कप

काल माझा एक कप फुटला. खळ्ळ् असा. त्या आधी ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक असा एक पानचट आवाज झाला. कपात चहा होता. जर कोणी अज्ञात इसम माझ्यावर पाळत ठेवून माझ्या कारवायांकडे बारकाईनं लक्ष देत असता तर  ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आणि खळ्ळ यांच्या काहीसं मध्ये ऐ च्ची ** असंही काहीसं त्याला ऐकू आलं असतं. पण तसं कोणी पाळत ठेवून नव्हतं. किंवा असलंच तरी त्यानं मला सांगितलं नव्हतं.

असा मी रविवार सकाळचा रम्य प्रहर (मला दुपारसुद्धा रम्यच वाटते. संध्याकाळ ऑफिशिअली रम्य असते अन् रात्रीचं तर …. असो. ) पकडून निवांत चहा पीत बसलो होतो. समोर उघड्या लॅपटॅपवर माईनक्राफ्ट चालू होता. ( माईनक्राफ्ट. खेळाडूच्या कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव देणारा, स्वयंप्रेरित नवनिर्मितीला चालना जेणारा असा हा अनन्यसाधारण खेळ सूज्ञाने खेळू नये. हा खेळ वेळ खातो.) लॅपटॉप आणि माझ्या मधे आपला एक कान एकवटून उभा तो कप. चहानं ओतप्रोत भरला नव्हता कारण काही घोट चहा मी घशाखाली घातला होता. उजवीकडे कोण्या एका डब्याच्या झाकणात तीन चार अस्वलं छोट्या कचोऱ्या ठेवलेल्या. (अस्वलं कुठून आली मधे देव जाणे.) माझा उजवा हात माऊसवर. तो तिथून हलवायचा कंटाळा. म्हणून मी माझा डावा हात उचलला पण निम्मं लक्ष खेळात. (कचोरी खायचं कसं बरोबर आठवतं?)

ड्राय कचोरी.

मला काही कळायच्या आतच पुढचं थरारक नाट्य घडलं. ( थरारक नाट्य म्हणे) माझ्या डावीकडून माझ्या उजवीकडे जाणाऱ्या माझ्या डाव्या हाताच्या उजव्या बाजूचा माझ्या पुढ्यात असलेल्या कपाच्या डाव्या बाजूला धक्का लागला. हाताच्या वेगामुळे कप उजवीकडे कलंडला. खरंतर लॅपटॉपवरच कलंडायचा पण त्याचा कान टेबललाला टेकला अन् नकळत कपाच्या अधःपतनाची दिशा बदललली. साधारण चार-पाच मिनिटांपूर्वी मायक्रोवेवमधे अडीच मिनिटे तापवलेल्या चहासहित तो कप माझ्या मांडीकडे झेपावला. एव्हाना त्यातील पानचट (दूध संपलं होतं…) चहा हिंदकळून इतःस्ततः पसरू पाहत होता. वर नमूद केल्याप्रमाणे तो ब्ळ्यबॅक ब्ळ्यबॅक आवाज आला तो इथेच!.

दरम्यान, या अचानक उद्धवलेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानं मला आई आठवली. पण ते स्वगत पूर्ण होण्याच्या आधीच मांडीवर उष्णतेची जाणीव होऊ लागल्यानं मी जागीच उडालो. स्वाभाविकच, मांडीवर स्थिरावू बघणारा तो कप फरशीकडे झेपावला आणि खळ्ळ (खरं तर टण्ण आणि खळ्ळ) आवाज करून दुभंगला. दुभंगला म्हणजे एकदम प्रॉप्पर दुभंगला, मोजून दोन तुकडे.

जे घडायचं होतं ते घडून गेलं होतं. फुटलेला कप फरशीवर निपचित पडला होता पण त्याच्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता. फरशीवर पसरलेला चहा निस्तरायचा की मांडीपशी गरम ओलाव्याची ऑकवर्ड (ऑकवर्डला मराठी शब्द मला माहीत होता… आठवत नाहीये अत्ता… सिरिअसली!!) जाणीव करून देणारी विजार बदलायची असा गहन प्रश्न मला भेडसावू लागला होता.

अखेर, कमरेशी बांधलेल्या नाडीला स्मरून त्या विजारीला तिच्या कर्तव्यातून मुक्त करण्यासाठी मी चहाच्या पानचट थारोळ्यातून बाहेर पडलो. मात्र त्या कपाची आठवण झाल्याशिवाय एक दिवसही गेला नाहीये. (कालच फोडलाय!)

 

~नॅकोबा

4 thoughts on “कप

Leave a Reply