पाऊस
अंगावर पडणारऱ्या प्रत्येक थेंबासरशी ओलावलेलं मन शहारून उठतं… ओल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे हळुवार दरवळत येते कोणाचीतरी आठवण… मग त्या आठवणीत चिंब चिंब भिजावं वाटतं… सिंहगडावर जाऊन कांदा-भजी खावीशी वाटतात आणि कोणाकोणाला अजून बरंच काय काय करावसं वाटतं… पाऊस आला की लोकांना फार काय काय रम्य आणि रोमांचक व्हायला लागतं.
मला नाही !!!
पावसात नक्की काय झालं यापेक्षा पावसानंतर काय झालं याच्या माझ्या आठवणी जास्त तीव्र आहेत, कदाचित त्या औषधांच्या डोसांपेक्षाही तीव्र… पावसात भिजून वाहणारं नाक आणि त्या पावसाळी पाण्यामुळे वाहणारं पोट या दोन्ही गोष्टींमधे रम्य, सुखद असं काहीच नाही. आणि या आठवणींवर हळुवार फुंकर वगैरे घालून मला शांत कोवळ्या गारव्यात गुरफटून टाकेल अशी कोणी अजून या दिशेने फिरकली नाही. मान्सूनमधे भिजलो तरी वाळवंट काही सरलं नाही.
आता मात्र पावसाचं जरा फारच चाललंय. जूनपासून मागे लागलाय हा, माझा पिच्छाच सोडायला तयार नाही… पुण्यात भेटला जूनमधे… नेहेमीसारखा पडला, थोडा कमीच पडला असेल कदाचित पण तीन महिने मधूनअधून भेटत होता. नंतर त्याला करमेला ऑक्टोबर-नोव्हेंबरमधेही पुण्यात वाट्टेल तसा पडला. डिसेंबरमधे माझी उडायची वेळ आलेली तेव्हाही पडेल की काय असं वाटत होतं पण हा तसा शांत राहिला. जानेवारीपासून मात्र हा पडतोच आहे इकडे… बर आपल्याकडे बरं असतं. पावसाळा म्हणला की निमूट रेनकोटसकट बाहेर पडायचं नाहीतर भिजायचं. असा सोपा नियम. इकडे पावसाळा गृहीत धरून रेनकोट न्यावा तर सूर्यदेव दिवसभर कार्यभाग सांभाळतात आणि संध्याकाळी बससाठी उभं राहताना दप्तरात ओझं होतं. नेऊ नये म्हणलं तर वाहतं नाक आणि पोट आठवतं. मग काय, निमूटपणे छत्री दप्तरात सरकवतो.
पाऊस चार दिवस बरा वाटतो, चहाचे घोट किंवा गरमागरम मॅगीच्या लडींबरोबर गटागट गिळता येतो. सहा महिने होतील आता, वाट बघतोय हा थांबायची. किती हा माझा स्वार्थीपणा… इकडे कॅलिफोर्निया पावसाबाबत समाधानी आहे. मी अमेरिकेतच कोलंबसमधल्या मित्राला फोन केला होता मधे तेव्हा या पावसाबाबत कुरकूर केली. “साल्या, कॅलिफोर्नियात राहून हवामानाबद्दल तक्रार काय करतोस !! ” ऐकायला मिळालं.
सकाळी उठल्या उठल्या पावसाचा आवाज ऐकला की उठायची जिद्दच निघून जाते. घरीच बसावं वाटतं पण ऑफिसला तर जावंच लागतं… एकूणच मी पावसात जायचं टाळतो. शनिवार-रविवार पाऊस असेल तर फारच बोर होतं. एरवी कसाही संपणारा दिवस अचानक फार कंटाळवाणा आणि मोठा वाटायला लागतो.
आता एकतर हा पाऊस लवकर संपो, किंवा मृद्गंध जागृत करणारी ती हळुवार फुंकर तरी सापडो हीच इच्छा….
आपला,
~नॅकोबा