ब्रेक के बाद

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक पोष्ट. दरम्यानच्या काळात मनुष्य (म्हणजे मी) वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्टमधे तल्लीन झाला होता (होतो.) गेमिंग… व्यसन…. वाईट…..

आज दुपारी सुपरबोल नावाचा अमेरिकन प्रकार बघत बसलो होतो. अमेरिकन फुटबॉल डोक्यावरून जातो. तो समजून घेण्याचे मेंदूचे जे काही थोडेफार प्रयत्न चालले होते ते चहा आणि बाकरवडीनं सपशेल हाणून पाडले. काहीच न कळल्यामुळे सुपरबोलबद्दल बोलणं शक्य नाही आणि चहा अन् बाकरवडीच्या संयुक्त परिणामांना शब्दात पकडण्याचं काम केवळ रजनीकांतच करू जाणे.

ब्लॉगची थीमही बदलल्ये. जरा स्वच्छ स्वच्छ वाटतंय.

आज इतकंच.

लवकरच एखादी बरी पोष्ट होईल अशी इच्छा मनात बाळगून आहे.

~नॅकोबा !!

दुधाळ वगैरे चांदिणं !!!

ऑफिसातून निघालो तेव्हा सूर्य दिवसाचं काम आटपतं घेत होता. साधारण साडेसहाची वेळ. संध्याकाळच्या गारव्यात सायकलवर निवांत तरंगत घरी पोहोचलो. बाहेरच्या खोलीत सभोवार अंथरलेल्या मउ चटईवर शुभ्र प्रकाशाचा एक पट्टा पसरला होता.
आतले सगळे दिवे बंद होते केवळ सरकत्या दरवाज्याचा पडदा अर्धवट सरकवलेला.
थोडा दरवाज्याजवळ गेलो. प्रकाश कुठून येतोय ते बघायला…
संध्याकाळी साडेसहा वाजता खोलीत चक्कचक्क चांदणं सांडलं होतं.

बूट, सॅक, कपडै वगैरे तसंच आवरून घेतलं. अंधारात. गार हवेत छानशी सायकलस्वारी झाल्यानं मी आधीच शांत शांत मूडमधे होतो. त्यात समोर चांदणं.

दोन पणतीएवढ्या मेणबत्त्या काढल्या. त्या देवासमोर नेऊन लावल्या.
तिथेच दोन सुवासिक मेणबत्त्या असतात. कायम. काचेच्या बरणीत, जाडजूड.
त्याही लावल्या.
मग निवांत बसलो थोडा वेळ.

शांत.
सगळं कसं.
शां त. !!!!

नववर्ष – २०११

हा हा म्हणता २०१० संपलं, २०११ सुरू.  नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

हार्दिक शुभेच्छा ह्रदयापासून असतात. कधी कोणी मानसिक, बौद्धिक किंवा आत्मिक शुभेच्छा का देत नाहीत कोण जाणे. असो. तुम्हाला एकदम कोलेस्ट्रॉल फ्री आणि हेल्दी हेल्दी हार्दिक वगैरे शुभेच्छा. हे नवीन वर्षं तुम्हाला सुखसमाधानाचं आणि भरभराटीचं जावो हीच सदिच्छा.

आज बरंच काही खरडायची इच्छा आहे पण पेशन्स नाही. इथेच धांबतो. दारूपार्ट्या वाईट, गुढीपाडव्यालाच नववर्ष वगैरे म्हणून खट्टू असलेल्या मंडळींनाही शुभेच्छा आहेत बरंका. इथं एक सुविचार बळंच फेकावासा वाटतो. “केवळ तुम्हाला जगाबद्दल इश्शूज आहेत म्हणून जगालाही तुमच्याबद्दल इश्शूज असतीलच असं काही नाही…”

इति.

(आणि या वर्षीही मांजर तितकंच मऊ असो हे वेगळे सांगणे न लगे.)

~नॅकोबा.

सर्वनाम

ते. त्यांच्या त्या आणि त्यांचे ते. त्यांचे आपापले मी. त्यांच्यातलेच दोन मी वेगवेगळे, आम्ही होऊ पाहणारे… कधीकधी त्यांना न समजताच सहजगत्या आम्ही झालेले… कधीकधी मात्र आपापल्या मी ला धरून ठेवण्याच्या फोल आग्रहात अडकलेले. कधी आम्ही इतका घट्ट की मी म्हणून खपून जाईल. कधी मात्र प्रश्न पडावा की मीच इतके वेगळे, आम्ही झालेच कसे. हे बघतो मी. मग जाणवतं. सर्वनामं जास्त झाल्येत.

