असंच आपलं उगाच जरा म्याव करावंसं वाटलं. ब्लॉगवर बरेच दिवस शुकशुकाट होता. आठवडाभर काम जरा जास्त झालं की शनिवार रविवारची वामकुक्षी जरा जास्तच लांबते (अन् लवकरही सुरू होते ) आणि तिची ग्लानी तासन् तास तशीच टवटवीत राहते.असो.सध्या कामातून वेळ मिळाला तर ब्लॉगसाठी विचार करत न बसता ( एरवी मी विचार करून टंकतो असं नाही, तरीही ) सरळ स्टारक्राफ्ट-२ खेळत असतो. ऑनलाईन, मल्टिप्लेअर.
बरेच महिन्यांनी, बहुतेक अख्ख्या वर्षानंतर एक रिअलटाईम स्ट्रॅटेजी गेम मल्टिप्लेअर खेळताना मस्तं वाटतं. त्यात हा स्टारक्राफ्ट. ब्लिझार्ड एंटरटेनमंटची निर्मिती.ब्लिझार्डचे गेम्स “बाप” असतात. वॉरक्राफ्ट, स्टारक्राफ्ट अन् डिआब्लो या तीन गेम्सच्या नावांपलिकडे ब्लिझार्डचं काहीच नाही पण या तीनही नावांमागे लाखो चाहत्यांची फौज आहे. या गेम्सच्या पहिल्या आवृत्त्या येऊन अक्षरशः तप लोटलं तरीही यांच्या नवीन आवृत्त्यांबद्दल आजही पराकोटीची उत्सुकता चाहत्यांत दाटून आहे. फार लांब कशाला जा, खुद्द मीदेखील डियाब्लोचा टीशर्ट घालून त्याच्या तिसऱ्या आवृत्तीकडे डोळे लावून बसलोय.

मुद्दामच जरा हाललेला फोटो टाकलाय, मधे अख्खा फोटो फेसबुकावर लावला तर गेमरेतर लोकांना मुद्द्याचं सोडून फक्त वाढलेली जाडी दिसली...
आज इतकंच. आता मी दिवे मालवून मेणबत्त्यांच्या मिणमिण प्रकाशात रॉक ऐकत निवांत बसणार. कोक पीत. (ढेकर)
गुडनाईट !