आमटी

आमटी हा माझा जीव की प्राण. जेवणात आमटी नसली की माझं आडतं आणि असली तर भात किंवा पोळीव्यतिरिक्त बाकी काही लागत नाही. त्यामुळेच आज जेव्हा मी जेवणात आमटी खात होतो तेव्हा आकाश ठेंगणं झालं होतं, हात गगनाला टेकले होते आणि स्वर्ग पण दोन बोटं उरला होता. मग फार वेळ न दवडता मी तो स्वर्गीय वाटणारा दोन घास आमटीभात संपवला आणि समाधानाचा ढेकर यावा म्हणून कपात कोकाकोला ओतला.( हे शेवटचं उगाच… काही कोकाकोला वगैरे ओतलेला नाईये… जरा तोंड आलंय, थंडावा म्हणून गरम हिरवा चहा पितोय ! )

कधी आळस, कधी उगाच म्हणून मी आमटीचा प्रयोग टाळत आलो होतो. आज मात्र ऑफिसमधून आल्या आल्या मी एका अज्ञात उत्साहाने भारलो गेलो… राईस कुकरात भात आणि प्रेशर कुकरात डाळ लागली… जरा वेळानं  मला कुकर लावायला फारसा आवडत नाही (नव्हता, आताचं माहीत नाही, सध्या आनंदी आहे,  व्हेन हॅपी पोट, डोण्ट काऊंट युअर वोट ) आधी राईस कुकरात आणि मायक्रोवेवमधे डाळ शिजवण्याचा प्रयत्न करून झाला होता पण त्यातून भांडी धुवायला लागण्यावाचून काहीच हाशिल झालं नाही. नाही म्हणायला एकदा प्रेशर कुकरात डाळ जमून गेली होती (मटका). प्रेशर कुकर नंतर धूत बसावा लागतो हो… आणि नुसता तोच नाही, डाळ हाटायला घेतलेलं भांडं, आमटी किंवा दालफ्रायसाठी वापरलेला पॅन, जेवणाचं ताट, आमटीचा बाऊल असं सर्व जग स्वच्छ करावं लागतं. केवळ करावं लागणार याच कल्पनेनं कमालीचा आळस दाटतो आणि एकूणच बेतावर पाणी फिरतं.

आज सगळं कसं मस्त मस्त झालं… डाळ व्यवस्थित शिजली… पॅनमधे तेल बदाबद पडलं नाही… गरम मोहरी उडून नाकपुडीत शिरली नाही ( आधीही कधी झालं नव्हतं, झाल्याचं ऐकलंही नाईये पण झालंच तर एखाद्याची बेक्कार शाळा होईल ), पाणी जास्त झालं नाही, तिखट घालायचं विसरलो नाही आणि मीठसुद्धा व्यवस्थित !! आता कढिलिंबाची पिशवी आणायला हरकत नाही.

समोर ताट… ताटात भात, आमटी, पोळी (गोठवून गरम केलेली), चटणी, मदर्स रेसिपीचं लोणचं… टीव्ही चालू… आनंद !!! कसं अगदी जेवल्यासारखं वाटलं.

आपुला,

(तृप्त) नॅकोबा

2 thoughts on “आमटी

  1. सही आहे नॅकोबा चहावरून उडी एकदम आमटीकडे….चांगलं चाललंय…पण आमटीनंतर डायरेक्ट च….जाऊदे….आता तुम्ही नंतरची पोस्ट कुठली लिहिताय याबद्दल आधीच्या पोस्टवर कशाला चर्चा…एक फ़ोटु टाकला अस्ता तर आमच्याबी तोंडाला पाणी सुटलं असत ना…

  2. हांsss ऱ्हायला रौ फोटु काढायचा,
    आता नेक्श्ट टाईम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>