मीपण वाढतंय आणि असे “मी”पण वाढलेत.

तीसमारखान

पाहिला.बरा आहे.

इथे “बरा आहे” हे फारच सापेक्ष वर्णन आहे. मी नमूद करू इच्छितो, की  तीसरी ऑंख, द्रोणा, अक्सर, नो स्मोकिंग आणि टशन चित्रपटगृहात पाहिल्यानंतर चित्रपटच्या दर्जाची दारिद्र्यरेषा फारच खाली जाऊन टेकते. (बाय द वे, मला टशन आवडला होता अशी शंका बरेच दिवस माझ्या मनात घर करून आहे.)

तर उपरी गवाहोंको मद्देनजर वगैरे रखते हुवे मी असं म्हणतो की तीसमारखान “बरा” आहे. बळंच न हसवता मनापासून हसवेल असा विनोद मधून अधून येऊन जातो बाकीचे विनोद बळंच होतात. सगळेच जण आपण “अॅक्टिंग” करत आहोत हे वेळोवेळी जाणवून देतात. सगळंच जरा फारच कृत्रिम वाटत राहतं. अक्षय कुमार आणि विनोदी चित्रपट या मिश्रणाकडून अपेक्षित समाधान या चित्रपटात सापडत नाही. शीला की जवानी आणि कतरीनाचे कपडे ही त्यातल्यात्यात जमेची बाजू. त्याव्यतिरिक्त ती चित्रपटभर अशक्य बोर मारते. नाही म्हणायला अक्षय खन्ना आणि अक्षय कुमार यांचे एकत्रित असे काही सीन्स जरा उठून दिसतात.

बाकी मनोज “डे” रामलन,  या सगळ्यामागं स्टीवन स्पीलबर्गचं कारस्थान आहे वगैरे संकल्पना मला आवडल्या. बाबांशेजारी बसून “शीला की जवानी” मनापासून एंजॉय करणं माझ्याच्यानं शक्य झालं नाही. एका गाण्यात सलमान नाचलाय. मला हल्ली सलमान आवडत नाही.

खानों मे खान… तीसमार खान हे वारंवार ऐकताना मला “वन टू थ्री” नावाच्या सिनेमात वरचेवर पार्श्वसंगीत म्हणून वाजणारं “एवरीबडी सिंग…. बेहेन दा टकाज्” आठवलं. काहीही आठवतं. तीन लक्ष्मीनारायण वाला वन टू थ्री  तीसमार पेक्षा बरा होता.

असो.

“कोणालाही झेपण्याच्या मानानं जरा जास्तच कमनीय असल्यानं कधी कोणाच्या हाती लागायची नाही अशी ती शीला अन् तिची तरूणाई तशीच चिरतरूण राहो” हीच सदिच्छा!!

~नॅकोबा

अर्थ

आपण प्रत्येक गोष्टीचा आपापल्या परीनं अर्थ लावायला बघत असतो. आपल्याला कळणाऱ्या, न कळणाऱ्या, माहीत असलेल्या, नसलेल्या, आवडणाऱ्या, नावडणाऱ्या… अगदी कोणत्याही गोष्टीचा अर्थ आपण काढू बघतो. एकाच गोष्टीला नवीन नवीन अर्थ जोडत बसतो.
अगदी स्वतःला सुद्धा.
बरेचदा अकारण, अनभावितपणे.

अर्थ लावणं सोपं असतं. फारच.
तो विसरणं किंवा सपशेल झटकून टाकणं महाकठीण.

आठवून बघा, कधी प्रयत्न तरी केलाय का?
एखादा अर्थ मुद्दाम विसरण्याचा.

~नॅकोबा
(हो, पोष्ट संपली…)

घेऊन तर बघ

घेत नाही म्हणे मी. बोलतोय बघा कसा.
अभिमान पहा याला. हा घेत नाही याचा.

