतो तर एव्हाना कर्वेनगरातच माझ्या फेवरेट हार्डवेअरतज्ञाकडे लॅपटॉप सोडून पुढच्याच गल्लीत मामाकडे जाऊन आलो असतो. या लॅपटॉपवरून स्काईप वापरायला बरं वाटतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि उपयुक्ततेचे सत्राशेसाठ दाखले देत देत आईकडून प्रेमानं मिळवलेला लॅपटॉप आहे तो. जुन्या ऑफिसचा बोका त्याच्या कीबोर्डावर बागडलाय. माझा पीजीडीसीएचा प्रजेक्ट रिपोर्ट त्यावर घडलाय. सबमिशनच्या आदल्या रात्री आठ-साडेआठच्या सुमारास इंडसर्चमधे त्यानंच आम्हा मित्रांच्या प्रोजेक्ट सीड्या छापल्यात.
असो, मी आता २४ च्या पुढच्या एपिसोडकडे वळतो.
ऑपलॉ,
नॅकोबा !
अमेरिकेत माणसाला अव्वाच्या सव्वा किंमत असते…true very true….