गेल्या महिन्यात ऑफिसची जागा बदलली. पुढच्या आठवडाभरात जाण्यायेण्यासाठी योग्य असा कमी रहदारी, सायकल सुसाट असा रस्ता शोधून काढला. दोन आठवडे होतात न होतात तोच एका भल्या सकाळी एक युनिफॉर्मातील मनुष्य रस्त्यावर शुभ्र रेघोट्या मारताना दिसला. तेव्हाच रस्त्यावर होणाऱ्या आगाऊ खोदकामाची चाहूल लागली. माझा आवडता कर्वेरोड पुणे मनपाकृपेने कायम खोदलेला असतो. गेल्या आठ महिन्यात त्याचं दर्शन झालं नाही, जरा चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आज संध्याकाळी ऑफिसहून परतताना रस्त्यावर काम सुरू झाल्याची ठळक लक्षणं दिसू लागली. थोडंसं खोदकामही दिसलं अन् एका अपरिमित आनंदानं मन प्रफुल्लित झालं. परदेशात खड्डा पाहून होणाऱ्या या आनंदाला पुणेरी आनंद म्हणत असावेत.
बंड्या एकदा रस्त्यातून जात असतो, त्याला सदाशिव पेठेत राहणारे जोशी भेटतात, ते प्रचंड आनंदात असतात. बंड्या विचारतो, काय काका, काय विशेष?? जोशीकाका सांगतात, “अरे, शेजारच्या नेन्यांना लॉटरी लागली”. बंड्या जरा गोंधळतो, विचारतो, “पण मग तुम्हाला एवढा आनंद का”?
जवळजवळ उड्या मारतच जोशीकाका उत्तरतात, “त्यांना तिकीट सापडत नाहीये.”
हा तो आनंद.
मार्च महिन्यात माझ्या खोलीत एक जिवंत उडता डास दिसला तेव्हाही मला असाच आनंद झाला होता. पावसाळ्यात “मूठ मिटेन तिथं डास मारेन” या म्हणीला जागणारा मी त्या डासाकडे केवळ कौतुकानं बघत राहिलो. दोन दिवसांनी मला तो डास बेसिनपाशी सापडला, तेव्हा तो आपल्यात नव्हता. कदाचित माझा स्वयंपाक त्याला सोसला नसावा. मधे एकदा चिपोट्ले मधे माशी दिसली (दुकानात, पदार्थात नाही) तेव्हाही मला उकळ्या फुटल्या होत्या.
एकदा मात्र भुंग्याएवढा मोठा आणि टण्ण्या किडा खोलीत घुसला होता आणि भयंकर आवाज करत खोलीभर उडत होता, त्यानं मात्र वैताग आणला. अखेर टेलिफोन डिरेक्टरीच्या सहाय्यानं त्याला भिंतीत चिनून टाकला, अनारकली श्टाईल (ती डिरेक्टरी आजूनही त्याच स्थितीत आहे. तो भुंगा तिथंच असेल आणि आजूनही जिवंत असेल या भितीनं मी काही ती डिरेक्टरी तिथून हालवणार नाहीये.) त्या किड्याशी विजयी युद्ध करून झाल्यानंतर मात्र जरा बरं वाटलं. पुण्यात संध्याकाळी घरात पाकोळ्या घुसून बसायच्या, इथे जगाच्या दुसऱ्या टोकावर किमान भुंग्यावर तरी सराव करता आला याचं समाधान मिळालं.
बाकी, सध्या काम आणि गेम यात पुरता गुंतलोय. सत्तावीस जुलैला ब्लिझार्डनं स्टारक्राफ्ट-२ रिलीझ केला. तेव्हा मनावर मोठ्या मुश्किलीनं ताबा ठेवला. अन् वाट बघण्याच्या अत्यंत क्लेशकारक अशा प्रदीर्घ अडीच दिवसांनंतर तो गेम डाऊनलोड करून लॅपटॉपवर इन्स्टॉल केला. शिवाय ऑफिसमधे रिलीजची धावपळ आहे ती वेगळीच. एकूणच मजा आहे.
असो, झोपतो आता.
आपला
~ नॅकोबा
मूठ मिटेन तिथं डास मारेन!!!??!!
डास मारायला एक हातच पुरेसा असतो. खरं तर दोन बोटंही पुरतात किंवा चॉपस्टिक्स. पण तेवढ्या एक्सपर्टीज यायला वेळ लागतो…
प्रचंड भारी नॅकोबा!
@विभि, धन्यवाद!
Masta re bidu!