म्हणलं आम्ही , आम्हीही घेतो..
तर चेहेऱ्यावर हा पाडतो आठ्या
कळत नाही तुम्हाला म्हणतो,
नकळत आहारी जाल त्याच्या.

जाऊच आहारी म्हणतो आम्ही,
घेणाऱ्याची नशाच ती…
नशेत या, घेणाऱ्यांच्या
जाणवणारी ताकद फार.

सगळंच शून्य, घेता घेता…
घेता घेता शून्यात सगळं.
जातो मी अन् घेता घेता
उरतं फक्त अस्तित्व…

न घेणारा तू, वाळवंटात त्या
ओलाव्याचा टिपूस नाही!
घेणाऱ्यांना म्हणतोच कसा
तुमच्या पावसात अर्थ नाही?

घेतल्याशिवाय कळणार नाही
काय गोडीनं बनलंय जग
वाटलंच कधी चुकून…
तर एकदा तरी घेऊन बघ

गळून पडतील घेताक्षणी
धार्मिकतेचे दांभिक पथ्य,
घेता घेता पचत जाईल
त्रिकालाबाधित परमसत्य

अरे नास्तिका,
त्याचं नाव…
एकदातरी घेऊन बघ!

एकटाच की जोडीनं?

चाललायस खरा, पण येताना एकटाच येणार…… की जोडीनं???

अमेरिकेत येण्यापूर्वी हा प्रश्न बऱ्याच वेळा ऐकला होता. या एकाच प्रश्नातून अनेक वेगवेगळ्या भावना व्यक्त होत असतात. प्रश्न विचारणाऱ्याचं प्रश्न विचारला गेलेल्या व्यक्तीशी जे नातं असतं त्यानुसार या प्रश्नाच्या गर्भितार्थात बदल होतो. घरचे किंवा नातेवाईक जेव्हा विचारतात तेव्हा त्यात जरा काळजी असते. कोणाचातरी कोणीतरी कुठेतरी जाऊन काहीतरी करून बसलेला असतो. तो प्रकार आपल्या बाबतीत घडू नये असं त्यांना वाटत असतं.  जेव्हा मित्र विचारतात तेव्हा त्यात एक चावट आशावाद दडलेला असतो.  लहान भाऊ जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा त्यात “तू जमव, म्हणजे माझी लाईन क्लिअर” असा सुप्त संदेश असतो. काही मंडळी असतात, जी तुम्हाला विनाकारण ओळखत असतात. तीही विचारतात. एकटाच येणार की जोडीनं. त्यात खोचकता वगैरे ठासून भरलेली असू शकते. काही जणं केवळ विचारायचं म्हणून विचारतात. कदाचित जोडीनं येणार म्हणला तर काय घ्या!  प्रश्न आला की आपलं ख्या ख्या ख्या करून हासायचं अन् हो हो अशी मान डोलवत नाही म्हणायचं हा नित्यक्रम मी नेटानं पाळला. कारण एकूणच, या प्रश्नात अनपेक्षित असं काही नव्हतं…..

गेल्या महिन्यापर्यंत…..

मी लवकरच सुट्टीवर जाणार ही बातमी ऑफिसात पसरली अन् साधारण दिवसभरात तीन-चार लोकांनी मला हाच प्रश्न विचारला तेव्हा मात्र माझी विकेट उडाली. अमेरिकेतून भारतात सुट्टीवर येतानाही हा प्रश्न येऊन आदळेल याची मी कल्पनाच केली नव्हती.  कल्पना करा… आंघोळीसाठी तुम्ही मोरीत शिरलाय, गंगेच यमुनेचैव म्हणत तुम्ही पहिला तांब्या अंगावर घेणार इतक्यात एखाद्या अज्ञात शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही परस्पर उत्तर ध्रुवावर येऊन पोहोचलाय… माझी अगदी इतकीही खतरनाक परिस्थिती नव्हती, पण म्हणून तुम्ही अशा रोचक आणि रंजक कल्पना करू नयेत असा नियम नाही. सुविचार असा, की  आयुष्य, विश्व आणि इतर सर्व गोष्टींचं उत्तर बेचाळीस आहे, अन् उत्तर ध्रुवावर टॉवेल सहजासहजी मिळत नाही.

