अस्वल
कधी कधी लिहिण्यासाठी हात खूप फुरफुरतात, पण मेंदू बंद असतो. कधी शंभर गोष्टी सुचत असतात पण खरडायचाच कंटाळा आलेला असतो. चणे अन् दातांच्या या दुष्टचक्रात कित्येक पोष्टी तश्याच वाऱ्यावर विरून जातात.
गेला अख्खा आठवडा लिहावं लिहावं म्हणतोय पण माझे सर्व प्रयत्न मीच सपशेल हाणून पाडतोय. त्याचं काय असतं की वेळ म्हणून एक प्रकार असतो.त्याचे दोन भाग असतात (दोनपेक्षा जास्त नसावेत असा व्यावसायिक सल्ला मी इथे देऊ इच्छितो, का ते पुढे कळेलंच पण कळलं नाही तरी ते तितकं महत्वाचं नाही.) एक भाग कार्यालयीन कामासाठी राखीव असतो. असावा, बरं असतं. दुसरा भाग तुमचा असतो. (असावा, बरं असतं) पहिल्या भागाचं काय लोणचं घालायचं हे तुमच्या फारसं हातात नसतं. दुसरा भाग, जो तुमचा असतो (म्हणजे, वेळेचा दुसरा भाग, तुमचा दुसरा भाग नाही.) त्याचं काय काय करायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. ज्याला तुम्ही फावला वेळ म्हणता (फावल्या वेळात नक्की कोणाचं फावतं कोणास ठावूक) त्यात बरंच काही करता येतं. लोणचं करणे, पापड भाजणे, ब्लॉग लिहिणे, वाचन, चित्रपट पाहणे, अस्वल पाळणे वगैरे.
मला ब्लॉगिंग आवडतं, अन् गेमिंगही. गेमिंग अंमळ वरचढ. त्यामुळे वीकांत वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट किंवा स्टारक्राफ्ट खेळण्यात घालवतो. अमेरिकेत आल्या आल्या पहिले काही महिने संगणकावर फारसे गेम्स टाकले नव्हते, अन् ब्लॉगिंगलाही तसा नवीनच होतो, त्यामुळे हाताला सुटेल ते खरडलं. कधीकधी फारसा विचारही न करता. अलिकडे मात्र माझ्या आवडत्या छंदात (मी छंद म्हणायचं, आईनं व्यसन म्हणायचं… शेवटी अर्थ एकच, गेमिंग) पुरता बुडलो असल्यानं ब्लॉग अगदीच कोरडा (कोरडा नाही, शुष्क म्हणावं…. शु ष्क ! ष… ष…. दुसरा ष पोटफोड्या… म्हणजे तुम्हाला साहित्यिक भाषेत वगैरे लिहिता येतं असं लोकांना वाटतं.) झाल्यासारखा वाटतोय.
अन् ब्लॉगवरच्या अशा मलूल, कोंदट, ढगाळ, कोमेजलेल्या वातावरणात अचानक वीज कोसळावी अन् तिच्या आघाताने जमीन दुभंगून तप्त ज्वाळांचे लोळच्या लोळ अंबराकडे झेपवावे, वरून वीज … खालून ज्वाळा… वरून वीज… खालून ज्वाळा … वीज… ज्वाळा… वीज… ज्वाळा… कडकडाट, गडगडाट, झगमगाट आसमंत दुमदुमणारा आवाज, जणू सहस्र (सहस्र या शब्दापुढे हजार ला काहीच किंमत नाही) सिंहांची गर्ज… खोकला… जोराची धाप.. पाणी… पाणी…
असो. (झेपत नाही तर लिहू नये…) तर गंमत अशी आहे, की स्टार माझाच्या मराठी ब्लॉग स्पर्धेचा निकाल इतक्यातच जाहीर झाला (http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) अन् आश्चर्य म्हणजे उत्तेजनार्थ यादीत मुक्ताफळे डॉट कॉमचाही समावेश होता. छान वाटलं. उत्तेजित झालो. माझ्या नियमित वाचनातले काही ब्लॉग्जही त्या यादीत होते. हेरंबचा हरकत नाय, विद्याधरनं चालवलेली बाबा ची भिंत, अन् नचिकेत गद्रेंचा नचिकेत… दिल से . याच यादीत मुक्ताफळे बघून मला अगदी “कसचं कसचं” फीलिंग आलं. ( यालाच मी गुब्बू वाटणे असं म्हणतो. ) (टु बी स्पेसिफिक, इट्स सिमिलर टू “धन्य धन्य होणे” फीलींग)
वास्तविक, या ब्लॉगनं यापूर्वी किमान दोनदा तांत्रिक बाबींसाठी मान टाकली होती. त्यानंतर कैक महिने केवळ दोन-चार निरर्थक पोष्टींसह हा ब्लॉग इंटरनेटवर कुठेतरी अधांतरी तरंगत होता. अन् एकट्यानं हा ब्लॉग तगवणं मलाही झेपलं नसतं. पण जेव्हा नियमित लिहायला लागलो तेव्हा जाणवलं, की मराठी भाषेला ब्लॉगर्सची अन् वाचकांची एक सुरेख कम्युनिटी लाभली आहे. अन् या कम्युनिटीतून कळत-नकळत नवीन ब्लॉग्ससाठी एक पोषक वातावरण निर्माण झालंय. मराठी ब्लॉग विश्वातून अनोळखी वाचक नकळत ब्लॉगवर येतात, वाचतात, कधी प्रतिक्रियाही सोडतात. असे एखाद-दुसरे नियमित वाचकही माझ्यासारख्या नवीन बंडूला कैच्याकै प्रेरणा देऊन जातात, प्रत्येक प्रतिक्रिया अप्रत्यक्षरीत्या ब्लॉग जागा अन् ताजा ठेवायचं एक प्रबळ कारण सांगत असते (मात्र कधीकधी एखादी प्रतिक्रीया “ब्लॉग बंद करा”, किंवा “ही पोष्ट अमुक अमुक ठिकाणावरून चोरलेली आहे” असंही सांगते पण सुदैवानं मुक्ताफळांची उधळण थांबवायला सांगणारी प्रतिक्रिया आजवर आलेली नाही (म्हणून लगेच पाठवायचीही गरज नाही !!) )
थोडक्यात सांगायचं तर, वाचकमंडळी, तुम्ही इथे लिहिलेलं भलतंसलतं वाचत नसता, तर मी नेहेमीच्या आळसाने केव्हाच गाशा गुंडाळला असता. तरी, वेळोवेळी ब्लॉगला भेटी देऊन प्रतिक्रिया देऊन मला जागं ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही म्हणाल, प्रत्येक ब्लॉगर वाचकांना थॅंक्यू का म्हणतो?
ब्लॉगून बघा, आपोआप जाणवेल.
तळटीप:
१. शीर्षकाचा पोष्टीशी तसा काहीच संबंध नाही.
२. नक्की किती लोक तळटीप वाचतात कोणास ठावूक…