आज चक्क जरा आवराआवरी करायचा मूड आला. म्हणलं चहाची रिकामी खोकी चहाच्या कप्प्यातून काढून इतर रिकाम्या खोक्यांबरोबर ठेवावी. गेल्या इन मीन आठ महिन्यांत मोठ्या आनंदानं घशाखाली घातलेल्या चहाकडे बघताना मन अगदी भरून आलं. आहा ! काय ती चव !!! अमृताशीही पैज जिंकेल अशी एक माझी मराठी अन् दुसरा हा चहा !!!
इंग्लिश ब्रेकफास्ट त्यातल्यात्यात आपल्या नियमित चहाजवळ जाणारा. बाकी “चाय” म्हणून जो काय प्रकार असतो तो नुसताच मसाला चहा. काहीतरीच… मसाला चहा म्हणजे काही “चाय” नाही. चाय ला त्या विशिष्ट पेल्याशिवाय, माशांबरोबरच वातावरणात घोंगावणाऱ्या वटाटावड्यांच्या वासाशिवाय अन् फुंकर मारताच येणाऱ्या पातळ सायीशिवाय अगदीच मजा नाही. खरं तर उकळलेल्या पाण्यात पिशवी बुडवून “चहा” ची “ती” चव मिळवणं केवळ अशक्यच.
चहाची चव येते तीच मुळात दुसऱ्या उकळीनंतर. सध्या “त्या” चहाला मुकतोय, वेगवेगळ्या चवी अन् प्रकारांवर समाधान मानतोय. या वीकांतात एक पातेलं आणावं म्हणतो, चहा उकळायला. मधे दोनदा प्रयोग करून पाहिले, आमरसाच्या डब्यात चहा उकळायचे. पण डब्याचं बुड शेगडीवर नीट टेकत नाही त्यामुळे फक्त कड तापते अन् चहा नीट उकळत नाही. मग कंटाळा येतो.
असो, झोपतो आता. गेले काही उगाचच एका गंभीर विषयावर लिहायचा प्रयत्न करत होतो अन् हताश होऊन लिहिलेलं खोडून झोपी जात होतो. नकोच म्हणलं. सध्या चहा बरा.



चहाबाज़ नॅकोबा!
@विद्याधर, चहा हेच अमृत
हमेशा तुमको चाहा…चाहा चाहा चाहा…..
टीप: प्यायचा चहा हा “चाहा” नस्तो अशी पुणेरी उत्तरं देऊ नको! मला महितेय…. (तसंही पुण्यातल्या लोकांना सगळंच माहित अस्तं!)
चाहा तुझे है, कॉफी से भी ज्यादा !!!
अरे वा अजुन एक चहाबाज….
मी पण चहापुराण लिहिलेय बघ…
http://sahajach.wordpress.com/2009/05/18/camellia-sinensis%e2%80%a6-2/