हेहेहे. विषयांतर खतम…

त्याचं काय आहे, की कॅलिफोर्निया बे एरियात चिक्कार भारतीय मंडळी आहेत अन् कायम नव्यानं येत असतात. एकूणच, एखादा सुकुमार (ब्याचलर) बंडू सुट्टीसाठी  एकटा मायदेशी जाणं अन् येताना सपत्नीक येणं (किंवा आल्यानंतर आपण आता ब्याचलर नसल्याचा जाहीरनामा देणं) ही संकल्पना सिलिकॉन व्हॅलीला  आजिबात नवीन नाही. (इट्सा फमिलिअर फिणॉमेणॉ युसी)

पहिल्याच प्रश्नानं गारद झालेल्या माझा या प्रश्नकर्त्यांनी पुढच्या काही वाक्यातच पूर्ण वैराचिक फडशा पाडला… त्याचा हा साधारण सारांश

प्रश्नकर्ते: काही प्रश्न विचारतो तुला, आणि मग आम्हीच सांगतो तू एकटा येणार की जोडीनं !

मी: निरुत्तर…

प्रश्नकर्ते: किती दिवस चाललायस?

मी: एक महिना.

प्रश्नकर्ते: (निश्चिततादर्शक स्मितहास्य) काही खरं नाही … बरं वय काय बाळ तुझं?

मी: चोवीस… बहुतेक……… किंवा पंचवीस…..( मनातल्या मनात – दहातून सहा गेले राहिले…..)

प्रश्नकर्ते: हा पहिला प्रश्न. पालकांबरोबर जिथे कुठे जाशील तिथे. मग एकदा गाडी वळली की तिथून पुढे हायवेच आहे.

मी: निरुत्तर… (मनातल्या मनात- खरंय…. काही खरं नाही)

प्रश्नकर्ते: घरच्यांनी या विषयावर तुझ्याशी बोलणं अचानक कमी केलंय?

मी: निरुत्तर… (हो बहुतेक, किंवा नाही…. खरं की काय???  याचा अर्थ काय समजायचा ???)

प्रश्नकर्ते: इतक्यात तुझ्या ओळखतल्या कोणाचं लग्न झालंय?

मी: (बारीक आवाजात…) हो…

प्रश्नकर्ते: हम्मम्मम्म् . (निश्चिततादर्शक स्मितहास्य, यावेळी जाणवणारी निश्चितता पूर्वीपेक्षा साधारण दसपट ) आता शेवटचा प्रश्न…

प्रश्नकर्ते: कोणा दूरच्या नातेवाईकांनी इतक्यात तुझ्या पालकांशी संपर्क साधलाय??

मी:  मी गप्प, चेहेरा मात्र उद्गारतोय ओमायगॉड !!!

प्रश्नकर्ते: अभिनंदन

मी: गार.

या फैरीत चांगलाच घायाळ झालो असतो तरी आता मात्र सावरलो आहे. आता प्रश्न विचाराल तर उत्तर तयार आहे. तेच आपलं नेहेमीचं… ख्या ख्या ख्या करून हासायचं अन् हो हो अशी मान डोलवत नाही नाही म्हणायचं.

~नॅकोबा

अस्वल

कधी कधी लिहिण्यासाठी हात खूप फुरफुरतात, पण मेंदू बंद असतो. कधी शंभर गोष्टी सुचत असतात पण खरडायचाच कंटाळा आलेला असतो. चणे अन् दातांच्या या दुष्टचक्रात कित्येक पोष्टी तश्याच वाऱ्यावर विरून जातात.

गेला अख्खा आठवडा लिहावं लिहावं म्हणतोय पण माझे सर्व प्रयत्न मीच सपशेल हाणून पाडतोय. त्याचं काय असतं की वेळ म्हणून एक प्रकार असतो.त्याचे दोन भाग असतात (दोनपेक्षा जास्त नसावेत असा व्यावसायिक सल्ला मी इथे देऊ इच्छितो, का ते पुढे कळेलंच पण कळलं नाही तरी ते तितकं महत्वाचं नाही.) एक भाग कार्यालयीन कामासाठी राखीव असतो. असावा, बरं असतं. दुसरा भाग तुमचा असतो. (असावा, बरं असतं) पहिल्या भागाचं काय लोणचं घालायचं हे तुमच्या फारसं हातात नसतं. दुसरा भाग, जो तुमचा असतो (म्हणजे, वेळेचा दुसरा भाग, तुमचा दुसरा भाग नाही.) त्याचं काय काय करायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. ज्याला तुम्ही फावला वेळ म्हणता (फावल्या वेळात नक्की कोणाचं फावतं कोणास ठावूक) त्यात बरंच काही करता येतं. लोणचं करणे, पापड भाजणे, ब्लॉग लिहिणे, वाचन, चित्रपट पाहणे, अस्वल पाळणे वगैरे.

