विचार : सुचणारे, सुटणारे आणि सुजणारे

विचार.
नक्की काय असतं माहीत नाही. फक्त ते डोक्यात करता येतात किंवा आपोआप येतात. काय, कसे वगैरेवर आजून फार विचार केला नाहिये. तसला विचार आज करून बघायला हरकत नाही. विचारांबद्दल तसा बऱ्याच अनुषंगानं विचार करता येईल. विचार कसे सुचतात हे मला नक्की माहीत नाही. ते बऱ्याच घटकांवर अवलंबून असतात (असावेत). परिस्थिती, आठवणी, अनुभव ( अनुभव म्हणजे आठवणींवर केलेला आणि लक्षात ठेवलेला विचार का हो ? ), संस्कार ( हे बहुदा विचारांचं गाळणं असावं. विकृतीला कृतीपासून दूर ठेवणारं ) वगैरे त्यातले काही प्राथमिक घटक (असावेत… , एक काम करा नं… प्रत्येक वाक्यानंतर असा एखादा संदिग्धतादर्शक जोडून घ्या. त्याचं काय आहे, विचार, मन वगैरे गोष्टींबाबत मज पामरास अधिकारवाणी नाही. केवळ एक प्रयत्न आहे. मन, विचार म्हणजे काय ते समजून घेण्याचा एक स्वाध्याय (होतं, असंही होतं कधीकधी…) ).

सुचलेले विचार : हे बहुदा एखाद्या प्रक्रियेचा भाग असतात यांना ठराविक दिशा असते. एखाद्या प्रश्नाची, कोड्याची उकल करताना हे उत्तर किंवा उत्तराप्रत पोहोचण्याची पायरी म्हणून समोर येतात. त्या मानाने हे शांत असतात. यांच्यास संदिग्धता नसते, असलीच तरी ती पुढच्या निःसंदिग्धतेकडे प्रवास करणारी असते. “पेट्रोल कमी आहे, उशीरही झालाय, पंपावर जावं की निमूट घरी जावं” या प्रकारचे.

सुटलेले विचार : हेही सुचतातच, पण एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे. कलिंगड किंवा काकडीला जसं पाणी सुटतं ना तसे हे मनाला किंवा इतर विचारांना सुटतात. मूळ विचारांना फाट्यांसारखे फुटतात आणि झरझर पसरत जातात. वेळीच थांबवली नाही तर ही वेल मूळ विषयाला गुरफटून टाकते. सैतानाच्या कार्यशाळेचं ( डेविल्स वर्कशॉप ) हे पहिलं उत्पादन. उत्तराकडे नेण्यापेक्षा हे पर्याय निर्माण करणारे आणि पर्यायाने गोंधळात टाकणारे असतात.  या बायप्रॉडक्ट्सना गाळून घ्यायची गरज असते. वरचंच उदाहरण,

पेट्रोल संपलंय, उशीरही झालाय , पंपावर जावं की निमूट घरी जावं.
पंपावर गेलो तर येता येता पक्यालाही भेटता येईल, कॅफेवर पडीक असतो तो या वेळी.
मॅक-डी पण जवळच आहे, फोन टाकून तिकडेच भेटावं. फोन करून घरीही तसं कळवावं. म्हणजे वाट बघणार नाहीत.
शुक्रवार आहे, आज उशीच झालेलं चालतं. काय रोजरोज थोडीच बाहेर जातो…

दाबेलीची गाडी पाहिल्यावर होणारी तीव्र इच्छा, चहाची तल्लफ, खरेदीची मधूनच येणारी हुक्की वगैरे आणखी काही उदाहरणं. डेडलाईनचं टेंशन, होमवर्क न झाल्यानं मारावीशी वाटणारी बुट्टी, परिक्षेच्या आधी पोटात येणारा गोळा हे सगळे सुटलेले विचार. हे हवे असतातच असं नाही पण येतात. थोड्याफार प्रयत्नांनी त्यांना दूर ढकलता येतं.

सुजणारे विचार :  हा प्रकार फार तीव्र आणि गंभीर… हे सुटलेल्या विचारांसारखेच येतात फक्त यांचा वेग आणि तीव्रता प्रचंड असते. आणि हे आले तरी आपण यांच्याबाबत काही करू शकत नाही. आपण त्यांना थांबवूही शकत नाही किंवा ते कृतीतही आणू शकत नाही. त्यामुळे एक अपरिहार्यता आपसूकच येते यांच्याबरोबर. आणि काही तीव्र भावना. राग, द्वेश, निराशा, दुःख अशा टोकाच्या भावना. मुकामार लागल्यावर तो भाग जसा सुजतो आणि ठसठसत राहतो तसे हे विचार ही खदखदत राहतात, बराच काळ. एक ठळक वेदना मनात उमटत राहते. बाकी कोणताही विचार करावासा वाटत नाही, जागाच नसते बहुदा मनात…

उदाहरणं ? तुम्हाला सापडलीच असतील एव्हाना.

मुद्दाम सांगत नाही. त्या विचारांच्या आठवणीही ती सूज परत आणू शकतात.

2 thoughts on “विचार : सुचणारे, सुटणारे आणि सुजणारे

  1. अवनी : :) धन्यवाद. आणि हो, चष्टगोचा पुढचा भागही येईलच आता या आठवड्याच :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>