माणुसकी

शाळेत असताना मूल्यशिक्षण नावाचा एक विषय होता. ग्रेड वाला विषय, त्यामुळे महत्व जवळजवळ शून्यच. एक कोणतीतरी वही काहीतरी खरडून भरायची की किमान ‘बी’ नक्की. अक्षर बरं असेल तर ए वगैरे. अशा या विषयात माणुसकी वगैरे काहीतरी शिकल्याचं पुसट पुसट आठवतंय. भूतदया जरा जास्त लक्षात आहे. प्राणिमात्रांवर दया वगैरे. त्यात जे शिकलो ते असं काहीसं होतं:

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही.

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला म्हणून जगनने पप्पूला कुदलला.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही. जगनला माणुसकी नाही.

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला अन् जगनलाही बुकलून काढला.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही अन् माणुसकीही नाही.

कृती: पप्पूने कुत्र्याला दगड मारला. जगनने कुत्र्याला मलमपट्टी केली.
अर्थ: पप्पूला भूतदया नाही. जगनला आहे.

पण पप्पूने मुळात कुत्र्याला दगड का मारला हा मुद्दा इथे गौण आहे. असायचाच. आपणही त्याला तसाच ठेवून पुढे जाऊ. कारण आपला मुद्दा आहे माणुसकी.

त्याचं झालं असं… की एका शनिवारी भल्या पहाटे साडेनऊ वाजता मातोश्रींचा फोन आला अन् काय घडतंय हे कळायच्या आतच पलिकडून “इंटरनेट वर कुठे माणुसकी मिळेल का रे?” असा प्रश्न आला.शाळेच्या कोणत्याशा स्पर्धेत माणुसकी हा विषय होता अन् त्याकरता आई कोणालातरी मुद्दे सुचवणार होती. त्यात तिला माझी मदत अपेक्षित होती. ( अमेरिकेत आल्यानंतर निबंध या प्रकारापासून माझी सुटका होईल असं वाटलं होतं पण आई आणि आधुनिक तंत्रज्ञान यांनी एकत्रितपणे तो भ्रम दूर केला.) अचानक झालेल्या या घणाघाती हल्ल्यात उरल्यासुरल्या झोपेचा पार चुराडा झाला. गूगलवर माणुसकी कशी शोधावी हे फोनवरून सविस्तर सांगण्यात पंधरा-वीस मिनिटं वाफवल्यानंतर मला नाईलाजानंच लॅपटॉप उघडावा लागला. (ही पोष्ट सोडून या ब्लॉगवर कुठेही “लॅपटॉप” आणि “नाईलाज” हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात आढळल्यास तो एक दैवी चमत्कार मानावा.) मीही गूगलवर थोडं शोधून बघितलं. काही विशेष सापडलं नाही. आईला सांगितलं “गूगलवरही शोधून पाहिलं पण माणुसकी काही सापडली नाही.” अशी सुरुवात करायला सांग. पुढे आपला रेग्युलर माणुसकी निबंध वापरायचा थोडाफार फिरवून. एकीकडे दहशतवाद, भ्रष्टाचार वगैरे, दुसरीकडे बाबा आमटे. आईला पटलं. नंतर आईनं कोणा विद्यार्थिनीला बक्षीस मिळाल्याचं सांगितलं. बरं वाटलं.

माणुसकी बद्दल मला विचाराल तर जरा वैतागलेलंच उत्तर मिळेल. माणुसकी म्हणजे काय? ती असते का? कशी असते? कुठे असते? सध्या तिचं कसं चाललंय? असे प्रश्न विचारून उगाच वात आणु नका. जरा लक्ष दिलं आजूबाजूला की आपोआप दिसेल माणुसकी अन् कळेल जागच्याजागीच, माणुसकी म्हणजे नक्की काय असतं ते. अन् असं काही दिसलं आणि कळलं की त्यातच समाधान माना अन् चालू लागा. उगाच “काय ही थोर माणुसकी! हल्ली असं दिसणं दुर्मिळच!” वगैरे सेंटिमेंटल डायलॉग मला ऐकवू नका, कारण माणुसकी कशी कशी लोपत चालल्ये हे मी तिथल्यातिथे सोदाहारण स्पष्ट करेन अन् तुमच्या त्या अल्पकालीन उत्साहावर चांगलं सायीचं विरजण पाडीन. जसं टॉमॅटो लाल असल्याचं मला फारसं कौतुक नाही तसं माणसात माणुसकी दिसणं याचंही मला विशेष कौतुक नाही.

पण मांजर मऊ असतं याचं मला कैच्याकै प्रचंड कौतुक आहे. भूतदया असावी बहुतेक.

~नॅकोबा.

Leave a Reply