मला ब्लॉगिंग आवडतं, अन् गेमिंगही. गेमिंग अंमळ वरचढ. त्यामुळे वीकांत वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट किंवा स्टारक्राफ्ट खेळण्यात घालवतो. अमेरिकेत आल्या आल्या पहिले काही महिने संगणकावर फारसे गेम्स टाकले नव्हते, अन् ब्लॉगिंगलाही तसा नवीनच होतो, त्यामुळे हाताला सुटेल ते खरडलं. कधीकधी फारसा विचारही न करता. अलिकडे मात्र माझ्या आवडत्या छंदात (मी छंद म्हणायचं, आईनं व्यसन म्हणायचं… शेवटी अर्थ एकच, गेमिंग) पुरता बुडलो असल्यानं ब्लॉग अगदीच कोरडा (कोरडा नाही, शुष्क म्हणावं…. शु ष्क ! ष…  ष…. दुसरा ष पोटफोड्या… म्हणजे तुम्हाला साहित्यिक भाषेत वगैरे लिहिता येतं असं लोकांना वाटतं.) झाल्यासारखा वाटतोय.

अन् ब्लॉगवरच्या अशा मलूल, कोंदट, ढगाळ, कोमेजलेल्या वातावरणात अचानक वीज कोसळावी अन् तिच्या आघाताने जमीन दुभंगून तप्त ज्वाळांचे लोळच्या लोळ अंबराकडे झेपवावे, वरून वीज … खालून ज्वाळा… वरून वीज… खालून ज्वाळा … वीज… ज्वाळा… वीज… ज्वाळा… कडकडाट, गडगडाट, झगमगाट आसमंत दुमदुमणारा आवाज, जणू सहस्र (सहस्र या शब्दापुढे हजार ला काहीच किंमत नाही) सिंहांची गर्ज… खोकला… जोराची धाप.. पाणी… पाणी…

असो. (झेपत नाही तर लिहू नये…) तर गंमत अशी आहे, की स्टार माझाच्या मराठी ब्लॉग स्पर्धेचा निकाल इतक्यातच जाहीर झाला (http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) अन् आश्चर्य म्हणजे उत्तेजनार्थ यादीत मुक्ताफळे डॉट कॉमचाही समावेश होता. छान वाटलं. उत्तेजित झालो. माझ्या नियमित वाचनातले काही ब्लॉग्जही त्या यादीत होते. हेरंबचा हरकत नाय, विद्याधरनं चालवलेली बाबा ची भिंत, अन् नचिकेत गद्रेंचा  नचिकेत… दिल से . याच यादीत मुक्ताफळे बघून मला अगदी “कसचं कसचं” फीलिंग आलं. ( यालाच मी गुब्बू वाटणे असं म्हणतो. ) (टु बी स्पेसिफिक, इट्स सिमिलर टू “धन्य धन्य होणे” फीलींग)

वास्तविक, या ब्लॉगनं यापूर्वी किमान दोनदा तांत्रिक बाबींसाठी मान टाकली होती. त्यानंतर कैक महिने केवळ दोन-चार निरर्थक पोष्टींसह हा ब्लॉग इंटरनेटवर कुठेतरी अधांतरी तरंगत होता. अन् एकट्यानं हा ब्लॉग तगवणं मलाही झेपलं नसतं. पण जेव्हा नियमित लिहायला लागलो तेव्हा जाणवलं, की मराठी भाषेला ब्लॉगर्सची अन् वाचकांची एक सुरेख कम्युनिटी लाभली आहे.  अन् या कम्युनिटीतून कळत-नकळत नवीन ब्लॉग्ससाठी एक पोषक वातावरण निर्माण झालंय. मराठी ब्लॉग विश्वातून अनोळखी वाचक नकळत ब्लॉगवर येतात, वाचतात, कधी प्रतिक्रियाही सोडतात. असे एखाद-दुसरे नियमित वाचकही माझ्यासारख्या नवीन बंडूला कैच्याकै प्रेरणा देऊन जातात, प्रत्येक प्रतिक्रिया अप्रत्यक्षरीत्या ब्लॉग जागा अन् ताजा ठेवायचं एक प्रबळ कारण सांगत असते (मात्र कधीकधी एखादी प्रतिक्रीया “ब्लॉग बंद करा”, किंवा “ही पोष्ट अमुक अमुक ठिकाणावरून चोरलेली आहे” असंही सांगते पण सुदैवानं मुक्ताफळांची उधळण थांबवायला सांगणारी प्रतिक्रिया आजवर आलेली नाही (म्हणून लगेच पाठवायचीही गरज नाही !!) )

