मटका – हा मूळचा जुगारी शब्द असावा. मी कॉलेजची जवळजवळ सहा वर्षं सायबर कॅफेत गेम्स खेळत काढल्येत त्यामुळे माझ्या वापरातील मटक्याचा अर्थ “उगाच काहीतरी करायचं म्हणून करता करता घडलेली अशक्य भारी गोष्ट” असा होतो. काउंटर स्ट्राईक सारख्या गेम्स मधे याचा वरचेवर प्रत्यय येतो. खेळात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्याने नवख्याने नेमका मोक्याचा, अनुभवी मोहरा टिपला की चार पाच शिव्यांमागून “साल्या मटक्या” हमखास ऐकायला मिळते.
असे हे मटके कधीकधी रोजच्या आयुष्यातही घडतात. एखादी गोष्ट करताना “काय मेली कटकट” किंवा “करून मोकळं व्हावं” या भावनेने काहीतरी करायला जातो आणि नेमकी तीच गोष्ट वाहवा मिळवून जाते. आणि मग आपण “अत्ता नक्की काय घडलं” या गहन प्रश्नात बुडून जातो. आज असंच काहीतरी घडलं.
आम्ही आठवड्याच्या आठवड्याला काय काम केलं याचा वीकली स्टेटस रिपोर्ट पाठवतो. प्रत्येक चेकइन, प्रत्येक बग फिक्स आणि मीटिंग्जमधे तेच तेच डिस्कस केल्यानं शुक्रवारी किंवा वीकेंडदरम्यान पुन्हा त्या सर्व गोष्टींची यादी करून पाठवणं नको होतं आणि केवळ नियम म्हणून पाळलं जातं. आज रविवार संपत आला बघून मी नेहेमीच्या सवयीने माझ्या चेक इन्स चे मेल्स काढले आणि त्यातल्या कॉमेंट्स कॉपी पेस्ट करून यादी केली, सध्या करत असलेल्या टास्कचा क्रमांक आणि शीर्षक कॉपी करून ते काम यादीत टाकलं, बग डेटाबेस मधून चार-पाच कामं कॉपी करून पुढच्या आठवड्यातल्या कामांची यादी टाकली आणि गूगल कॅलेंडरवरून मागच्या आठवड्यातल्या सगळ्या मीटिंग्जची यादी पेस्ट केली. दर आठवड्याला मी हेच करत आलोय, आज जरा एक-एक ओळ जास्त लिहिली इतकंच. त्या ओळीनं काय जादू केली देव जाणे पण रिपोर्टच्या तासाभरातच डेव्ह लीड चा सर्वांना उद्देशून रिप्लाय आला की स्टेटस रिपोर्ट्स मधून आम्हाला नेमकं हेच अपेक्षित असतं. या असल्या प्रकारालाच गेमर टर्मिनॉलॉजीत मटका म्हणतात. रिप्लाय वाचून छान वाटलं. आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक रिपोर्टमधे हा एका ओळीचा वाढीव तपशील लिहिणार. नाईलाज आहे, कन्सिस्टन्सी टिकवली पाहिजे.
अशीच गंमत एकदा माझ्या एका सहकाऱ्याच्या बाबतीत घडली होती. आमच्या दोन टीम्स ना एक दिवस अचानक “एच आर्” टास्क म्हणून गेल्या आठ महिन्यांमधल्या कामांचा एक रिपोर्ट करायला सांगितला. तेव्हा मी आणि माझ्याबरोबरचे जवळजवळ सर्व सहकारी नवीन होतो आणि तेव्हा स्टेटस रिपोर्ट लिहिणे हा प्रकारही नव्हता. रोजच्यारोज स्काईप क़ॉल्सवरून प्रगतीचा आढावा घेतला जायचा त्यामुळे कोणालाच त्या प्रोसेसची गरज भासली नाही. कामं वेगानं आणि चोख पुढे सरकत होती त्यामुळे सर्व काही अलबेल होतं. आता अचानक आठ महिन्यांचं काम आणि त्यात वेळही कमी. आम्ही काहीबाही लिहून दिलं. लवकरच कळलं की दुसऱ्या टीममधल्या एकाचा रिपोर्ट आदर्श झालाय. मी कुतूहलानं त्याला विचारायला गेलो तर खांदे उडवून तो म्हणाला “मलाही नक्की माहित नाही मी काय केलं, पाठवलं एवढं नक्की पण त्यातलं नक्की काय आवडलं हे मलाही रहस्यच आहे.”
आपला,
नॅकोबा !
हा हा! बरोबर, यालाच म्हणतात मटका!!