भविष्यकाळचा इतिहास, मानव, क्लोनिंग, यंत्रमानव आणि सचिन

आज एक बातमी वाचली की सचिनवर एक पुस्तक बनतंय, या पुस्तकात एक कागद आहे, सचिनच्या सहीचा… तो कागद बनवताना त्याच्या लगद्यात सचिनचं रक्त मिसळलं जाणार आहे आणि अशा प्रकारे बनवल्या गेलेल्या पुस्तकांची किंमत कैच्याकै असणार आहे.

त्यावरून सुचलेली ही गोष्ट

२०१२ पॉल द ऑक्टोपसची भविष्यवाणी : भविष्यकाळचे मानव इतिहासाच्या पानांतून आपल्या देवाला साकडं घालतील. यंत्रमानवांच्या जाचक साम्राज्यातून मानवाला मुक्त करण्यास हे सचिन पुन्हा एकदा बॅट तळपतील. (फिफा वर्ल्डकप नंतर वर्षभरात हा बोलायलाही शिकला होता)

वर्ष २२९५….

खरंतर जग २०१२ सालीच संपणार होतं. मानवानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटच्या वर्षात अतिषय प्रगत यंत्रमानव निर्माण केले जे समुद्रतळाशी स्थित पाणबुडीत निद्रिस्त मानवांची काळजी घेउ शकतील अन् भूपृष्ठावरचं वातावरण पुन्हा एकदा वसाहतयोग्य झालं की त्यांना पुन्हा जागं करतील.

पण निसर्गानं महापोपट केला… आणि यंत्रमानवानं मानवाचा बकरा बनवला. मानवाच्या मूर्ख वागणुकीस कंटाळून यंत्रमानवांनी कारभाराची सगळी सूत्रे ताब्यात घेतली.

उरल्यासुरल्या मानवांनी पुण्यात आसरा घेतला. वाहतूकव्यवस्था पाहूनच यंत्रमानव पुण्यात यायला टरकत.

पुणे स्थित या मानवांनी क्लोनिंगचं तंत्र पूर्णपणे आत्मसात केलं होतं. यंत्रमानवांपासून महत्प्रयासानं वाचवलेल्या इतिहासात सचिनचं रक्त असलेली ही पाने होती. मानवांनी ठरवलं की सचिनचे क्लोन तयार करायचे आणि यंत्रमानवांना क्रिकेट मॅचसाठी च्यॅलेंज करायचं.

आमिर खानच्या क्लोनला बोलणी करायला पाठवलं.

“तीन गुना लग्गान…” आमिरचा क्लोन…
“मामू, ये कौनसा डायलॉग मारा? अपनेको तो राईटवाला टॅटू पढना था..” अर्षद वारसीचा क्लोन (रक्तरंजित पानांचं २०११-१२ मधे मजबूत पेव फुटलं होतं… काय करणार… )
“सगळा संवाद हिंदीत? तेही पुण्यात!! अरेरे, काय ही मराठीची अवस्था !!” … एक मराठी माणूस
“इन्सर्ट कॉईन टू स्टार्ट द गेम”… यंत्रमानव
“सुट्टी नाणी मागू नयेत, मिळणार नाहीत”… एक पुणेरी पाटी

दहा सचिन आणि एक सिद्धू अशी टीम तयार झाली. हो, ओरिजनल सिद्धू अजूनही तसाच होता. कारण लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, हसण्यानं आयुष्य वाढतं.

दहा सचिनपैकी एक सचिन परत क्लोन करावा लागला. कोण्या नतद्रष्टानं नेमक्या त्याच पानावर डास मारला होता. काय हा निष्काळजीपणा… असो.

मी क्रिकेट फार फॉलो करत नाही. मला कालच्या मॅचचे तपशील नाहीत नसतात २२९५ च्या मॅचबद्दल न बोललेलंच बरं. एवढं मात्र नक्की की दहाही देवांनी अफलातून खेळी केली अन् मानवांनी मॅच जिंकली…

यंत्रमानवात टाकलेलं नाणं २०१२ सालचं एक रूपयाचं होतं. त्याच्या ऐतिहासिक मूल्याच्या तिप्पट रक्कमेचं गणित करताना यंत्रमानव ओव्हरलोड झाले अन् पृथ्वीवर प्रदूषण पसरवण्याल मानव पुन्हा एकदा मोकळा झाला.

11 thoughts on “भविष्यकाळचा इतिहास, मानव, क्लोनिंग, यंत्रमानव आणि सचिन

  1. काय पण होऊ शकेल बाबा. सचिन या गोष्टीला कसा तयार झाला या प्रश्नावरसुद्धा मी हेच उत्तर देते. पुढे मनातल्या मनातच एक सुस्कारा टाकते.

  2. >>उरल्यासुरल्या मानवांनी पुण्यात आसरा घेतला. वाहतूकव्यवस्था पाहूनच यंत्रमानव पुण्यात यायला टरकत.
    एकदम जबरी.. लोळालोळी…

  3. हे वाचल्यावर मला सचिनच्या बातमीचं काहीच वाटेना! :D

    “फिफा वर्ल्डकप नंतर वर्षभरात हा बोलायलाही शिकला होता”

    “पण निसर्गानं महापोपट केला… आणि यंत्रमानवानं मानवाचा बकरा बनवला. ”

    “उरल्यासुरल्या मानवांनी पुण्यात आसरा घेतला. वाहतूकव्यवस्था पाहूनच यंत्रमानव पुण्यात यायला टरकत.”

    “तीन गुना लग्गान………ते………… एक पुणेरी पाटी”

    यातल्या प्रत्येक लायनीला टाळ्या….हशा…..शिट्टया (ज्यांना येतात त्यांनी वाजवा!) नाही येत त्याने जमिनीवर लोळा!!
    अफलातून पोष्ट…..!!!

  4. @कांचन ताई, >>>सचिन या गोष्टीला कसा तयार झाला
    खरंच आश्चर्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>