शृंगार, वीर, करूण, अद्भुत, हास्य, बीभत्स, रौद्र, शांत आणि आणखी कोणतातरी एक असे काव्याचे (कलाकृतीचे?) नऊ रस आहेत (नववा कोणता बुवा… विसरलो ते सुभाषित, भारी होतं…) असं शाळेत शिकलो होतो. बीभत्स रसाचं एक त्यातल्यात्यात उदाहरण तेव्हा बाईंनी दिलं होतं. की एक कोणी दुष्ट राजा (की माणूस) लोकांचा छळ वगैरे करून शेवटी मरताना वाघाच्या तोंडी मरण्यास इच्छुक असतो कारण एकच की वाघाला रक्ताची चटक लागावी.बीभत्स म्हणजे काय हे त्या काळी (इसवीसन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव – नव्व्याण्णव ) कळत नव्हतं (सुदैवानं) (सुदैव तुमचं की माझं या प्रश्नावर संशोधन चालू आहे.) पण तो रस प्रकर्षानं जाणवला तो साऊथपार्क बघताना.
सध्या या सीरीझचा चौदावा सीझन. ही एक विनोदी सीरीझ, पण यातल्या विनोदाला कसलीही म्हणजे अगदी कसलीही मर्यादा नाही. अतिरेकाचा पुरेपूर वापर, अतिरंजित, कल्पनेच्याही पलिकडच्या कल्पना आणि कधीकधी अगदीच वाट्टेल ते घेऊन दर वेळी एक वेगळाच धक्का घेऊन ही मंडळी गेली चौदा वर्षं जगातल्या वाट्टेल त्या गोष्टीची खिल्ली उडवत आले आहेत. हे असलं काहीच्याकाही तुला बघावंसं तरी कसं वाटतं असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी एक उलटा प्रश्न विचारेन की तू शेपू, कारलं किंवा टाको बेल मधलं खाणं खाऊ कसं शकता? खरं तर या सीरीझचं कौतुक करायला मला आजून काही परिच्छेद खर्च करायला आवडतील. स्टॅन, कायल, केनी आणि एरिक कार्टमन ही चार मुलं या सीरीझची मुख्य पात्रं. या कॅरेक्टर्सबद्दल लिहायचं म्हणलं तर एक किंवा चक्क चार वेगवेगळ्या पोष्टी टाकाव्या लागतील. एरिक कार्टमन हे पात्र तर कमाल आहे. वेगवेगळ्या एपिसोड्सची कथाही बरेचदा सामाजिक शैली, राजकीय दृष्टीकोन, सार्वजनिक वागणूक किंवा ज्वलंत प्रश्न यांची अतिशयोक्तीद्वारे खिल्ली उडवणारी असते. कधीकधी या आचरट गोष्टींमधून केलेलं भाष्यंही कमालीचं जाणवतं. याचं एक उदाहरण साऊथपार्कच्या अनेक एपिसोड्समधे वचरेवर ऐकायला मिळणाऱ्या एका संवादाचं. केनी हा या चार मित्रांपैकी सर्वात गरीब कुटुंबातला. अनेक एपिसोड्समधे काही ना काही निमित्त होईन हा केनी मरतो. त्यानंतरचा हा संवाद
” ओ माय गॉड, दे किल्ड केनी ” – स्टॅन
” यू बास्टर्ड्स ” – काईल
कसाही मरो, कोणीही मारो, एखादी प्रतिक्षिप्त क्रिया असल्याप्रमाणे हे दोघं हा वरचा संवाद बोलून मोकळे होतात. थोडाफार फरक, तोही क्वचित. कार्टमन हा प्रकारच वेगळा, स्टॅन आणि काईल हे त्या मानाने जरा सामान्य. गरिबांच्या किंवा सामान्यांच्या मृत्यूची दखल समाज काय प्रकारे घेतो हे दाखवायला आजून काय उदाहरण हवं. “दे किल्ड केनी” प्रमाणे कोणत्यातरी “दें” ना शिव्या घालून विषय ढकलून देण्यापेक्षा वेगळं काय करतो आपण? पेपरात, दूरदर्शनवर जेव्हा हल्ल्यात, एखाद्या मुजोर अपघातात दगावलेल्यांची बातमी येते तेव्हा हा केनी आठवल्याशिवाय राहावत नाही. त्यांनी मारलं… त्यांनी मारलं…
लेख छान झालाय.संवेदना बधीर होत आहेत ना… “रोज मरे त्याला कोण रडे” असं होत आहे ,i think.. नववा रस आहे “भयानक “. सध्या जे काही घडत आहे ते याचं उदाहरण आहे.
नवव्या रसाचे नाव मत्स्य आहे
नवव्या रसाचे नाव मत्स्य आहे. लेख छोटा पण मस्त झाला आहे.
छान म्हणणं शक्य नाही पण फार वास्तव झालाय लेख.त्या सिरीजची वास्तवाशी केलेली तुलना आवडली. शेवटचा परिच्छेद अप्रतिम !!
@Makarand : नवव्या रसाचे नाव ” भयानक ” च आहे .
लेख छानच.
By the way ..कारल्यांना कशाला मध्ये ओढले ? परतून किती छान लागते कुरकुरीत भाजी..