आज उगाचच जरा आवडत्या चित्रपटांबद्दल लिहावसं वाटलं म्हणून ही पोस्ट. सध्या नेटफ्लिक्स वर बरेच इंग्रजी चित्रपट बघणं चाललंय पण बऱ्याच दिवसात हिंदी चित्रपट पाहिला नाही.पुण्यात सिटीप्राईड कोथरूड घरापासून अगदीच पाच मिनिटांवर असल्यानं महिन्यातून किमान दोन तरी चित्रपट पाहून व्हायचे. गेल्या महिन्यात “रण” पाहिला, आवडला. रोड, मूवी पाहायची फार इच्छा आहे पण कोण जाणे का, डाऊनलोड करावासा वाटत नाहीये.
सध्याच्या एकूण नायिकांपैकी मला नक्की कोण आवडतं हे माझं मलाच नक्की माहित नाही. बहुदा कोणीच नाही. पण नायकांबद्दल मात्र माझी काही सिलेक्शन्स आहेत. खानावळीपैकी एक आमिर खान सोडला तर बाकी कोणात फारसा अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आमिरने स्वतःची हवा निर्माण केलीय आणि ती टिकवून ठेवलीय. हल्ली तो जे काय करतो त्याबद्दल एक उत्सुकता असते आणि वर्षातून एकदा जे काही बघायला मिळतं ते वसूल असतं.
अभय देओलचे चित्रपट मला आवडतात. काहीतरी वेगळं बघितल्यासारखं वाटतं. बाकी कोणी काहीही म्हणो, देव-डी मला मनापासून आवडला. श्रेयस आणि रितेशला काही चांगल्या भूमिकांमधे बघूनही बरं वाटतं. राहुल बोसही मधूनअधून एखाद्या हट के सिनेमात दिसतो. झंकार बीट्स हा मला आवडत्या चित्रपटांपैकी एक. रॉक ऑन आवडला खरा पण तो बघताना नकळत कुठेतरी झंकार बीट्स ची छबी उमटत होती. रॉक ऑन मधली गाणी पण आवडली पण खऱ्या अर्थानं हिंदी रॉक म्हणाल तर देव-डी मधलं इमोशनल अत्याचार – रॉक वर्जन जिंकून जातं. देव-डी मधली इतर गाणी (इमोशनल अत्याचार – ब्रास बॅंड, परदेसी, नयन तरसे, दुनिया) हीसुद्धा सिनेमात मिसळून जातात.
राहुल बोस, के के मेनन, रणवीर शौरी, विनय पाठक, रजत कपूर वगैरे मंडळी असली की सिनेमा बघावासा वाटतो. शौर्य, खोसला का घोसला, भेजा फ्राय हे सिनेमे यांच्यामुळे लक्षात राहतात.
रोड, मूवी पहायची इच्छा पोस्ट लिहिता लिहिता वाढत चालल्ये. काहीतरी सोय केलीच पाहिजे.
आपला
~नॅकोबा