थोडक्यात सांगायचं तर, वाचकमंडळी, तुम्ही इथे लिहिलेलं भलतंसलतं वाचत नसता, तर मी नेहेमीच्या आळसाने केव्हाच गाशा गुंडाळला असता. तरी, वेळोवेळी ब्लॉगला भेटी देऊन प्रतिक्रिया देऊन मला जागं ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

तुम्ही म्हणाल, प्रत्येक ब्लॉगर वाचकांना थॅंक्यू का म्हणतो?
ब्लॉगून बघा, आपोआप जाणवेल.

तळटीप:

१. शीर्षकाचा पोष्टीशी तसा काहीच संबंध नाही.
२. नक्की किती लोक तळटीप वाचतात कोणास ठावूक…

असंच काहीतरी

मर्कटापासून उत्क्रांत झालेल्या मज्जारज्जूंनी खच्चून भरलेल्या मर्त्य मानवाच्या मस्तिष्काच्या मर्यादांवर मनन करण्यापेक्षा मुरमुरे मटकावण्यात मर्दुमकी मानणाऱ्या मनुष्यांच्या मतमतांतरावर मल्लीनाथी करण्यापेक्षा मी मांजराच्या मिजासखोर मउपणात मश्गुल होणे पसंत करेन.

अशा अनेक गोष्टी असतात, ज्या असतात. त्यांना बरेचदा कारण असतं, पण ते नसलं किंवा आपल्याला माहीत नसलं तरी फारसा काही फरक पडत नाही.

हिमेश रेशमिया….. आहे.
राखी सावंत….. आहे.
एकता कपूर….. आहे.

का आहे याच कारण देवाला ठावूक
तोही आहे. का आहे ते माहीत नाही पण आहे.

अत्ता या क्षणी माझ्या शीतकपाटात (शीः मला फ्रिज्ज म्हणायचं होतं) कोका कोला का आहे?
इंटरनेट एक्पस्लोअरर…. का आहे?
काही चकोट इतके रेखीव का दिसतात?
शनिवारी दुपारी मी झोपलेला का असतो?
काही लोक लाच का घेतात?
काही लोक काच का खातात?
आईच्या मैत्रिणी फार्मविल का खेळतात?
इंटरनेटवर इतकी माहिती का असते?
त्यातली बरीचशी अश्लील का असते?
हे मला का माहीत असतं?

वगैरे प्रश्नांची उत्तरं शोधण्यास अशक्य नाहीत. पण माहीत झाली तरी त्यानं काही होणार नाही किंवा केळं होईल. केळं होणे हा एक मराठी वाक्प्रचार आहे.  काहीच न होणे या अत्यंत नकारात्मक अर्थाची इतकी सकारात्मक मांडणी हे एक वैशिष्ट्यच म्हणायला म्हणायला पाहिजे.  असले वाक्प्रचार शाळेत शिकता येतात पण शिक्षकांकडून शिकवले जात नाहीत हा एक विरोधाभासच म्हणायला पाहिजे. शाळेत शिकलेले पण शिक्षकांनी न शिकवलेले वाक्प्रचार दैनंदिन वापरासाठी कितीही चपखल अन् उपयुक्त वाटले तरी आपणासारख्या सूज्ञ वाचकांनी ते जपूनच वापरावेत हे वेगळे सांगणे न लगे.

आता असं का, आणि वाचक कायम सूज्ञ का असतात हे प्रश्न ……..

~नॅकोबा