आय कॅन हॅझ चीझबर्गर डॉट्ट कॉम नावाची एक लॉलकॅट या संकल्पनेला पूर्णपणे झोकून दिलेली प्रचंड लोकप्रिय वेबसाईट . मार्जारप्रेमी या नात्यानं माझं या वेबसाईटवर वरचेवर फिरकणं होतं. तिथे मांजरांचे मऊ आणि विनोदी फोटो तितक्याच दंबतशीर आणि बालिश मथळ्यांसह बघायला मिळतात.

लॉलकॅट
लॉलकॅट आणि लॉलडॉग या प्रकारांवर लिहिलेली एक पोष्ट काही दिवसांपूर्वीच वाचनात आली. तिचा हा दुवा http://rbk137.blogspot.com/2010/04/blog-post.html. लॉलकॅटचे बरेच तपशील तेथे कळतील.
या लॉलकॅटभोवती काही फिलॉसॉफीजही आहेत (असला शब्द वापरायची फार वेळ येत नाही, त्यामुळे मराठी प्रतिशब्द माहीत असेलही, पण आठवत नाहीये… तत्वज्ञान का?) बेसमेंट कॅट म्हणजे तळघरातील मांजर. काळं कुळकुळीत, शक्यतो हिरवट डोळ्यांचं हॉरर चित्रपटांत वापरतात तसं. गुब्बु गुब्बु. हे म्हणजे शैतानी किंवा दानवी प्रतीक. किंवा सीलिंग कॅट म्हणजे पांढरंशुभ्र, निळ्यानिळ्या डोळ्यांचं मऊशार मांजर, छतावरून खाली बघणारं. थोडक्यात देवाचं माऊ. (काळ्या मुंग्या कश्या देवाच्या अन् लाल मुंग्या राक्षसाच्या…. त्यातलाच हा प्रकार… (काळ्या मुंग्यांवर पाय देऊ नये अशी प्रदीर्घ चर्चा आम्ही मित्रांनी प्राथमिक शाळेत केल्याचं मला पक्क आठवतंय. ) (मांजरही मारू नये. सोन्याचं मांजर दान वगैरे करावं लागतं. मांजर न मारता सोन्याचं मांजर करून घेता येतं का, किंवा तसं केलेलं चालतं का हे मला माहीत करून घ्यायचंय. शक्य असल्यास पुढेमागे तो प्रकार करायची अत्यंत प्रबळ इच्छा आहे. तेवढीच बचत.) ( उगाच शंका… पाठमोऱ्या मांजराच्या आकाराचे, फक्त नाजूक गोंडस आऊटलाईन, असलेले इयरिंग्ज कसे दिसतील ? ) (मी अजून एकटाच कसा ??) )
असो.
तर या मार्जार तत्वज्ञानात एक मोनोरेल कॅट नावाचाही प्रकार असतो. अशी दिसते मोनोरेल. एकाच रूळावर धावणारी गाडी. (‘एकच रूळ’चे तपशील नाई बाबा करता येत एक्सप्लेन)

मोनोरेल
आणि असं दिसतं मोनोरेल माऊ

मोनोरेल-माऊ
अरूंद पृष्ठभागावर आळशीपणे पसरलेलं लडदू मांजर, केवळ मोनोरेलशी दिसायला साधर्म्य म्हणून हे मोनोरेल माऊ. प्रचंड गोंडस.
आज साईटवर फिरकलो अन् डावीकडे बघतो तर काय ! मोनोरेल माऊचा टी शर्ट !!!!!
त्यात मी इंपल्सिव बायर. ( बी कॉमची तीन आणि अकरावी, बारावी अशी कॉमर्सची एकूण पाच वर्षं… त्यातून मला महत्वाचं एवढंच कळलं की मी इंपल्सिव बायर प्रकारचा ग्राहक आहे. (तरी बरं… बीकॉम बहिःस्थ केलं…, नाहीतर एवढंही कळलं असतं की नाही, देव जाणे…)) लग्गेच बायरगिरी करून शर्ट घेऊन टाकला (दोन आठवड्यांपूर्वी एका दुकानात एक फुल्टू झपॅक बर्मूडा दिसली होती… केशरीतून सुरू होऊन गुडघ्याशी पिवळ्यात संपणारी, तीवर सूर्यास्ताचा देखावा. झाडांचं आणि झावळ्यांचं विग्नेट्ट ! पोष्ट लिहितेवेळी परिधान केलेल्या वस्त्रांपैकी ती एक… ) आता या शर्टाची वाट बघतोय…

मोनोरेल माऊ शर्ट
आपला,
नॅकोबा.
चित्र सौजन्य – गूगल इमेज सर्च, आयकॅनहॅझचीझबर्गर, लॉलमार्ट
Oho nice one…mii want
मस्त! याखेरीज लोलक्याटमध्ये इनव्हिजिबल सिरीजही छान आहे.
शिवाय इटे, बिटे, किटे कमिटी :ड
या साइटवर माझे बरेच आयुष्य जाणार आहे असे वाटते.