चित्रपटगृह

आज बऱ्याच दिवसांनी चित्रपट बघायला गेलो होतो. डेट नाईट. छान विनोदी चित्रपट आहे, हलकाफुलका. संसारात बुडालेलं एक जोडपं दोघांचीच अशी एक संध्याकाळ साजरी करायला एका संध्याकाळी बाहेर पडतं, दुसऱ्याच्या नावानं असलेल्या रिझर्वेशनवर टेबल मिळवतं, त्या नावामुळेच संकटात सापडतं आणि एकापाठोपाठ एक धमाल प्रसंगातून जात जात सहीसलामत बाहेरही पडतं. किमान एकदातरी बघावा असा चित्रपट नक्कीच आहे. बरेच दिवस पहायचा असं मनात होतं, आज पाहिला, बरं वाटलं.

जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. गेले बरेच वीकेंड काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं उगाच. आज जरा मूळ पदावर आल्यासारखं वाटलं. मला चित्रपटगृहांची हवा आवडते. तो पॉपकॉर्नचा मंद, गरम दरवळ, थोडी गर्दी, अंघारातल्या खुर्च्या, त्यांच्यावरून दिसणारी डोकी आणि त्या डोक्यांना काही तास गुंगवून ठेवणारा प्रकाशाचा कल्पक खेळ.

पुण्यात असताना सिटीप्राईड कोथरूड अगदी चालत पाच मिनिटांवर होतं. आईच्या मते माझ्यासाठीच बांधलंय जणू… महिन्यातून किमान दोनदा तरी जायचो. कधी कधी आठवड्यात दोनदा ही व्हायचं. चित्रपट पहायला कंपनी असलीच पाहिजे हा नियम गौण आहे. (इतका, की मला जर बायकोही अशीच मिळाली तर आम्ही एखाद्या चित्रपटाला एकत्र जाऊन एकाच खेळाची दोन लांबलांबची तिकिटं काढू की काय अशी भिती वाटते…) भयपटाला मात्र एकटा जात नाही. गटानं पाहिला तरी भयपटानंतर दोनचार दिवस दिवे चालू ठेवून झोपतो… गंभीर किंवा वेगळे विषय असणाऱ्या चित्रपटांना मात्र शक्यतो एकटं जाणं पसंद करतो कारण शेजारचा उगाच मधे काही बोलला बेक्कार चिडचिड होते. कधीकधी तर शुक्रवारी रात्री नऊला अचानक ठरवून साडेनऊच्या शो ला बसलो आहे. लास्ट शो सुद्धा बरेच पाहिलेत. आणि त्यानंतर करिश्मा – कर्वे पुतळा – वनदेवी अशी एक चक्कर. रात्री नेहेमीचे रस्तेही वेगळेच वाटतात. नंतर लिहीन कधीतरी त्याबद्दल आजचा दिवस चित्रपटगृहांचा.

लहान असताना आई-बाबांबरोबर अलका आणि विजय मधे बरेच चित्रपट पाहिलेत. विशेषकरून मराठी आणि इंग्रजी. आईबाबांबरोबर आवर्जून पाहिलेला आणि मला आठवणारे हिंदी चित्रपट म्हणजे हम हे राही प्यार के किंवा येस बॉस किंवा शाहरूख, आमिर किंवा जुही असलेले आणखी एकदोन. इंग्रजी चित्रपटच जास्त आठवतात. द माक्स, होम अलोन, रिची रिच, युनिवर्सल सोल्जर्स वगैरे. या दोन चित्रपटगृहांबद्दल जरा विशेष लगाव. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात त्यांची सध्याची अवस्था बघून वाईट वाटतं पण अंतर, आराम आणि आळस लक्षात घेता पावलं (आणि बुड) सिटिप्राईड कोथरूडकडेच वळतात.

माफी. वळायची. आता सिटीप्राईड तितकंसं जवळ नाही. इकडे येण्याआधी दोन दिवस माझ्या मामेभावाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून तिकडे रॉकेट सिंग पाहून घेतला भावंडांबरोबर. एका दगडात दोन पक्षी. माणसाचा जीवपण साला कुठेही रमतो… ठिकाणं, रस्तेही जिवाभावाचे होतात. बाहेर पडल्यावर नेहेमीची कर्वेरोड चक्कर केली. घरी पोहोचलो तेव्हा गदगदलो होतो. आपण जागेशी कसे बांधले जातो याचाच विचार करत होतो. पोटात मोठ्ठा गोळा आला होता. मन सगळ्या जागा तिकडे साठवू बघत होतं जणू…

सध्या जिथे राहतो तिथून जवळच एक चित्रपटगृह आहे. अगदी ताजेतवाने गरम चित्रपट नसतात तिथे पण आजवर जी नावं पाहिली ती सगळी चांगली होती. मला आवडतात तशी वेगळ्या, विनोदी किंवा गंभीर प्रकारात मोडणारी. आजवर तरी नावंच पाहिल्येत. आत जायची इच्छा मात्र टाळल्ये. सवय होईल या भितीमुळे असेल कदाचित. नाहीतर आळस आहेच कारण म्हणून. (गंमत आहे. एखादी गोष्ट करावीशी न वाटण्यात ‘आळस’ फार उत्साहानं पुढाकार घेतो. )

असो. जाईन आता कधीतरी.

पुढच्या महिन्यात आयर्न मॅन – २ येतोय. रसेल क्रो (ग्लॅडिएटर) रॉबिन हूड म्हणून येतोय. आणि गेमचं नाव जसंच्या तसं धारण करून प्रिन्स ऑफ पर्शिया : सॅण्डस ऑफ टाईम सुद्धा येऊ घातलाय. रॉबिन हूड वगळता बाकी दोन्ही कावळा तंगवू शकणारे आहेत. त्यामुळे पाहिलेच पाहिजेत !

आपला
~नॅकोबा

7 thoughts on “चित्रपटगृह

  1. खुप सुंदर लिहिले आहे, नांदेडच्या सिंगल सिनेमा हॉल्सची आठवण झाली..

    “मला चित्रपटगृहांची हवा आवडते. तो पॉपकॉर्नचा मंद, गरम दरवळ, थोडी गर्दी, अंघारातल्या खुर्च्या, त्यांच्यावरून दिसणारी डोकी आणि त्या डोक्यांना काही तास गुंगवून ठेवणारा प्रकाशाचा कल्पक खेळ.”

    ह्या ओळी अत्यंत आवडल्या.. आणि शंभर टक्के सत्य माझ्यासाठी सुद्धा….

  2. मस्तच लिहिलंयस.. १०१% सहमत. थेटराची मज्जा घरी नाय बा. !!

    >>”रॉबिन हूड वगळता बाकी दोन्ही कावळा तंगवू शकणारे आहेत. त्यामुळे पाहिलेच पाहिजेत !”

    “कावळा तंगवू शकणारे” हे जबरा आवडलं.

  3. मोठा पडदा, तो मोठा पडदा. घरात कितीही चित्रपट पाहिले तरी मोठ्या पडद्याचं मला कायम आकर्षण वाटत आलं आहे. फक्त लोकं तिकिटं हातात असूनसुद्धा चित्रपट सुरू झाल्यावर दहा मिनिटांनी का थिएटरमधे येतात, हे मला समजलेलं नाही. मलाही हल्लीच घराजवळ प्लाझा मिळालं आहे, त्यामुळे मराठी सिनेमा म्हटलं की तिकडे जाणं होतंच.

    **आपलं विजेट मोगरा फुलला येथे जोडलं आहे.

  4. कांचन क. ब्लॉगवर तुमची पोस्ट बघून भारी भारी वाटलं :D :D :D कॉमेंटबद्दल आणि विडेटबद्दल धन्यवाद,
    बाही लोकं तिकिटं हातात असूनसुद्धा चित्रपट सुरू झाल्यावर दहा मिनिटांनी का थिएटरमधे येतात, हे मलाही समजलेलं नाही. येतात बुवा पण. अंधाराला घाबरत असतील कदाचित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>